Saturday, 12 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांसह अन्य निमंत्रित देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. इराण, मलेशिया, अबुधाबी, इजिप्त, नायजेरिया, इथिओपिया या देशांच्या नेत्यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस हेदेखील ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. दरम्यान, ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातला संघर्षासह विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली.

****

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. आयुष्मान भारत मिशन-महाराष्ट्रचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी नागपूर इथं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन युवा शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांचं निवेदन दिलं. १९८६ पासून धरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून, २२ ग्रामपंचायतींनी उंची वाढवण्यास विरोध करणारे ठराव दिल्याचं त्यांनी सांगितले. गाळ काढणे किंवा बॅरेजेस उभारणे असे पर्याय उपलब्ध असल्याची भूमिका त्यांनी मांडली. अतिरिक्त जमीन पाण्याखाली गेल्यास योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्यंत्र्यांनी दिलं आहे,तसंच येत्या १७ सप्टेंबरला होणारं जलसमाधी आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलम आहे.

****

प्रदेश काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि राज्य नियोजन महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. रत्नाकर महाजन यांचं आज सकाळी निधन झालं, ते 80 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने पुरोगामी विचारांच्या चळवळीतील एक अभ्यासू, लढवय्या आणि वैचारिक नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली इथं येण्याचं आवाहन मराठा समाजबांधवांना केलं आहे. पुढील आंदोलनाची दिशा तसंच मुंबईकडे मोर्चा नेण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला.

दरम्यान, राष्ट्रीय मराठा पक्षानं मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठी शाळांना शंभर टक्के अनुदान देऊन बंद शाळा पूरववत चालू कराव्यात यासह अन्य काही मागण्या शासनाकडे केल्या असल्याचं पक्षाचे अध्यक्ष अंकुश होनाळीकर यांनी सांगितलं.

****

बीड शहरात वीज देखभाल कामांमुळे चार दिवस काही भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. आज आणि उद्या तसंच १६ आणि २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ३ यावेळेत वीज खंडित राहील, दुरुस्ती आणि देखभालीची कामं नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावं, असं आवाहन महावितरण मंडल कार्यालयाच्यावतीनं करण्यात आलं आहे.

****

दुभंगलेले ओठ आणि टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांवर आता दर्जेदार तसंच सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे. या सामंजस्य कराराद्वारे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गरजू बालकांना जिल्हा नोडल अधिकाऱ्यांच्या औपचारिक संदर्भपत्राद्वारे ‘स्माईल ट्रेन इंडिया’च्या मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येईल. राज्यातील १५ मान्यताप्राप्त रुग्णालयांत या व्याधीवर उपचार उपलब्ध होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने राष्ट्रीय संरक्षण तसंच नौसेना अकादमी परीक्षा आणि संयुक्त संरक्षण सेवा सीडीएस परीक्षा २०२६ उद्या १३ तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा केंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी एकूण १३ परीक्षा उपकेंद्रांवर ४ हजार ११२ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. राष्ट्रीय संरक्षण आणि नौसेना अकादमी परीक्षा शहरातील एकूण ११ शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दोन सत्रांत होणार आहे.

****

शेतकऱ्यांची सोय तसंच प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नाशिक जिल्ह्यातील देवळाली ते दानापूर दरम्यान धावणाऱ्या 'शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे सेवेची' मुदत एक महिन्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देवळाली-दानापूर अनारक्षित विशेष रेल्वे आज १२ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. तर दानापूर-मनमाड अनारक्षित विशेष रेल्वे परवा १४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत विस्तारित करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेच्या वेळापत्रकात, थांब्यांत व रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

****

महिलांच्या ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना दक्षिण कोरिया बरोबर सुरू आहे. चीनमधील मोकी इथं हा सामना सुरू आहे.

दरम्यान, या स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम सामन्यात प्रवेश केला. काल झालेल्या उपांत्य सामन्यात त्यांनी मलेशियाचा ३-१ नं पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...