Saturday, 12 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      जागतिक नवोपक्रमांसाठी ब्रिक्स देश हे प्रमुख केंद्रं म्हणून उदयास येत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन; १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ

·      ग्राहकहिताकडे दुर्लक्ष न करता तंत्रज्ञानाचा अवलंब करावा-ग्लोबल Fintech फेस्टच्या समारोप सत्रात केंद्रीय अर्थमंत्र्याचं आवाहन

·      युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप-तीव्र आंदोलनाचा इशारा

·      नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता अपघातात ९ जणांचा मृत्यू

आणि

·      कुणबी जात प्रमाणपत्रासाठीच्या विशेष शिबीरांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

****

जागतिक नवोपक्रम आणि उपाययोजनांसाठी ब्रिक्स देश हे प्रमुख केंद्रं म्हणून उदयास येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत 'भारत मंडपम' इथं ब्रिक्स बिझनेस फोरमच्या नेतृत्व सत्राला ते काल संबोधित करत होते. सध्या जगाच्या लोकसंख्येपैकी ५० टक्के असलेल्या ब्रिक्स देशांचा जागतिक जीडीपीमध्ये ४० टक्के आणि जागतिक व्यापारामध्ये २५ टक्क्यांहून अधिक वाटा असल्याचं, मोदी यांनी नमूद केलं. जागतिक जीडीपीमध्ये साधारणपणे अडीच पटीने वाढ झाली असताना, ब्रिक्स देशांच्या एकत्रित जीडीपीमध्ये मात्र जवळपास साडेचार पटीने वाढ झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं, ते म्हणाले...

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

दरम्यान, १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ होत आहे. भारत मंडपम् इथं आयोजित होणाऱ्या या दोन दिवसीय शिखर परिषदेत ११ प्रमुख विकसनशील आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्था एकत्र येणार आहेत. या परिषदेत विविध विषयांवर सकारात्मक आणि फलदायी चर्चा होईल, जागतिक कल्याण हाच या परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

****

सुरक्षा आणि ग्राहकहिताकडे दुर्लक्ष न करता नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. काल मुंबईत ग्लोबल Fintech फेस्टच्या समारोप सत्रात त्या बोलत होत्या. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही दुधारी तलवार असल्याने तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग कमी न करताना सुरक्षेची काळजी घेण्याचं आवाहनही सीतारामन यांनी यावेळी केलं.

****

'बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट, २०२६' येत्या १ ऑक्टोबरपासून अंमलात येणार आहे. राष्ट्रपतींनी १३ ऑगस्ट रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती. हा नवीन कायदा १८९१ च्या 'बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट'ची जागा घेईल. या कायद्यांतर्गत बँकेच्या नोंदींचा कोणताही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल रेकॉर्ड, पुरावा म्हणून ग्राह्य, आणि कायदेशीररित्या अंमलबजावणीयोग्य असेल.

****

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने बँक कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काल आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर इथे अनेक कर्मचारी या संपात सहभागी झाले. नांदेड जिल्ह्यातील विविध बँकांतील ४०० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही काल सहभाग नोंदवला.

बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील सार्वजनिक बँकांचे २०० हून अधिक अधिकारी कर्मचारी आजच्या संपात सहभागी झाले. मागण्या मान्य न झाल्यास २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांचा संप आणि २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे.

****

आगामी 'विश्व मराठी साहित्य संमेलन' लंडनमध्ये आयोजित करण्याची, घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लंडन इथं महाराष्ट्र मंडळाने शिंदे यांचा 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला, त्यावेळी शिंदे बोलत होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हा गौरव करण्यात आला.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये कथित पेपरफुटी, आणि इतर मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर इथे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने काल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. परीक्षेत पारदर्शकता आणावी, पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू नये. यासह इतर मागण्या मोर्चेकर्यांनी मांडल्या.

****

नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर काल रस्ता अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले. भंडारा जिल्ह्यात पिंपळगाव सडक परिसरात काल पहाटे पिकअप व्हॅन आणि ट्रकची धडक झाली. अपघातग्रस्त सर्व प्रवासी छत्तीसगढमधून धार्मिक कार्यासाठी नागपूरकडे येत होते.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटी इथं मराठा समाज बांधवांची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढील दिशा तसंच मुंबई मोर्चाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा समाजबांधवांनी आंतरवाली इथं येण्यास सुरुवात केली आहे. जरांगे यांच्या उपोषणस्थळी विद्यार्थी आंदोलनाचे नेते तथा कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी काल भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात काल कुंभारपिंपळगाव ग्रामस्थांनी घनसावंगी-अंबड मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या निटूर इथं काल सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर-जहीराबाद महामार्गावर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. लातूर-बार्शी महामार्गावर साखरा पाटी इथंही रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

****

कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र वितरणासाठी छत्रपती संभाजीनगरात झालेल्या २८ विशेष शिबीरात एकूण ३८९ अर्ज प्राप्त झाले. जालना जिल्ह्यात मंडळस्तरावर घेण्यात आलेल्या आतापर्यंतच्या १२ विशेष शिबिरांमध्ये १२६ अर्ज, बीड जिल्ह्यात १८ शिबिरांतून ९८ अर्ज तर लातूर जिल्ह्यात २१ विशेष शिबिरांमध्ये १४२ अर्ज दाखल झाले. या सर्व प्रकरणांवर तालुकास्तरीय वंशावळ समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून, त्यानंतर तातडीने पुढील कार्यवाही करून अर्ज निकाली काढण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी १० सप्टेंबरपासून १७ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्हा युवक महोत्सवाचं काल इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या जिल्हा युवक महोत्सवात १ हजार ५१८ युवक कलावंत सहभागी झाले आहेत.

****

अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांना घोषित करण्यात आला आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, पंचवीस हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या २० सप्टेंबरला अंबाजोगाई इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी पुण्यश्वोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत काल कर्ज माफी योजनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत सर्व बँकांनी जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ७०१ शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली. जिल्ह्यातील १ हजार १०५ गावातील एकूण १९ हजार २४३ शेतकऱ्यांचा या तिसऱ्या यादीत समावेश आहे.

****

राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. ते काल लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमधल्या लांजी परिसरातील पाहणीनंतर बोलत होते. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

****

नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेडमधील प्रलंबित प्रकल्पासंदर्भात काल धरणे आंदोलन करण्यात आलं. खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. विविध मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

परभणी जिल्हयात ‘मेरा रेशम मेरा अभिमानाचा दुसरा टप्पा’ राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातल्या टाकळी कुंभकर्ण, शेवडी आणि फत्तूनाईक तांडा इथे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान प्रात्यक्षिक घेण्यात आलं. संशोधन विस्तार केंद्राचे संयुक्त संचालक ए. एल. जाधव यांनी यावेळी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं.

****

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं काल आंतर- महाविद्यालयीन ड झोन कबड्डी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक तर परभणीच्या शिवाजी महाविद्यालयाच्या संघाने उपविजेतेपद पटकावलं. मुलींच्या गटात पाथरीच्या स्वर्गीय अनंत महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. तर परभणीच्या कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...