Thursday, 17 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम

·      बीड-पुणे रेल्वे सेवेचं आज बीड रेल्वे स्थानकावरून उदघाटन

·      EPFO अनिवार्यतेची वेतन मर्यादा दरमहा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये

·      पंतप्रधानांच्या राजकीय कारकीर्दीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आजपासून ‘सेवा संकल्प अभियान’

·      चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर

आणि

·      राज्य शासनाला तीन महिन्यांची मुदत देत मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. तत्कालीन उपपंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन पोलो’ या पोलिस कारवाईद्वारे भारतीय सैन्याने हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन, भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री काल छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाले.

बीड इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक तर नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात प्रसिद्ध लेखक डॉ. सुशील धसकटे यांचं ‘मराठवाडा: भाषा आणि संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विभागात शैक्षणिक संस्थांमधूनही ध्वजारोहण आणि संचलनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

****

बीड-पुणे रेल्वे सेवेचा आज बीड रेल्वे स्थानकावर शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी काल रेल्वे स्थानकाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

****

दरम्यान, बीड इथं काल जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री -जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि खरीप हंगामाचा आढावा घेतला.

यावेळी जिल्ह्यातील पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा आणि वीजप्रश्नांवर विविध मागण्या मांडण्यात आल्या.

बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांत पावसाचे अत्यल्प व अनियमित प्रमाण असल्याने गावनिहाय वस्तुनिष्ठ पाहणी करून नुकसानभरपाई व अनुदान द्यावे, तसेच गरजू गावांत टँकर व चारा डेपो सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अर्थात EPFO अनिवार्यतेची वेतन मर्यादा दरमहा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रवास 'जनसेवेतून राष्ट्रसेवा' या मंत्राने आणि आजही कायम असलेल्या अथक कटिबद्धतेने घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, सरकार २०४७ पर्यंत 'विकसित भारत' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही निष्ठा लोकांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्त आणि आज साजरा होत असलेल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेमिकॉन इंडिया २०२६चं उद्घाटन करणार आहेत. या परिषदेत ५२ देशांचे प्रतिनिधी, ४०० हून अधिक कार्यकारी अधिकारी, १५० हून अधिक वक्ते आणि ६०० हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.

****

चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ कानडी अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. येत्या २२ तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे.

****

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला तीन महिन्यांची मुदत देत, आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत, आपला मुंबई दौराही रद्द केल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

मराठवाड्याचा विकास आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास…तुमसे ना हो पायेगा!’ हे जनआंदोलन सुरू आहे. या आंदोलनांतर्गत आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान, ठाकरे यांनी काल मुक्तीसंग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.

आज हैदराबाद मुक्तीदिनी आंदोलनाऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया, असं आवाहन धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. हा दिवस साधेपणाने साजरा व्हावा तसंच या ऐतिहासिक दिवशी समाजामध्ये कटुता निर्माण होईल किंवा सामाजिक वातावरणावर परिणाम होईल, अशी कोणतीही कृती करू नये असं आवाहन त्यांनी काल वार्ताहर परिषदेत केलं.

****

हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातल्या मन्नास पिंपरी इथं पावसाअभावी नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल पाहणी केली. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातल्या भरती परीक्षा प्रक्रियेबाबत सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यासाठी शासनानं गठित केलेल्या समितीनं काल नागपूर इथं स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. सुमारे दोन हजारावर विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्याचं, समितीच्या सचिव वी. राधा यांनी सांगितलं.

****

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात आलं. शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करावेत, एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि थकीत पीकविमा तात्काळ जमा करावा, अशी मागण्या शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केली.

****

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत परभणी इथं आज लाभार्थी मेळावा घेण्यात येणार आहे.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...