Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 September
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
सरकारी
सेवेतल्या युवकांनी विकसित भारताच्या प्रवासाला बळ द्यावं-२० व्या रोजगार
मेळाव्यात पंतप्रधानांचं आवाहन
·
छत्रपती
संभाजीनगर महसूल विभागात दुष्काळसदृश्य परिस्थितीचा कृषीमंत्र्यांकडून
आढावा-शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचं
आश्वासन
·
बीड-पुणे
रेल्वेसेवा येत्या २३ सप्टेंबरपासून नियमित सुरू होणार
आणि
·
२०
व्या आशियाई क्रीडास्पर्धेचं औपचारिक उद्घाटन; महिला क्रिकेटमध्ये आज भारत
- बांग्लादेश सामना
****
सरकारी सेवांमध्ये रुजू झालेल्या युवकांनी, विकसित
भारताकडे सुरू असलेल्या प्रवासाला बळ देणारे निर्णय घ्यावेत, असं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल २० व्या राष्ट्रीय रोजगार
मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्त ५१ हजार युवकांना
नियुक्तीपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वाटप केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. ते
म्हणाले..
बाईट
- पंतप्रधान
नरेंद्र मोदी
देशात विविध ४५ ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडले. केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं, सहकार राज्यमंत्री मुरलीधर
मोहोळ यांनी पुण्यात,
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाण्यात तर युवा
व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मुंबईत युवकांना नियुक्तीपत्रं
प्रदान केली.
****
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून
देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी
दिलं. काल नांदेड इथं,
छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातल्या आठही जिल्ह्यातल्या
दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. मुदतपूर्व पीक कापणी
प्रयोग काळजीपूर्वक तसंच अचूकपणे तातडीने पूर्ण करावेत. या प्रक्रियेत कोणत्याही
त्रुटी राहणार नाहीत,
याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे
निर्देश भरणे यांनी दिले. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, राज्यमंत्री
मेघना बोर्डीकर,
नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, लातूरचे
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, यांच्यासह विभागातले
बहुतांश लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित
होते.
मराठवाड्यातल्या ७६ तालुक्यांमध्ये अपुरा पाऊस तसंच
पावसातील खंडामुळे पीक नुकसान, चारा टंचाई तसंच पिण्याच्या पाण्याची
टंचाई सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करण्याची
सूचना भरणे यांनी यंत्रणेला दिली. लोकप्रतिनिधींनी विविध विषयांबाबत मांडलेल्या
सूचनांची नोंद घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासही त्यांनी सांगितलं. ऊर्जा
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी बोलतांना, सध्या सुरू झालेलं
वीज भारनियमन तातडीनं मागे घेणार असल्याचं, जाहीर केलं.
दरम्यान, या बैठकीनंतर भरणे यांनी नांदेड तसंच
हिंगोली जिल्ह्यात प्रत्यक्ष शेतावर जाऊन पावसाअभावी करपून गेलेल्या पिकांची पाहणी
केली.
****
हिंगोली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर
झाल्याचा दावा करणारी समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेली यादी बनावट आहे. शेतकरी
आणि नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असं प्रशासनाकडून स्पष्ट
करण्यात आलं आहे. या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसंच त्या कोणालाही
पाठवू नयेत,
असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५
वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा
आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य
करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या
माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या
कार्यातून होत आहे. या दृष्टिकोनाचं स्वच्छ भारत मिशन या अभियानाच्या माध्यमातून
प्रत्यक्ष कृतीत झालेलं रूपांतर दर्शवणारं उदाहरण आपण जाणून घेणार आहोत...
बाईट
– स्वच्छ भारत मिशन
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या १४५ व्या जयंतीच्या औचित्याने २ ऑक्टोबर २०१४ रोजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत मिशन महत्त्वाकांक्षी
आणि व्यापक मोहिमेला प्रारंभ झाला. उघड्यावर शौचापासून मुक्ती, कचरा व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत जनजागृती, आणि सार्वजनिक
आरोग्यमान सुधारणे,
हे या मोहिमेचे मुख्य उद्देश आहेत
हे
अभियान देशभरात प्रभावीपणे राबवण्यासाठी त्याचे स्वच्छ भारत मिशन शहरी आणि स्वच्छ
भारत मिशन ग्रामीण,
असे दोन भाग करण्यात आले आहेत. एक कदम स्वच्छता की ओर हे या
मोहिमेचं बोधवाक्य तर गांधीजींचा चष्मा हे या मोहिमेचं बोधचिन्ह आहे.
या
अभियानात देशात दरवर्षी 'स्वच्छ सर्वेक्षण' आयोजित केलं जाते, ज्यामध्ये देशातील सर्वात
स्वच्छ शहरांना तसंच राज्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं.
पहिल्या
टप्प्यात भारत 'उघड्यावरील शौचापासून मुक्त' केल्यानंतर, आता या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू आहे. या दुसऱ्या टप्प्यात गावं आणि शहरं 'उघड्यावरील शौचापासून मुक्तीसोबतच संपूर्ण कचरामुक्तीवर विशेष भर दिला जात
आहे. यामध्ये प्लास्टिक बंदी, सांडपाणी प्रक्रिया
आणि कचऱ्याचं वर्गीकरण या प्रमुख मुद्यांवर अधिक लक्ष दिलं जात आहे. केंद्र
सरकारने १ एप्रिल २०२६ पासून अद्ययावत 'घनकचरा व्यवस्थापन
नियम,
२०२६', लागू
केले असून,
याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती
संभाजीनगर.
****
बीड-पुणे रेल्वेसेवा येत्या २३ सप्टेंबरपासून नियमित सुरू
होत आहे. ही रेल्वे बीडहून रात्री साडे नऊ वाजता सुटून पुणे जंक्शन इथं सकाळी पाच
वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पुण्याहून रात्री पावणे
अकरा वाजता सुटून बीडला सकाळी सहा वाजता पोहोचेल.
****
दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका
अभियानाअंतर्गत परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या सुषमा सातपुते यांनी प्रगती साधली
आहे. आपल्या या प्रवासाबद्दल त्यांनी आकाशवाणीशी बोलतांना अधिक माहिती दिली....
बाईट
- सुषमा
सातपुते
****
जपानमध्ये काल २० व्या आशियाई क्रीडास्पर्धेचं औपचारिक
उद्घाटन झालं. भारताच्या ५०१ सदस्यीय पथकाचं नेतृत्व दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती
मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. या स्पर्धेत भारताच्या महिला
क्रिकेट संघाचा आज बांग्लादेशबरोबर सामना होणार आहे.
****
तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी काल धाराशिव
तालुक्यातल्या उपळा या गावातल्या पिकांची पाहणी केली. दुष्काळी परिस्थितीवर मात
करण्यासाठी पेयजलाचे टँकर उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनीही मुख्यमंत्र्याकडे निवेदन सादर करून, धाराशिव
जिल्हा दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदतीचे पॅकेज देण्याची मागणी केली
आहे.
****
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर सात जणांना लातूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरुन पायउतार होण्याचे आदेश
रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. संचालक
पदाच्या १० वर्षाच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळं बँकेनं हे आदेश दिले. मुंबई
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या
याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
****
हवामान
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी २२ सप्टेंबरपर्यंत
पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या काळात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी वादळी, काही
ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
No comments:
Post a Comment