Monday, 21 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २१ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विविध देशांची गरज ओळखून देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्याची उच्चस्तरीय कृती दलाची ग्वाही

·      राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्यासाठी किसान सभेकडून आंदोलनाचा इशारा;विरोधी पक्षांकडून विधीमंडळ अधिवेशनासह तत्काळ मदतीची मागणी

·      छत्रपती संभाजीनगर इथं एफडीएच्या कारवाईत सहा लाख रुपयांची मिठाई तसंच खवा जप्त

·      आशियाई क्रीडास्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच;आज चार पदकांची कमाई

आणि

·      राज्यभरात काही जिल्हे वगळता आज पावसाचा यलो अलर्ट

****

विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मुंबईत आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत ते बोलत होते. भारतातील युवा मनुष्यबळाची क्षमता आणि जागतिक मागणीशी कुशल मनुष्यबळाची प्रभावी सांगड घालावी लागेल. त्यातून ‘सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंट’ ही संकल्पना अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्र या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारताने सुमारे २८ देशांसोबत कामगार गतिशीलतेसंदर्भात करार केले आहेत. या देशांमध्ये अभियांत्रिकी, आरोग्यसेवा, बांधकाम आणि विविध तांत्रिक क्षेत्रांतील कुशल मनुष्यबळाला मोठी मागणी आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कार्यबल गतिशीलता क्षेत्रात महाराष्ट्र पुढाकार घेईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

****

येत्या २९ तारखेला आयोजित केल्या जाणाऱ्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’ला नामांकित कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १ हजार ५८८ नियोक्त्यांनी नोंदणी केली असून, त्यांच्या माध्यमातून ७१ हजार ९३९ प्राथमिक रोजगार संधी उपलब्ध झाल्या आहेत. या रोजगार महाकुंभात टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप, LIC, HDFC, ICICI, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, या सारख्या नामांकित कंपन्या आणि संस्थांचा सहभाग आहे.

****

देशभरात भटक्या जनावरांसाठी निवारा बांधण्याच्या निर्देशाला आव्हान देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष पीठ स्थापन करण्यास सहमती दर्शवली आहे. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष पीठाने प्राधिकरणाला निवारा बांधण्याचे निर्देश दिले होते, तर ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासनाची असल्याचा युक्तीवाद प्रधिकरणाचे कायदेशीर सल्लागार तुषार मेहता केला. भटक्या कुत्र्यांच्या आणि जनावरांच्या व्यवस्थापनासाठीच्या उपाययोजना आणि विविध सरकारी प्राधिकरणांच्या जबाबदाऱ्यांशी संबंधित एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय देण्यात आला.

****

दूरसंचार विभागाने नागरिकांना मोबाईल क्रमांक फसवणुकीच्या गुन्ह्याबाबत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. बनावट पद्धतीने सिम कार्ड जारी करणे, दूरसंचार ओळख क्रमांकांचा गैरवापर आणि मोबाइल फोनच्या आयएमईआय क्रमांकात छेडछाड करणे हे गंभीर गुन्हे असल्याचे सांगत, अशा प्रकरणांमध्ये तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचं विभागानं सांगितलं. नागरिकांनी आपल्या नावावर जारी मोबाइल क्रमांकांची नियमित तपासणी करावी आणि कोणतेही अनधिकृत सिम कार्ड आपल्या नावे सक्रिय असल्याचं आढळल्यास तातडीने कारवाई करण्याचं आवाहन विभागानं केले आहे.

****

भरती परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, विश्वासार्ह, कार्यक्षम आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला अभ्यासपूर्ण शिफारशी सादर करण्यात येतील, अशी ग्वाही भरती परीक्षा उच्चस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी दिली. या समितीने आज छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थ्यांशी स्मार्ट सिटी कार्यालयात संवाद साधला, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. परीक्षा वेळापत्रक, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, परीक्षा केंद्रे, पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण, पेपर तपासणी, सामान्यीकरण, निकाल, न्यायालयीन प्रकरणं आणि नियुक्ती प्रक्रिया अशा विविध मुद्यांचा अभ्यास करून आपली समिती शिफारशी सुचवेल, असं राधा यांनी सांगितलं. पुढील परीक्षेसाठी सुमारे १२ लाख उमेदवारांनी अर्ज केले असल्याने आवश्यक पायाभूत सुविधा तसंच मनुष्यबळाचा आढावाही घेतला जाणार आहे. समितीचा विभागनिहाय दौरा येत्या ३० सप्टेंबरला पूर्ण होईल त्यानंतर तीन महिन्यांत अहवाल पूर्ण करण्यात येणार असून, विद्यार्थी, पालक तसंच तज्ज्ञांकडून प्राप्त सूचनांचा अभ्यास करून शिफारसी करणार असल्याची माहिती राधा यांनी दिली.

****

महाराष्ट्राची शेतीची सद्यपरिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी किसान सभेनं केली आहे. या मागणीसाठी येत्या २३ तारखेला राज्यभर आंदोलनाचा इशाराही किसान सभेचे अजित नवले दिला आहे. राज्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत असून सोयाबीन, कापूस आणि खरिपाची पिके करपत आहेत. या पार्श्वभूमीवर पिकांची संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी. नियमित कर्जदारांना किमान दोन लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे, आदी मागण्यांसाठी राज्यात प्रत्येक तहसील कार्यालय तसंच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं, नवले यांनी सांगितलं आहे.

****

दुष्काळावर तत्काळ आणि व्यापक पद्धतीने उपाययोजना करण्यासाठी राज्य विधीमंडळाचं एका आठवड्याचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आज सामाजिक संपर्क माध्यमावर दानवे यांनी ही मागणी केली.

 

दरम्यान, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची तत्काळ मदत देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पवार यांनी आज नांदेड तालुक्यातील तळणी, एकदरा या गावांना भेटी देऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाची घोषणा करून उपाययोजनांना सुरुवात करावी अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.

****

बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शासनाने दुष्काळी उपाययोजना कराव्या, पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी अशा मागण्याचं निवेदन यावेळी तहसील प्रशासनाकडे सादर केलं.

****

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रेणापूर तहसील कार्यालयासमोर आज हलगी नाद आंदोलन करण्यात आलं. मनसे शेतकरी सेना अध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

राज्य सरकार अहवाल आणि माहितीच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. ते लातूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

****

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, १०० टक्के पीक विमा मंजूर करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

****

छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईत पाच लाख ९४ हजार ७३६ रुपये किमतीचा, तीन हजार ६९१ किलो मिठाई आणि खवा सदृश पदार्थ जप्त केला. शहानूरमियाँ दर्गा चौकात दोन खासगी बसवर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.

****

जालना शहरात आजपासून प्रथमच शहर बससेवेला सुरुवात झाली. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, महापौर वंदना मगरे यांनी हिरवा झेंडा दाखवून या सेवेला सुरुवात केली. शहरातल्या तीन महत्त्वाच्या मार्गावरून या बस धावणार आहेत.

दरम्यान, अंबड इथं बसस्थानक परिसरात आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने भस्मसात झाली. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.

****

आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने २९ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘निर्धार महामोर्चा’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी बीड इथं पत्रकार परिषदेत दिली.

****

जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी चार पदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल सांघिक स्पर्धेत भारतीय संघाने रौप्य पदकांची कमाई केली. रुद्रांक्ष पाटील, पार्थ माने आणि हिमांशू ढिल्लन यांचा या संघात समावेश आहे. तसंच वैयक्तिक प्रकारात हिमांशूने रौप्यपदक, तर रुद्रांक्षने कांस्यपदक जिंकलं. मिश्र मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने कांस्यपदक पटकावलं.

कबड्डीमधे भारतीय पुरूष संघानं जपानबरोबरचा सामना ४९ विरुद्ध २४ गुणांनी जिंकला.

****

हवामान

उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात धाराशिव, लातूर आणि नांदेडसह पुणे सोलापूरसहित पश्चिम महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे २३ सप्टेंबरपासून पुढचे चार दिवस विदर्भात मुसळधार, ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...