Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20
September 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० सप्टेंबर २०२६ दुपारी १.०० वा.
****
भारताची नेमबाज इलावेनिल वलारिवन हिनं जपानमधील आयची-नागोया
इथं सुरू असलेल्या विसाव्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या १० मीटर एअर रायफल
प्रकारात रौप्य पदक पटकावलं. तिनं आजच्याच दिवशी आधी जिंकलेल्या सांघिक रौप्य पदकापाठोपाठ
हे वैयक्तिक रौप्य पदक देशाच्या खात्यात जमा केलं.
२०२५ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या
इलावेनिलनं अंतिम फेरीत २५२ पूर्णांक ४ गुण मिळवून दुसरं स्थान पटकावलं. या प्रकारात
जपानच्या हिनाता ताईचीनं २५३ गुणांचा नवा विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. त्यापूर्वी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताचं पहिलं पदक निश्चित करताना
इलावेनिल वलारिवन, सोनम मसकर आणि विदर्सा
विनोद यांनी महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताला रौप्य पदक मिळवून
दिलं. यात चीननं एक हजार ९०४ पूर्णांक २ च्या एकूण गुणांसह सुवर्णपदक पटकावलं, तर भारतानं एक हजार ८९७ गुणांसह दुसरं स्थान जिंकलं. भारताच्या
महिला हॉकी संघानं आज उझबेकिस्तानवर एकोणीस शून्य असा दणदणीत विजय मिळवला. फॉरवर्ड
दीपिका शेरावत या सामन्याचं मुख्य आकर्षण ठरली; तिनं आठ गोल केले. तसंच इषिका चौधरीनं हॅट्ट्रिक पूर्ण केली.
टेबल टेनीसमध्ये भारतीय महिला संघानं साखळी गटातील सामन्यात इंडोनेशियाचा तीन शुन्य
असा पराभव केला. स्पर्धेतील 'टेकबॉल' प्रकारात भारताचं आव्हान पदकाविना
संपुष्टात आलं असून कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या मिश्र दुहेरी जोडीला व्हिएतनामविरुद्ध
पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय महिला क्रिकेट संघानं बांग्लादेशसमोर
विजयासाठी १९६ धावांचं कठीण लक्ष्य ठेवलं आहे. शेफाली वर्माच्या नाबाद १०० धावांच्या
जोरावर भारतानं निर्धारित वीस षटकांत चार बाद १९५ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं
तेंव्हा बांगलादेशच्या अकराव्या षटकात पाच बाद ५५ धावा झाल्या आहेत.
****
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर धारकांना लागू असलेल्या
अनुदानासह नियंत्रित किरकोळ विक्री दर-आरएसपी सह सिलेंडर घेतांना आता येत्या एक ऑक्टोबरपासून
बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात येणार आहे. यासाठी सिलेंडर वितरणावेळी, वितरकाच्या कार्यालयात अथवा संबंधीत भ्रमण ध्वनी ॲप्सवर
प्रमाणीकरण करता येऊ शकणार आहे. दरम्यान, एकंदर जवळपास २७ कोटी, ४३ लाख ग्राहकांनी अर्थात एकंदर एकोणनव्वद टक्क्यांहून जास्त
ग्राहकांचं प्रमाणीकरण पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. प्रत्येक घरगुती वापराची गॅस जोडणी
आधार-प्रमाणित ग्राहकाशी संलग्नतेमुळे त्याचा व्यावसायिक - औद्योगिक कारणासाठीचा गैरवापर
रोखण्यासह दुबार- अपात्र जोडण्या रद्द होऊन अनुदान वितरणात पारदर्शकता आणण्याचा उद्देश
आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्ली येथे
‘द फ्युचर ऑफ एन्व्हायरनमेंट अँड क्लायमेट डायनॅमिक्स’ अर्थात पर्यावरण आणि हवामान गतिशीलतेचे भविष्य या विषयावरच्या
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करतील. या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन
राष्ट्रीय हरित लवादद्वारे करण्यात आलं आहे.
****
पंजाब पोलिसांनी या आठवड्यात अमृतसर आणि फरीदकोट या सीमावर्ती
जिल्ह्यांमध्ये विविध कारवाया करून, सीमापार हेरॉइन तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्यांकडून १०१
किलो हेरॉइन जप्त केलं आहे. पोलिसांनी आज फरीदकोटमध्ये एका टोळीच्या चार म्होरक्यांना
अटक करून, शस्त्रास्त्रं आणि दारूगोळ्यासह
४७ किलोपेक्षा जास्त हेरॉइन जप्त केलं. त्यांच्या ताब्यातून ३ पिस्तूल, १५ जिवंत काडतुसे आणि २ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
काल, अमृतसरच्या पोलिसांच्या गुप्तचर
विभागानं सीमापार अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आणखी एका टोळीचा पर्दाफाश केला आणि
१७ किलो हेरॉइनसह त्यांच्या तीन मुख्य म्होरक्यांना अटक केली. तर १६ आणि १८ सप्टेंबर
रोजी अमृतसरमधील इतर दोन कारवायांमध्ये ३७ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी
एका पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह चार आरोपींनाही अटक केली आहे.
****
अकोला इथं कृषी विद्यापीठात, आज सकाळी विभागीय आढावा बैठकीत जिल्हानिहाय पिक नुकसानीचा आढावा
घेण्यात आला. पालकमंत्री आकाश फोनकर यांच्यासह, या बैठकीला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उद्योग आणि बांधकाम मंत्री राज्यमंत्री इंद्रानिल नाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह अकोला-अमरावती-
यवतमाळ -बुलढाणा आणि वाशिम या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या
परिसरात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या
घोषणा दिल्यानंतर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ज्येष्ठ पत्रकार पायल मेहता यांचं आज पहाटे मुंबईत निधन
झालं. त्या ४६ वर्षांच्या होत्या. शहरात भेटीसाठी आलेल्या मेहता यांना पहाटे अचानक
अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र
मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ
सिंह तसंच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त
केला आहे.
****
No comments:
Post a Comment