Monday, 21 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      अपुऱ्या पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विविध योजना आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, कृषीमंत्र्यांची ग्वाही

·      राज्यातल्या उद्योगांना २०२९ पर्यंत स्वस्त वीज मिळेल- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      नांदेड जिल्ह्यात दोन दुर्घटनांमध्ये तीन युवकांचा मृत्यू

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला दोन रौप्य पदकं, क्रिकेटमध्ये महिला संघाची अंतिम फेरीत उद्या श्रीलंकेशी लढत

****

राज्यात अपुऱ्या पावसाअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून मदत करण्यात येईल, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले:

बाईट - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

 

दरम्यान, कृषीमंत्र्यांनी काल अकोला इथं अमरावती महसूल विभागातल्या पीक परिस्थितीचा आढावा घेतला.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल वैजापूर तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पिकस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असं सांगतानाच शिरसाट यांनी, अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यातल्या दगडवाडी इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. पावसाअभावी पिकांचं मोठं नुकसान झालं असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, रोहित पवार यांनी काल लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव, पाटोदा आणि काजळ हिप्परगा परिसरातल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. जिल्ह्यात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही पंचनामे रखडल्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारवर टीका केली.

**

दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत आणि सवलती द्याव्यात, या मागणीसाठी बीड इथं येत्या २४ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल ही माहिती दिली.

****

राज्यातल्या उद्योगांना २०२९ पर्यंत स्वस्त वीज मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर मधल्या अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातल्या अवादा समूहाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी, सोलर मॉडेलच्या निर्मितीची काल पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योगांना स्वस्त आणि २४ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर ऊर्जा, बॅटरी आणि ऊर्जा साठवणुकीवर भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदरामुळे राज्यातले उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले:

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

दरम्यान, यूपीआयच्या सर्व व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार नसून, केवळ विवक्षित व्यापारी व्यवहारांवरच शुल्क लागू होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. किरकोळ शुल्काला व्यापारी आणि पेट्रोलपंपधारकांनी विरोध करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. या दृष्टिकोनाचं पी एम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत झालेलं रूपांतर दर्शवणारं उदाहरण आपण जाणून घेणार आहोत...

बाईट - पी एम स्वनिधी

“पथविक्रेत्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर्स आत्मनिर्भर निधी अर्थात पीएम स्वनिधी योजना महत्त्वाची ठरत आहे. कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत आलेल्या पथविक्रेत्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी जून २०२० मध्ये ही योजना सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना कोणतेही तारण न ठेवता कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. पुनर्रचित योजनेनुसार पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. पहिल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणारे लाभार्थी पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात.

भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, कपडे आणि विविध वस्तू विकणारे पथविक्रेते, तसंच न्हावी, चांभार, धोबी यांसारख्या सेवा देणाऱ्या विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळतो. योजनेमुळे पथविक्रेत्यांना औपचारिक आर्थिक व्यवस्थेशी जोडण्याबरोबरच डिजिटल व्यवहार आणि पतव्यवस्थेचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे.

पथविक्रेत्यांच्या व्यवसायाला आर्थिक स्थैर्य देत त्यांना आत्मनिर्भर बनवणं आणि त्यांच्या उत्पन्नाच्या संधी वाढवणं, हा पीएम स्वनिधी योजनेचा प्रमुख उद्देश आहे.’’

****

छत्रपती संभाजीनगर इथले शिवणकाम करणारे प्रशांत अवसेकर यांना पी एम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेविषयी ते सांगतात:

बाईट - प्रशांत अवसेकर

****

नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथल्या काळेश्वर मंदिर परिसरात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन तरुणांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. हे दोघे वाडी पाटी नजीकच्या मातोश्री प्रतिष्ठान या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

अन्य एका घटनेत उमरी तालुक्यातल्या मंडाळा या गावात गणेश विसर्जन बंदोबस्त करून दुचाकीवर परत येत असताना होमगार्ड संदीप पिंगळे यांचा अन्य एका दुचाकीच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हिरडगाव शिवारात काल संध्याकाळी हा अपघात झाला.

****

जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल दमदार कामगिरी करत दोन रौप्य पदकांची कमाई केली. नेमबाजीत महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात एला वेनिल वलारि वान, सोनम मस्कर आणि विदर्शा विनोद यांनी देशाला रौप्यपदक मिळवून दिलं. त्यानंतर एला वेनिल हिनं वैयक्तिक प्रकारातही रौप्यपदक पटकावलं. महिला पारंपरिक ६० किलो वजनी गटात सुचिका तारियाळनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष हॉकी संघानं इंडोनेशियाचा १३-१ असा पराभव करत विजयी सुरुवात केली. तर महिला हॉकी संघाने ब गटातल्या आपल्या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा १९-० असा एकतर्फी पराभव केला.

महिला टेबल टेनिस संघानं सिंगापूरवर ३-२ असा विजय मिळवला, तर महिला बॅडमिंटन संघानं कझाकस्तानचा ३-० असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला क्रिकेटमध्ये भारतानं बांगलादेशचा ११४ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताचा अंतिम सामना उद्या २२ तारखेला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

दरम्यान, काल झालेल्या सामन्यात उपकर्णधार स्मृती मानधना हिने टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चार हजार ७८८ धावा पूर्ण करुन विक्रम प्रस्थापित केला.

****

लातूर जिल्ह्यात उदगीर शहर आणि परिसरात काल सुमारे १५ ते २० मिनिटं जोरदार पाऊस झाला. या भागात पावसाने ओढ दिल्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

दरम्यान, हवामान विभागाने आज परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...