Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 September 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६.१०
****
· रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय
मंत्रिमंडळाची मंजुरी
· प्रवासी वाहनांसाठी केंद्राकडून नवीन कॉर्पोरेट ऍव्हरेज फ्युएल
इकॉनॉमी अधिसूचना जारी
· पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश-जलसंपदा
मंत्र्यांचीही आढावा बैठक
· दुष्काळी तालुक्यात १०वी तसंच १२वीच्या विद्यार्थ्यांचं आगामी
परीक्षांचं शुल्क माफ
· किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना लातूर जिल्हा प्रशासनाकडून
अभिवादन
आणि
· आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची आज चार सुवर्ण पदकांची कमाई
****
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीने रबी हंगामासाठी
पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी
दिल्ली इथं बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.
करडईच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल ६७५ रुपयांची सर्वाधिक वाढ करण्यात आली
आहे. मोहरी आणि खसखशीच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल ४१३ रुपये, मसूरसाठी प्रतिक्विंटल ३९० रुपये, बार्ली १३६ रुपये, हरभरा ८३ रुपये आणि गव्हासाठी प्रतिक्विंटल २५ रुपये इतकी किमान आधारभूत मूल्यातील
वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - माहिती
आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘ग्रीन
एनर्जी कॉरिडॉर’
हरित ऊर्जा मार्गिकेच्या तिसऱ्या टप्प्यालाही मंजुरी दिली. यामुळे
आंतरराज्य पारेषण यंत्रणा बळकट होईल आणि विविध राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांदरम्यान
१३५ गिगावॅटपर्यंतच्या अक्षय ऊर्जेचे पारेषण करणं शक्य होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट ऍव्हरेज फ्युएल
इकॉनॉमी म्हणजेच C A F E मानकांची अधिसूचना जारी केली
आहे. देशातंर्गत उत्पादित प्रवासी वाहनं तसंच विक्रीसाठी आयात केलेल्या वाहनांनासुद्धा
ही मानकं लागू असतील. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन
कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. ही नवी मानकं एप्रिल-२०२७ पासून आताच्या
मानकांची जागा घेतील आणि ती ३१ मार्च २०३२ पर्यंत लागू असतील.
****
एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित
अनियमिततेसंदर्भात आज इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक झाली. या
बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ
नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या
अध्यक्ष ममता बॅनर्जी, समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इत्यादी पक्षांचे नेते उपस्थित होते.
****
दरम्यान, शुद्ध मतदार यादी हा लोकशाहीचा
आत्मा असल्याचं,
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. मतदार यादी
सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या विरोधात असलेल्या विरोधकांच्या भूमिकेसंदर्भात आज नवीदिल्लीत
घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मतदार यादीचं शुद्धीकरण करण्यास आक्षेप घेण्याचं
कारण काय,
असा प्रश्न चौहान यांनी विचारला –
बाईट - केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान
****
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर
नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. छत्रपती
संभाजीनगर,
नाशिक आणि पुणे विभागातील संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने आज
मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे १५ ऑक्टोबरपर्यंत
पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीने रोखण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक
घेतली. विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेऊन, कामातले अडथळे तातडीने दूर करून प्रकल्पांच्या
कामांना गती देण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या.
ज्या ज्या धरणात पिण्याचे मुबलक पाणी असेल अशा धरणातील पाण्याच्या नियोजनाचा
निर्णय घेणार असल्याचं, विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
****
राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा अशी मागणी काँग्रेसचे नाना
पटोले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. दुष्काळी परिस्थिती, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आयोगाची भूमिका आणि
सचिन वाझे यांच्या जामीन प्रकरणावरून पटोले यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार
हल्लाबोल केला.
****
दरम्यान, अँटिलीया बॉम्ब प्रकरणात सचिन
वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता
स्थगित केला आहे. विशेष न्यायालयानं वाझे याला जमीन मंजूर केला होता, परंतु राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं या जामिनाला आव्हान दिलं होतं.
****
तरुणांचं संशोधन राज्याला जगाचं ‘इनोव्हेशन
हब’
करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत ‘द गव्हर्नन्स चॅलेंज’ स्पर्धेच्या विजेत्यांना
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही स्पर्धा म्हणजे राज्यासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला
आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद
केलं.
****
राज्यातल्या दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमधल्या १०वी आणि १२वीच्या
विद्यार्थ्यांचं आगामी फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांचं शुल्क माफ
करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेता परीक्षा अर्ज भरून घेण्याच्या
सूचना राज्य शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत. सर्व विभागीय मंडळांनी
आपापल्या कार्यक्षेत्रात दुष्काळग्रस्त तालुक्यांतल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना
तत्काळ सूचना द्याव्या, आणि कार्यवाहीचा अहवाल राज्य
मंडळाकडे तातडीने सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत.
****
किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना आज लातूर जिल्हा प्रशासनाच्या
वतीने अभिवादन करण्यात आलं. ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या या प्रलयकारी भूकंपाला
आज ३३ वर्षे झाली. किल्लारी इथं स्मृतीवनातल्या स्मृतीस्तंभाला जिल्हाधिकारी डॉ.भारत
बास्टेवाड,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी
पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून
अभिवादन करण्यात आलं. किल्लारीसह भूकंपग्रस्त गावांमध्ये आज काळा दिवस पाळण्यात आला.
****
जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आज
चार सुवर्ण पदकांची कमाई केली. तीरंदाजीत ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तनिपार्थी आणि प्रथिका प्रदीप यांच्या संघाने सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
साहिल जाधव-चिकिता तनिपार्थी यांच्या मिश्र कंपाउंड जोडीनेही सुवर्ण पदक पटकावलं. तिरंदाजीत
पुरुषांच्या कंपाउंड संघाने देखील सुवर्ण पदक पटकावलं. नेमबाजीत ट्रॅप मिश्र प्रकारात
नीरु धांडा आणि चिनान केनाई यांच्या जोडीने सुवर्ण पदक जिंकलं.
मुष्टियुद्धात महिलांच्या ६० किलो वजनी गटात प्रिया घंघासने
कांस्य पदक जिंकलं. ७५ किलो वजनी गटात लव्हलिना बोर्गोहेन हिने अंतिम फेरीत धडक मारली
आहे.
स्क्वॅशमध्ये महिला संघाने सिंगापूरचा दोन - शून्य असा पराभव
करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. कुस्तीमध्ये पुरुषांच्या ८७ किलो वजनी गटात सुनील
कुमारने कांस्यपदक जिंकलं. शंभर मीटर रिले स्पर्धेतही भारताच्या मिश्र संघाने कांस्यपदक
पटकावलं.
भारत आता या स्पर्धेत दहा सुवर्ण, २१
रौप्य आणि २९ कांस्य पदकांसह ६० पदकं जिंकून आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचं ४६वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात बनसारोळा इथे श्री बनेश्वर शिक्षण संस्थेत होणार आहे. तर दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनासाठी
गेवराई इथल्या बालग्राम परिवाराच्या निमंत्रणाचा कार्यकारिणीने स्वीकार केला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव
ठाले पाटील यांनी आज या दोन्ही संमेलनाची घोषणा केली. दोन्ही संमेलनाच्या तारखा लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत.
****
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करण्याच्या
मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले इथं
मोर्चा काढण्यात आला, राज्यात या मागणीसाठी सर्वत्र आंदोलन करण्यात
आल्याची माहिती डॉ अजित नवले यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात वलांडी इथं अवैध सावकारीविरोधात
सहकार विभाग आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई केली. पांडुरंग पांचाळ हे अवैध सावकारी
करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तीन ठिकाणी धाडी टाकत कारवाई केल्याचं
सूत्रांनी सांगितलं.
****
सेवा संकल्प अभियानांतर्गत आज जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात
योग आणि ध्यान शिबिर घेण्यात आलं. योगसाधक प्रल्हाद हरबक यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेलं महत्त्व सांगितलं.
यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासने, प्राणायाम
आणि ध्यानाचे प्रात्यक्षिक केलं.
****
‘सेवा संकल्प अभियान-२०२६’ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
भीमनगर आरोग्य केंद्रात आज रक्तदान शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात २२ जणांनी रक्तदान
केलं.
****
हवामान
कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे. उद्याही या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह
पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment