Friday, 25 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश आज जारी करण्यात येणार

·      कृषीमंत्र्यांसह विविध विभागाच्या मंत्र्यांकडून पीक पाहणी, तातडीनं विधिमंडळ अधिवेशन बोलावण्याची उद्धव ठाकरे यांची मागणी

·      केंद्र सरकारकडून विविध खाद्य तेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात

·      दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता

आणि

·      आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पटकावली पाच पदकं, आतापर्यंत एकूण १७ पदकांची कमाई

****

राज्यात दुष्काळाबाबतचा पहिला शासन आदेश आज जारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वाशिम जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अमरावती विमानतळावर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. सकृतदर्शनी दुष्काळग्रस्त दिसत असलेल्या भागाचा या पहिल्या आदेशात समावेश असेल, राज्यातला एखादा दुष्काळग्रस्त भाग यातून सुटला तर, पुढच्या आदेशात त्याचा समावेश करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

**

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांनी काळजी करू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

**

परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल सेलू तालुक्यातल्या कुंडी, पाथरी तालुक्यातल्या हदगाव, मानवत तालुक्यातल्या सारोळी आणि गंगाखेड तालुक्यातल्या अकोली इथं, भेट देत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही बोर्डीकर यांनी दिली.

**

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या खंडाळी, अंधोरी आणि किनगाव परिसरात काल पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं सांगितलं.

दरम्यान, लातूर-तुळजापूर महामार्गावर औसा तालुक्यात तावशी इथं काल अज्ञातांनी टायर जाळत कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

**

नांदेड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजेवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्बंध घातले आहेत. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

**

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बीड इथं आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शासनाने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावं, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये, तर शेतमजुरांना प्रतिकुटुंब २५ हजार रुपये मदत द्यावी, पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्यावी आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पारदर्शकपणे पूर्ण करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

**

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं तातडीनं किमान दोन ते तीन दिवसांचं विधिमंडळाचं अधिवेशन घ्यावं आणि या परिस्थितीत काय पावलं उचलली जात आहेत, याची माहिती द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले, 

बाईट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

**

दुष्काळासंदर्भात नेमलेली ११ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमिती प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पीकविम्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांची ११ पदं, ४७ नवीन अपर तहसीलदार कार्यालयं आणि चार नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयं स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. यात मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

****

नीट - पीजी २०२६ परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस च्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. 

****

केंद्र सरकारनं विविध प्रकारच्या खाद्य तेलांवरच्या मूलभूत आयात शुल्कात कपात केली आहे, त्यामुळे तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. कच्चा सूर्यफुल तेलावरचं आयात शुल्क दहा टक्क्यांवरून पूर्णपणे रद्द करण्यात आलं असून, कच्च्या सोयाबीन तेलावर तसंच कच्च्या पाम तेलावर आता १० ऐवजी ५ टक्के मूलभूत आयात शुल्क लागेल.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. पर्यावरण संवर्धन ही शासनासोबतच प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी आहे, हा विचार कृतीत आणण्यासाठी सरकारकडून मिशन LiFE राबवलं जात आहे. याबाबत आज जाणून घेऊ..

मिशन LiFE ची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ मध्ये ग्लासगो इथं झालेल्या COP26 या हवामान परिषदेत मांडली. त्यानंतर २० ऑक्टोबर २०२२ रोजी गुजरातमधील केवडिया इथं मिशन LiFE उपक्रमाचं औपचारिक लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामागची सरकारची भूमिका विशद केली.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

मिशन LiFE अंतर्गत देशभर जनजागृती आणि नागरिकांच्या सहभागासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात आतापर्यंत सहा कोटींहून अधिक नागरिकांनी जवळपास ३४ लाख LiFE उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी आहे, हा विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न मिशन LiFE च्या माध्यमातून केला जात आहे.

****

दहा दिवसीय गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. राज्यभरात विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही महापालिकेनं विसर्जन विहिरींची स्वच्छता आणि इतर तयारी केली असून, पोलिस प्रशासनानं विसर्जन सोहळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी चोख तयारी केली आहे. शहरातल्या वाहतुक व्यवस्थेतही बदल करण्यात आला असून, नागरिकांनी याची दखल घेण्याचं आवाहन पोलिस प्रशासनानं केलं आहे.

**

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नगर परिषदेतर्फे गणेश विसर्जनासाठी पाच कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी चार हौद स्थिर आणि एक फिरता हौद असून, नागरिकांनी या हौदांचाच विसर्जनाची वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

धाराशिव इथं नागरिकांनी गणेश मुर्तीचं विसर्जन फिरत्या कृत्रिम तलावात करावं किंवा मुर्ती नगरपरिषदेच्या संकलन केंद्रावर आणून देण्याचं आवाहन मुख्याधिकारी निता अंधारे यांनी केलं आहे. 

परभणी इथं श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली असून, शहरात मूर्तींचं संकलनही केलं जाणार आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असून, रहाटी बंधा गणेश मूर्तींचं विसर्जन न करण्याचं आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केलं.

दरम्यान, परभणी जिल्ह्यात श्री गणेशा आरोग्याचा या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यात एक हजार २५५ आरोग्य शिबिरात ७८ हजार ५३ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

****

भूकंपाच्या धक्क्यापासून जुन्या आणि असुरक्षित इमारतींचं संरक्षण करण्यासाठीच्या 'स्टेबल' तंत्रज्ञानाचा पथदर्शी प्रयोग हिंगोली जिल्ह्यात यशस्वी झाला. वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे इथल्या प्राथमिक शाळेचं या तंत्रज्ञानाद्वारे रेट्रोफिटिंग पूर्ण करण्यात आलं. याबाबात अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाचे केंद्र असलेल्या पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्टेबल तंत्रज्ञानाने बळकटीकरण करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे इमारतींच्या भिंतीवर लेंटल पातळीवर आतील व बाहेरील बाजूने स्टीलच्या पट्ट्या बसवल्या जातात. या पट्ट्या थ्रू बोल्टच्या साह्याने एकमेकांना जोडल्या जातात . त्यामुळे इमारतीच्या भिंतींना एकसंघ आणि मजबूत आधार मिळतो. भूकंपाच्या वेळी भिंतीची परस्पर जोडणी मजबूत राहण्यास यामुळे मदत मिळते. पांगरा शिंदे येथील पथदर्शी प्रयोगामुळे भविष्यात जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील इतर असुरक्षित इमारतींच्या बळकटीकरणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग उपलब्ध झाला असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे.

रमेश कदम, हिंगोली.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने काल पाच पदकांची कमाई केली. वुशूमध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक पटकावलं. मिश्र रिले स्पर्धेत एम आर पूवम्मा, विथ्या रामराज, मनु टी एस आणि विशाल टी यांच्या संघानेही रौप्य पदक जिंकलं.

नौकायनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी, महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सीमा हिने, तर नेमबाजीत मिश्र सांघिक स्कीट प्रकारात अनंत जीत सिंग नारुका आणि परिनाज धालीवाल यांनी कांस्यपदक जिंकलं.

या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एक सुवर्ण, सात रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण १७ पदकं जिंकली आहेत.

**** 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...