Friday, 4 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 04 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०४ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      वैद्यकीय सेवेसह विविध क्षेत्रात भागीदारीचं आवाहन मुख्यमंत्र्यांचं बेल्जियमला आवाहन

·      मुदत संपलेल्या नियमबाह्य रिक्षांविरोधात पाच ऑक्टोबरपर्यंत कठोर कारवाईचे निर्देश

·      बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा-आमदार धनंजय मुंडे यांची मागणी

·      श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण

आणि

·      जालना इथं ५ हजाराहून अधिक शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम

****

तंत्रज्ञान, जहाजबांधणी, वैद्यकीय सेवा यासह विविध क्षेत्रात सखोल भागीदारीचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांना केलं आहे. आज मुंबईत भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद सत्रात मुख्यमंत्री बोलत होते. वैद्यकीय सेवेसह इतर सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने गाठलेल्या पल्ल्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर आणि शिष्टमंडळाचं मुंबइईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळार आगमन झत्तलं. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचं स्वागत केलं.

पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी आज मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स इथं हिरे व्यापार क्षेत्रात कार्यरत उद्योजकांच्या संवाद कार्यक्रमाला संबोधित केलं. भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते ‘ॲडमास’ अर्थात कधीही न तुटणारं असल्याचं, प्रतिपादन बार्ट डी. वेव्हर यांनी नमूद केलं.

****

मुदत संपलेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांविरोधात पाच ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले आहेत. स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या दाखल तक्रारींच्या अनुषंगाने सरनाईक यांनी आज मुंबईत परिवहन आयुक्त कार्यालयात विशेष बैठक घेतली. या रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही सरनाईक यांनी दिले. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, रिक्षा-टॅक्सी संघटनेचे नेते शशांक राव यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

****

येत्या फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील "मुंबई क्लायमेट वीक" च्या पूर्वतयारीबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या बैठकीत या आयोजनाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. 'प्रोजेक्ट मुंबई'चे प्रमुख शिशिर जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या परिषदेच्या आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण केलं. हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासह जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान आणि शाश्वत उपाययोजनांवर उहापोह करण्यासाठी 'मुंबई क्लायमेट वीक'चं आयोजन करण्यात आलं आहे.

****

बीड जिल्ह्यात तातडीनं कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान होत असून, सोयाबीन, तूर, मूग, कापूस, उडीद आणि बाजरी ही पिके करपू लागली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, शासकीय सवलती लागू कराव्यात तसेच कृत्रिम पावसाचे प्रयोग राबवावेत, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

****

मुंबईत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभा’चं आयोजन केलं आहे. मुंबईत २९ सप्टेंबरला १० ठिकाणी हे रोजगार मेळावे होणार असून यासाठी मोठ्या संख्येने नोंदणी करण्याचं आवाहन मुंबई जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केलं आहे. कार्यशाळेमध्ये उमेदवारांना मुलाखतीची तयारी, संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि इतर कौशल्यांचं नोकरीपूर्व प्रशिक्षण मिळेल आणि प्रशिक्षणासाठी शुल्क आकारलं जाणार नाही. अशी माहिती त्यांनी दिली.

****

दिव्यांग रुग्णांना शासकीय, आणि निमशासकीय रुग्णालयांमधे निःशुल्क वैद्यकीय उपचार मिळावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित महासंघाने केली आहे. २००१ पर्यंत दिव्यांग रुग्णांना शासकीय रुग्णालयात केसपेपर शुल्क वगळता इतर उपचार निःशुल्क मिळत होते. मात्र नंतर शासन निर्णयान्वये ही सुविधा बंद झाली. या निर्णयात सुधारणा करुन दिव्यांग रुग्णांना मोफत औषधोपचार उपलब्ध करुन द्यावेत, असं संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

****

श्रावण कृष्ण अष्टमी, अर्थात ‘जन्माष्टमी’चा उत्साह आज सर्वत्र दिसून येत आहे. गोकुळ, मथुरा, द्वारका आणि जगन्नाथ पुरीसह देशाच्या विविध भागांत पारंपरिक पद्धतीनं जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. मंदिरांमध्ये रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होणार असून, जगभरातल्या इस्कॉन मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्मोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राजधानी मुंबईत विविध कृष्णमंदिरांमधे तसंच सामाजिक आणि धार्मिक संस्थांमधे कृष्णजन्मोत्सवानिमित्त विशेष पूजा अर्चना तसंच प्रवचन, कीर्तन भजन, आरती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर इथे पैठण रस्त्यावर महानुभाव आश्रमात तसंच जालना रस्त्यावरच्या इस्कॉन मंदिरासह इतर सर्व कृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमी सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे.

मध्यरात्री श्रीकृष्ण जयंतीचा उत्सव झाल्यानंतर उद्या दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला जाईल. विविध राजकीय पक्ष तसंच संघटनांनी दहीहंड्या फोडण्यासाठी मोठमोठ्या रकमांची बक्षिसं जाहीर केली आहेत.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला कृष्णाष्टमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

****

जालना इथं आज एकाच वेळी ५ हजार ३४८ जणांनी शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. जालन्यातल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर हा उपक्रम पार पडला. या विक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सची मान्यता मिळाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर यांनी आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक घेतली. प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक सूचना देत, विसर्जन तलावांची व्यवस्था तसेच नवीन ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्याबाबत राजूरकर यांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला.

****

जालना जिल्ह्यात कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रशासनातर्फे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आलं आहे. येत्या १० ते १६ सप्टेंबर दरम्यान सर्व तालुक्यांमध्ये ही शिबीरं घेण्यात येतील. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.

****

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज नांदेड इथं बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. या मागण्यांसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं.

लातूर इथंही सकल मराठा समाजाच्या वतीनं बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा बांधवांनी दुचाकी वाहन फेरी काढली. दरम्यान, लातूर-बार्शी महामार्गावरील साखरपाटी इथं तरूणांनी रास्ता रोको केला.

****

ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जालना शहरात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण, दीपक रणनवरे यांनी आज मागे घेतलं. निवासी जिल्हाधिकारी रामदास दौंड, तसंच तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी सदर मागण्यांबाबत पाठपुराव्याचं लेखी आश्वासन दिलं तसंच, मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मुंबईत बैठक घेण्याचंही यावेळी निश्चित करण्यात आलं.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीड जिल्हास्तरीय युवक महोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. पंडित गुरु पार्डीकर कनिष्ठ महाविद्यालयातून सकाळी नऊ वाजता शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत दहा महाविद्यालयांचे युवक कलावंत पारंपरिक वेशभुषेत सहभागी झाले होते.

****

परभणी जिल्हा पोलीसांनी वाहन चोरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीला आज अटक केली. त्यांच्याकडून चारचाकी वाहनं तसंच एका मोबाईलसह ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिंतूर इथल्या एका वाहन चोरीचा तपास करताना, या आरोपींना पोलीसांनी कर्नाटक राज्यातील विजापूर इथून ताब्यात घेतलं. हे आरोपी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

****

मतदार यादी विशेष सखोल पुर्नरिक्षण मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यासंदर्भात आज परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडलं. दावे आणि हरकती तसंच नो मॅपिंग, अनोमली प्रकारातील मतदारांच्या सुनावणी कागद पडताळणीबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या. या टप्प्यात महत्त्वाची कामंही अधिक दक्षतेने आणि अचूक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं २९ ऑगस्ट रोजी झालेल्या अमृत-२ मॅरेथॉन स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या रमाबाई रणवीर यांचा जिल्हा प्रशासनातर्फे आज सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी रमाबाईंच्या मुलींच्या शिक्षणासाठी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली.

****

‘चायना मास्टर्स सुपर 750’ बॅडमिंटन स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किदाम्बी श्रीकांतचं आव्हान आज संपुष्टात आलं.

****

हवामान

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, तसंच उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार वगळता इतर जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात जालना तसंच परभणी जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...