Saturday, 12 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.09.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 12 September 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.

****

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे मराठा समाज बांधवांसोबत आज आंतरवाली सराटी इथं बैठक घेणार आहेत. या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव रवाना झाले आहेत. बीडमधून ३ ते ४ हजार मोटारसायकल रॅलीचा ताफा अंतरवाली सराटीच्या दिशेने निघाला आहे. माजलगावसह जिल्ह्यातील विविध भागांतून समाजबांधव या रॅलीत सहभागी झाले असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

केंद्र शासनाच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खरीप पणन हंगाम २०२६-२७ साठी धान, तांदूळ, ज्वारी, मका तसंच अन्य तृणधान्यांच्या शासकीय खरेदीसाठी एकसमान गुणवत्ता विनिर्देश निश्चित केले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर, केवळ निर्धारित गुणवत्ता निकषांची पूर्तता करणारं धान्य स्वीकारलं जाणार आहे. शेतकऱ्यांनी धान्य स्वच्छ, पूर्णपणे वाळवून आणि दर्जेदार स्वरूपात खरेदी केंद्रावर आणावं, असं आवाहन नांदेडच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केलं आहे.

****

बीड जिल्ह्यातील १६४ प्रकल्पांमध्ये सध्या अवघा १६ पूर्णांक ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जलसंपदा विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सात मध्यम आणि ३७ लघु असे ४४ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. मध्यम प्रकल्पांत १५ पूर्णांक १५ तर लघु प्रकल्पांत केवळ ६ पूर्णांक ६८ टक्के साठा आहे. मागील वर्षी याच तारखेला जिल्ह्यात ८७ टक्क्याहून अधिक साठा होता. यंदाचा साठा गेल्या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ४१ टक्क्यांनी कमी आहे.

****

लातूर जिल्ह्यात कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी आयोजित विशेष शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेल्या  दोन दिवसांत १४२ अर्ज दाखल झाले. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात २१ विशेष शिबिरं घेण्यात आले. १७ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरांमध्ये येत्या काही दिवसात औसा, निलंगा, आणि लातूर तालुक्यात शिबिरं होणार आहेत. आज औसा तालुक्यातील औसा तालुक्यातील लामजना मंडळ आणि निलंगा तालुक्यातील औराद शहा तसंच पानचिंचोली मंडळांमध्ये शिबीरे होतील. उद्या लातूर तालुक्यातील चिंचोली मंडळातील भिसेवाघोली, औसा तालुक्यातील मातोळा आणि जळकोट तालुक्यातील वांजरवाडा मंडळात शिबीरे घेतली जातील. यानंतर १४ सप्टेंबरला औसा तालुक्यातील भादा मंडळ आणि जळकोट तालुक्यातील शेलदरा मंडळ इथं शिबिरांचं आयोजन करण्यात आले आहे.

****

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील टाकळी इथल्या विलास घुले यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज सकाळी टाकळी फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत शासनाने आज प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या कर्जमुक्ती यादीत धुळे जिल्ह्यातील ३ हजार ५९८ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यादीतील शेतकऱ्यांनी कर्ज थकबाकीची खातरजमा करून नजीकच्या आपले सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे आणि शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. धुळे जिल्ह्यातील दुसऱ्या यादीत जिल्हा बँकेशी संबंधित १५२ लाभार्थी आहेत.

****

नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी गोदावरी नदीमध्ये सोडले जाऊ नये, यासाठी सुरू असलेल्या गोदावरी रिव्हर फ्रंटच्या कामाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखणे ही अत्यंत गंभीर बाब असून, नदीमध्ये सांडपाणी सोडले जाणार नाही यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांचा आणि पर्यावरणीय नियमांचा विचार करून प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील महाविद्यालय तसंच विद्यार्थी स्तरावरील पात्र अर्ज जिल्हास्तरावर मंजुरीसाठी पाठविण्याकरिता जुनं महाडीबीटी पोर्टल कालपासून येत्या १५ तारखेपर्यंत पुन्हा सुरू करण्यात आलं असून, या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या लॉगिनमध्ये प्रलंबित असलेले केवळ पात्र शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ तपासून जिल्हास्तरावर वर्ग करावेत, असं आवाहन लातूरचे समाज कल्याण सहायक आयुक्त यादव गायकवाड यांनी केलं आहे.

****

महिला ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ५-१ असा पराभव केला. भारताकडून सुप्रियाने हॅट्ट्रिक केली, तर मधु आणि सुखवीर कौर यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीनचा सामना जपानशी होणार आहे. यापूर्वी पुरुषांच्या ज्युनियर आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने काल पहिल्या उपांत्य सामन्यात मलेशियाचा ३-१ असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले. कर्णधार अनमोल एक्का याने दोन, तर सुखविंदरने एक गोल केला. अंतिम सामन्यात भारताचा सामना उद्या दक्षिण कोरियाशी होणार आहे. दक्षिण कोरियाने काल सायंकाळी पाकिस्तानचा ४-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...