Saturday, 5 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      डीजे बंदीबाबत नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

·      मुदत संपलेल्या नियमबाह्य रिक्षांविरोधात पाच ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाईचे निर्देश

·      बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा-आमदार धनंजय मुंडे यांची मागणी

·      श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी-आज दहीहंडीचा थरार

·      जालना इथं ५ हजाराहून अधिक शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम

आणि

·      'चायना मास्टर्स' बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक-चिराग जोडीची उपांत्य फेरीत धडक

****

डीजे बंदीच्या मुद्द्यावर नागरिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. ध्वनिप्रदूषण कमी करून पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करणं हाच सरकार आणि प्रशासनाचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन आधी नागरिकांशी चर्चा करत असून त्यानंतर डीजेसंदर्भात आदेश काढले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

तंत्रज्ञान, जहाजबांधणी, वैद्यकीय सेवा यासह विविध क्षेत्रात सखोल भागीदारीचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांना केलं आहे. काल मुंबईत भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद सत्रात मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय सेवेसह इतर सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने गाठलेल्या पल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

दरम्यान, भारत आणि बेल्जियम यांच्यात सागरी क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्याचं आश्वासन बेल्जियमच्या पंतप्रधानांनी दिलं आहे. पंतप्रधान वेव्हर यांनी काल मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स इथं हिरे व्यापार क्षेत्रात कार्यरत उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमाला संबोधित केलं.

****

मुदत संपलेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांविरोधात पाच ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. काल मुंबईत परिवहन आयुक्त कार्यालयात विशेष बैठकीत ते बोलत होते. या रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले.

****

बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान होत असून, या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शासकीय सवलती लागू कराव्यात तसंच कृत्रिम पावसाचे प्रयोग राबवावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

****

मुंबईत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांने 'पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभाचं आयोजन केलं आहे. मुंबईत २९ सप्टेंबरला १० ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचं आवाहन मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे.

****

दिव्यांग रुग्णांना शासकीय, आणि निमशासकीय रुग्णालयांमधे निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने केली आहे. २००१ पर्यंत दिव्यांग रुग्णांना शासकीय रुग्णालयात केसपेपर शुल्क वगळता इतर उपचार निःशुल्क मिळत होते. मात्र नंतर शासन निर्णयान्वये ही सुविधा बंद झाली. या निर्णयात सुधारणा करुन दिव्यांग रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करुन द्यावेत, असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाखेरीज इतर न्यायालयातल्या न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय ६० वरुन ६२ वर्षे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश महाराष्ट्रासह ७ राज्यांनी मान्य केले आहेत. त्यानुसार या राज्यात यंदा ३१ मार्च रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांना, त्यांनी इतरत्र सेवा स्वीकारलेली नसल्यास पुन्हा पदावर रुजू होण्याची संधी मिळणार आहे.

****

श्रावण कृष्ण अष्टमी, अर्थात 'जन्माष्टमी' काल साजरी झाली. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा झाला, राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथे पैठण रस्त्यावर महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या इस्कॉन मंदिरासह इतर सर्व कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दहीहंडीचा सोहळा आज साजरा होईल. विविध राजकीय पक्ष तसंच संघटनांनी दहीहंड्या फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांची बक्षिसं जाहीर केली आहेत.

****

शिक्षक दिन आज साजरा होत आहे. माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने आज नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या निमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपतींनी शिक्षकांना आपल्या अध्यापनात नव तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्याचं आवाहन केलं आहे. मराठवाड्यातल्या अनेक शिक्षकांना यावेळी गौरवण्यात येणार आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शाळांमधील १२ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. येत्या १७ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

जालना इथं काल एकाच वेळी ५ हजार ३४८ जणांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जालन्यातल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर हा उपक्रम पार पडला. जिल्हाधिकारी आशिमा मत्तिल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन आणि अद्विक क्लब यांच्या समन्वयातून उपक्रम राबवण्यात आला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी काल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक घेतली. प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक सूचना देत, विसर्जन तलावांची व्यवस्था तसेच नवीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याबाबत राजूरकर यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला.

****

जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रशासनातर्फे विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या १० ते १६ सप्टेंबर दरम्यान सर्व तालुक्यांमध्ये ही शिबीरं घेण्यात येतील. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल नांदेड इथं बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. या मागण्यांसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं.

लातूर इथंही सकल मराठा समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा बांधवांनी दुचाकी वाहन फेरी काढली. दरम्यान, लातूर-बार्शी महामार्गावरील साखरपाटी इथं तरूणांनी रास्ता रोको केला. औसा शहरातही आंदोलकांनी तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं.

****

ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना शहरात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण, दीपक रणनवरे यांनी काल मागे घेतलं. निवासी जिल्हाधिकारी रामदास दौंड, तसंच तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी सदर मागण्यांबाबत पाठपुराव्याचं लेखी आश्वासन दिलं तसंच, मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मुंबईत बैठक घेण्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं. त्यानंतर रणनवरे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं.

****

परभणी जिल्हा पोलीसांनी वाहन चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला काल अटक केली. त्यांच्याकडून चारचाकी वाहनं तसंच एका मोबाईलसह ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिंतूर इथल्या एका वाहन चोरीचा तपास करताना, या आरोपींना पोलीसांनी कर्नाटक राज्यातील विजापूर इथून ताब्यात घेतलं. हे आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

****

मतदार यादी विशेष सखोल पुर्नरिक्षण मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यासंदर्भात काल परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडलं. दावे आणि हरकती तसंच नो मॅपिंग, अनोमली प्रकारातील मतदारांच्या सुनावणी कागद पडताळणीबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. या टप्प्यात महत्त्वाची कामेही अधिक दक्षतेने आणि अचूक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या.

****

अंबाजोगाई इथल्या अमृत-२ मॅरेथॉन स्पर्धेच्या विजेत्या रमाबाई रणवीर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट घेतली. मुलींच्या शिक्षणासाठी धावलेल्या रमाबाई यांना सरकारी योजनांचे लाभ मिळतील याची खातरजमा करण्याची सूचना रहाटकर यांनी अधिकाऱ्यांना केली. स्वतःला दोन महिन्यांपूर्वी मिळालेली पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कमही रहाटकर यांनी रमाबाईं यांना दिली.

****

'चायना मास्टर्स' बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने पुरुष दुहेरी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्विक चिराग जोडीने डेन्मार्कच्या प्रतिस्पर्धी जोडीचा २१-१३, १६-२१, २१-१८ असा पराभ केला. आज संध्याकाळी होणाऱ्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या जोडीशी त्यांची लढत होणार आहे. पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतचं आव्हान मात्र काल संपुष्टात आलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...