Wednesday, 9 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 09 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०९ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधानांच्या राजकीय जीवनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त भाजपचं सेवा संकल्प अभियान

·      अत्यंत वर्दळीच्या सात रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला मंजुरी;दिल्ली-मुंबई-चेन्नई-कोलकाता या सुवर्ण चतुष्कोणी रेल्वेमार्गाचा समावेश

·      तंत्रज्ञानातील क्षमतांचं प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतर ही काळाची गरज-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      मराठा समाजाच्या ८० टक्के मागण्या पूर्ण-चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं सरकारकडून आवाहन

आणि

·      राष्ट्रीय पोषण माह २०२५ अंतर्गत हिंगोली जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांक

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या ७ ऑक्टोबर रोजी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्ष येत्या १७ तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवणार आहे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली. या अभियानात नागरिकांनी किमान २५ मिनिटं श्रमदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले -

बाईट - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन

या 'सेवा संकल्प अभियान'ची सुरुवात रक्तदान शिबिराच्या आयोजनाने होईल. पंतप्रधानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ७ ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी 'सेवा ज्योती कलश यात्रा' काढली जाणार असल्याचंही नवीन यांनी सांगितलं.

****

देशभरातल्या अत्यंत वर्दळीच्या सात रेल्वे मार्गांच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. यामध्ये दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, चेन्नई-कोलकाता आणि कोलकाता-दिल्ली सुवर्ण चतुष्कोणी रेल्वेमार्गाचा समावेश आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले –

बाईट - माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

रेल्वेच्या एकूण वाहतुकीपैकी सुमारे ४० टक्के वाहतूक या सात मार्गांवरून होते आणि याअंतर्गत सुमारे दोन हजार किलोमीटर रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम या आधीच पूर्ण झालेलं आहे. मंत्रिमंडळाने एकूण १० हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या तीन 'मल्टी-ट्रॅकिंग' रेल्वे प्रकल्पांनाही आज मंजुरी दिली.

दरम्यान, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन वर्षभरात सुरू होईल, सुरत ते वापी हा शंभर किलोमीटरचा मार्ग सर्वप्रथम खुला होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं.

****

एजेंटिक एआय आणि क्वांटम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वित्तीय समावेशनाला नवी दिशा मिळणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत जिओ सेंटर इथं सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता अधोरेखित केली. तंत्रज्ञानातील क्षमता प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतरित करणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी, डेल्टा ॲक्टबाबत माहिती दिली. ते म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाचे ५० वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या नियुक्तीपूर्वी न्यायमूर्ती त्रिपाठी हे अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत होते. दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून आज शपथ घेतली. तर न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंग भाटी यांनी जम्मू - काश्मीर आणि लदाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज शपथ घेतली.

****

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना युनायटेड किंगडमच्या संसदेत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिंदे यांना लंडनच्या संसदेत हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशीप तर हाऊस ऑफ कॉमन्समध्ये स्टेट्समनशिप अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राबवलेल्या विविध योजनांकरता शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरता उपमुख्यमंत्री शिंदे काल लंडनला रवाना झाले.

****

राज्यात २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या ऊस गळीत हंगाम बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. राज्यासह देशभरात साखरेचा तुटवडा निर्माण होऊन झालेल्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगामाच्या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झालं होतं.

****

स्वातंत्र्याच्या लढ्यात कोवळ्या वयात आहुती देणाऱ्या नंदुरबारमधल्या बाल हुतात्म्यांना आज त्यांच्या ८४ व्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. शिरीषकुमार मेहता, लालदाद शहा, धनसुकलाल वाणी, शशीधर केतकर आणि घनश्यामदास शहा या पाच लहान मुलांनी काढलेल्या मोर्चावर इंग्रजांनी बेछुट गोळीबार केला होता, त्यात या सर्वांना हौतात्म्य आलं होतं. प्रशासनाच्या वतीनं नंदुरबार इथल्या हुतात्मा चौकात पोलीस दलातर्फे आज मानवंदनाही देण्यात आली.

****

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची भूमिका अत्यंत लवचिक असून, आतापर्यंत मराठा समाजाच्या तब्बल ८० टक्के मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत, असं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी मागण्यांबाबतचा ताठरपणा सोडून चर्चेचा मार्ग स्वीकारावा, असं आवाहनही महाजन यांनी केलं. राज्यातली संभाव्य दुष्काळ परिस्थिती आणि सणासुदीच्या काळात मुंबईत आंदोलन करु नये, असही महाजन म्हणाले.

****

जात प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये जात प्रमाण पत्राच्या वाटपात शून्य प्रलंबित्व ठेवण्यासाठी प्रशासनाने आज मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील प्रांत अधिकारी आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले. उद्या १० सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाड्यात यासाठी विशेष शिबीरांचं आयोजन करण्यात येत असून एकही प्राप्त अर्ज निर्णयाविना शिल्लक राहणार नाही, असे उद्दिष्ट देण्यात आलं आहे. या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड यांच्यासह विभागीय आयुक्त जी श्रीकांत उपस्थित होते. तर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दूरदृष्य संवाद पद्धतीने सहभागी झाले. या कामाची अद्ययावत आकडेवारी दररोज प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवून कार्यपद्धतीत सुधारणा कराव्यात, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

****

राष्ट्रीय पोषण माह २०२५ अंतर्गत हिंगोली जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील १ हजार १९७ अंगणवाडी केंद्रांवर राबवलेल्या विविध उपक्रमांची पोषण माहच्या अधिकृत पोर्टलवर नोंद करण्यात आली. या कामगिरीबद्दल परवा ११ सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा बिडकीन ते ढोरेगाव इंडस्ट्रियल ग्रीनफिल्ड महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. भूसंपादनापूर्वीची जमीन मोजणी प्रक्रिया युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असून, येत्या दहा दिवसांत ती पूर्ण केली जाणार असल्याचं उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांनी सांगितलं.

****

व्हीबी-जी राम जी योजनेतल्या तांत्रिक त्रुटी, प्रणालीतील अडचणी आणि त्यातून ग्राम रोजगार सेवकांवर होणारे आरोप या विरोधात बीड जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्ह्यात १५ ते २० रोजगार सेवकांवर हल्ले झाल्याचं संघटनेनं नमूद केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन आणि निदर्शने करण्याचा इशारा ग्राम रोजगार सहायक संघटनेनं दिला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात येत्या १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलं आहे. या खंडपीठ अधिकाराक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मराठवाड्यासह अहिल्यानगर, धुळे, आणि जळगाव जिल्हा न्यायालयांच्या अंतर्गत येणाऱ्या तालुका न्यायालयातही राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पक्षकारांनी संबंधित न्यायालयाल किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

No comments:

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...