Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
१८व्या ब्रिक्स शिखर परिषदेला प्रारंभ; दिल्ली जाहीरनाम्याचा ब्रिक्स राष्ट्रांकडून एकमतानं स्वीकार
·
मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच-मनोज जरांगे
यांचा इशारा
·
गणेशोत्सव काळात आंदोलन न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन
·
मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा पाहणी अहवाल उद्या सादर करण्याचे प्रशासनाला निर्देश
·
कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या महिला तसंच पुरुष संघांची आज अंतिम
लढत; महिलांच्या टी-20 आशिया चषक स्पर्धेत आज भारत-श्रीलंका
अंतिम सामना
आणि
·
मराठवाड्याच्या बहुतांश भागाला आज पावसाचा यलो अलर्ट
****
नवी दिल्लीत भारत मंडपम इथं १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला कालपासून प्रारंभ झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसाठी उपस्थित जागतिक नेत्यांचं स्वागत केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना, भारताचं 'ब्रिक्स' अध्यक्षपद हे मानवतेला प्राधान्य
देणाऱ्या आणि लोकाभिमुख दृष्टिकोनावर आधारित असल्याचं नमूद केलं. पुढील २० वर्षांसाठी
एका नवीन, दीर्घकालीन कार्यपद्धतीवर
काम करण्याची गरज असून याची सुरुवात आपल्या स्वत:च्या कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करण्यापासून
केली पाहिजे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, या परिषदेत पंतप्रधान मोदी
यांनी काल दिल्ली जाहीरनामा मांडला. सर्व ब्रिक्स राष्ट्रांनी तो एकमतानं स्वीकारला.
या जाहीरनाम्यात सतत विकास, भूक आणि दारिद्य्र निर्मुलन, हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरं जाण्याच्या उपायांचा समावेश आहे. या संकल्पांचं
मूर्त परिणामांमध्ये रुपांतर करणं ही सामायिक जबाबदारी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी
नमूद केलं. ते म्हणाले...
बाईट: पंतप्रधान नरेंद्र मोदी
ब्रिक्सच्या द्वी दशकपूर्ती निमित्तानं सदस्य देशांच्या नेत्यांनी याप्रसंगी दोन
स्मारक टपाल तिकिटेही जारी केली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांसह उपस्थित सर्व नेत्यांनी
सामुहिकरित्या वृक्षारोपणही केलं.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात
ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील. तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी
राजभाषा संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास
येत्या १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या
अंतरवाली सराटी इथं काल मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर, त्यांनी ही सूचना केली. आंदोलनादरम्यान
कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. पाटोदा, श्रीगोंदा आणि हडपसर मार्गे १९ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याचं
नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणी सरकारनं आक्रमक
भूमिका न घेता संवादातून मार्ग काढावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार
रोहित पवार यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकार संवाद
साधण्यात कमी पडत असल्याची टीका आमदार पवार यांनी केली.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले
निर्णय लक्षात घेता सर्व आंदोलकांनी याची काळजी घ्यावी. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव
काळात कोणीही आंदोलन करू नये, असं आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते काल नागपूरात प्रसारमाध्यमांशी
बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा
समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत, असंही मंत्री बावनकुळे यांनी
यावेळी स्पष्ट केलं.
****
मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी पीक परिस्थितीची पाहणी करुन उद्या सोमवारी अहवाल
सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते काल दुरदृष्यप्रणालीद्वारे
घेतलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह विभागातील
आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. विभागात सरासरी पर्जन्यमानाच्या
सुमारे ५८ टक्के पाऊस झाला असून, मोठ्या ११ प्रकल्पात ६७ टक्के, मध्यम प्रकल्प २१ टक्के तर लघु प्रकल्पात २०टक्के जलसाठा असल्याची माहिती यावेळी
देण्यात आली.
****
सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य व्यवस्थेची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामुहिक
जबाबदारी असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. त्या काल
पुण्यात मुळशी इथं सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या ‘माहेरवाशीण
- मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर बोलत होत्या.
आशा कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना ‘माहेर-दूत’ म्हणून सक्षम करण्याची
संकल्पना या उपक्रमात आहे. सिम्बायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय तसंच सिंबायोसिस
विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात ‘माहेरवाशीण’
सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
दुभंगलेले ओठ आणि टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांवर आता दर्जेदार तसंच
सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने
राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात सामंजस्य
करार करण्यात आला आहे. हा करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे. राज्यातील १५ मान्यताप्राप्त
रुग्णालयांत या व्याधीवर उपचार केले जाणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित ११
विशेष मंडळस्तरीय शिबिरांमध्ये काल एकूण ६७ अर्ज प्राप्त झाले. वंशावळ समितीच्या बैठकीत
निर्णय झाल्यानंतर तातडीनं पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षातर्फे येत्या १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान सेवा संकल्प
अभियान राबवण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यात या अंतर्गत विविध सेवा आणि सामाजिक
उपक्रमांबाबत तसंच अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत जिल्हाध्यक्ष
दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी काल मार्गदर्शन केलं. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांसह पदाधिकारी
आणि कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित होते.
****
नांदेड इथं गोदावरी रिव्हर फ्रंटच्या कामाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
आमदार अंबादास दानवे यांनी काल पाहणी केली. नदीमध्ये सांडपाणी सोडले जाणार नाही यासाठी, राष्ट्रीय हरित लवादाच्या
निर्देशांचा विचार करून आवश्यक कार्यवाहीची गरज दानवे यांनी व्यक्त केली.
****
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या
वतीनं काल 'हिंगोलीचा विकास, तुम से ना हो पायेगा!' आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या
विविध विकासकामांचा वस्तुस्थितीदर्शक हिशोब जनतेसमोर ठेवल्याचा दावा आमदार अंबादास
दानवे यांनी केला.
****
लातूर शहरात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
वतीनं काल विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी
तात्काळ राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेण्यात याव्यात, तसंच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडं शासनानं गांभीर्यानं
लक्ष द्यावं, या प्रमुख मागण्या यावेळी
करण्यात आल्या.
****
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल लातूर जिल्ह्यात पिकांच्या स्थितीची प्रत्यक्ष
पाहणी केली. पावसाअभावी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं या पाहणीतून
दिसून आलं. सध्या जिल्ह्यात केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने उपलब्ध पाणी प्रामुख्याने
पिण्यासाठी राखीव ठेवण्यासंदर्भात पावलं उचलल्याचं निलंगेकर यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय
युवक महोत्सवाची काल सांगता झाली. जिल्ह्यातील १३९ महाविद्यालयांनी यात सहभाग नोंदवला.
विद्यापीठाच्या संघानं सांघिक चषकासह एकुण १८ पारितोषिकं पटकावली.
****
महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
चीनमधील मोकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ५-१ असा पराभव
केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीनने जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
आज भारत आणि चीन यांच्यात अंतिम लढत होणार आहे.
याच स्पर्धेत पुरुषांच्या गटात आज भारत आणि दक्षिण कोरिया संघात अंतिम सामना होणार
आहे. भारतीय संघ विक्रमी सहाव्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचं लक्ष्य ठेवून अंतिम
सामना खेळण्यासाठी उतरेल.
****
महिला क्रिकेटमध्ये, टी-20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम
फेरीत भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबई इथं आज हा सामना होणार
आहे. या स्पर्धेचं सात वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ यंदा साखळी फेरीत अव्वल
स्थानावर आहे.
****
भारत आणि अफगाणिस्तान पुरुष क्रिकेट संघातल्या टी ट्वेंटी मालिकेला आजपासून प्रारंभ
होत आहे. आज सायंकाळी दिल्लीत पहिला सामना खेळवला जाणार आहे.
****
हवामान
मराठवाड्यात नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आज हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित मराठवाड्यासह
अहिल्यानगर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला
आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात काल राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये
मोटार अपघात नुकसान भरपाई तसंच भूसंपादन मावेजा मिळण्यासंबंधीची एकूण ४७७ प्रलंबित
प्रकरणं ठेवण्यात आली होती, त्यापैकी १४५ प्रकरणं तडजोड होऊन निकाली काढण्यात
आली.
****
No comments:
Post a Comment