Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त
नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय
शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात देशभरातील ४८ शालेय शिक्षकांना राष्ट्रीय
शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील चार शालेय शिक्षक आणि
तीन उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांचा समावेश आहे.
****
"शिक्षकांनी
केवळ पुस्तकी अभ्यासापुरतं मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला
दिशा देण्यासाठी आणि त्यांचं बालपण सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी"
असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी
दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
विद्यार्थ्यांमधील बालपण जिवंत ठेवण्यासाठी शिक्षकांनी स्वःतमधलं बालपण जपायला हवं, असा सल्ला
त्यांनी दिला. यावेळी पंतप्रधानांनी मुलांमधील वाढत्या डिजिटल 'स्क्रीन टाईम'बद्दल चिंता
व्यक्त करत, मैदानी खेळ आणि सर्जनशील उपक्रमांना चालना देण्याचं शिक्षकांना सुचवलं तसंच, अंमली पदार्थांच्या
धोक्याबाबत सतत जागृती करण्याची गरजही पंतप्रधानांनी व्यक्त केली.
****
राष्ट्रीय परीक्षा संस्था
'एनटीए' ने ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र विषयांच्या
पुनरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. प्रश्नपत्रिकेतील त्रुटींनंतर ही परीक्षा
पुन्हा घेतली जात आहे. उमेदवारांनी विद्यापीठ अनुदान आयोग-'युजीसी' च्या अधिकृत
संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
****
राज्यात स्थानिक स्वराज्य
संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झालं असताना मंत्रिमंडळात असलेल्या छगन भुजबळ
यांनी आता केवळ भूमिका मांडण्याऐवजी रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढावं, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी
म्हटलं आहे. नागपूर इथं आज ते बोलत होते.
केवळ मंत्रिमंडळात राहून ओबीसी
समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी संघर्ष करावा लागेल, असंही वडेट्टीवार
म्हणाले. वडेट्टीवार यांनी यावेळी राज्यातल्या पेपरफुटीच्या घटना, डीजे वापराबाबत
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय, गणेशोत्सव काळात लेझरचा वापर आदी मुद्द्यांवरुन सरकारवर
टीका केली. सरकारने स्पष्ट आणि समान नियम लागू करावेत. उत्सव उत्साहात साजरा करावा, मात्र कायद्याचं
उल्लंघनही करु नये, असं वडेट्टीवार म्हणाले.
****
बिहारमधील १४ जिल्ह्यांमध्ये
८ पुर्णांक पाच लाखांहून अधिक लोक पुराच्या विळख्यात सापडले आहेत. पुनपुन घाटावर रेल्वे
रुळांवर पुराचे पाणी साचल्याने पटना-गया रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक पुढील
आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे.
****
केरळच्या त्रिशूर जिल्ह्यात
एका भीषण रस्ते अपघातात अभियांत्रिकी शाखेच्या आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. काल
रात्री कैपमंगलम् इथल्या पनंबिक्कुन्नू इथं ही घटना घडली. गुरुवायूरहून कोडुंगल्लूरकडे
तरुणांना घेऊन जाणारी कार महामार्गावर उभ्या ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला.
****
'ऑपरेशन चक्र'च्या सहाव्या
आवृत्ती अंतर्गत केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयने काल; 'डिजिटल अरेस्ट' म्हणजेच आभासी
नजरकैदेशी संबंधित तीन मोठ्या प्रकरणांमध्ये देशभरात धडक कारवाई केली आहे. सीबीआयने
२० राज्यांमधील एकोणनव्वद ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि तिघांना अटक केली. या तिघांनी
एकंदर ४२ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.
****
यंदाचा मिस वर्ल्ड म्हणजेच
जागतिक सौंदर्यवती स्पर्धेचा अंतिम सोहळा आज सायंकाळी व्हिएतनाममधील न्हा ट्रांग या
किनारपट्टीच्या शहरात होणार आहे. या स्पर्धेत एकूण १११ स्पर्धक सहभागी झाल्या आहेत.
गतवर्षीची मिस वर्ल्डची विजेती, थायलंडची सुचाता चुआंगश्री, नवीन विजेतीला मुकुट घालणार
आहे. भारताचे प्रतिनिधित्व २०२४ मध्ये पार पडलेल्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड विजेती
निकिता पोरवाल करत आहे.
****
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवरून
महाराष्ट्र अंडर प्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशन-‘मुप्टा’ या संघटनेच्या वतीने लातूर, नांदेड आणि
धाराशिव विभागातील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी लातूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक
कार्यालयासमोर काल धरणे आंदोलन करण्यात आलं. एसएलपी म्हणजेच विशेष अनुमती याचिका शासनाने
तातडीने मागे घ्यावी, तसंच जुनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी आदी मागण्या
आंदोलकांनी केल्या.
****
महिलांच्या टी-ट्वेंटी आशिया
करंडक क्रिकेट स्पर्धेत, आज 'अ' गटाच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाची लढत पाकिस्तानच्या
संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता दुबई आंतरराष्ट्रीय
मैदानावर हा सामना होईल. भारताने यापुर्वीचे दोनही सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली
आहे.
****
कोकणात आज बहुतांश ठिकाणी
तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र
आणि मराठवाडयातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment