Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
नांदेड इथं झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करून मृतांच्या
कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. मृतांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय
मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत, तर जखमींना
५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
नांदेड - भोकर रस्त्यावर सीताखंडी
घाटात काल संध्याकाळच्या सुमारास एका ट्रकने मॅजिक ऑटोला धडक देऊन झालेल्या अपघातात
आठ जणांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले.
****
स्वामी विवेकानंद यांनी ११
सप्टेंबर १८९३ रोजी शिकागो इथं जागतिक धर्म संसदेत दिलेल्या प्रेरणादायी भाषणाचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी स्मरण केलं आहे. स्वामी विवेकानंदांचं भाषण समाजमाध्यमावर शेअर
करत मोदी यांनी, हे भाषण भारताच्या सांस्कृतिक विचारसरणीचं दर्शन घडवत
असल्याचं नमूद केलं. स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी शब्द आजही जगभरात गुंजत असल्याचं
ते म्हणाले.
****
नवी दिल्लीत १८ व्या ब्रिक्स
शिखर परिषद २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजधानी आकर्षक रोषणाईनं सजली आहे. भारताच्या यजमानपदाखाली
उद्या १२ आणि १३ सप्टेंबर ला ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे.
या परिषदेसाठी विविध देशांचे
राष्ट्रप्रमुख, परराष्ट्रमंत्री, वरिष्ठ अधिकारी
आणि प्रमुख प्रतिनिधी भारतात दाखल होत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन
यांचं नवी दिल्लीत आगमन झालं असून, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी
विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष
पुतिन यांच्यात संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर महत्त्वाची
चर्चा होणार आहे. ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॉरो व्हिएरा यांचंही भारतात
आगमन झालं आहे. भारत आणि ब्राझीलमधले मैत्रीपूर्ण द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासह
ग्लोबल साऊथच्या देशांमधलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा
मानला जात आहे.
****
भारताच्या वस्तू निर्यातीत
२०२६ मध्ये मोठी वाढ झाली आहे. १० एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भारताची वस्तू
निर्यात १७ टक्क्यांनी वाढून १७३ पूर्णांक आठ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी
याच कालावधीत ही निर्यात १४८ पूर्णांक पाच अब्ज डॉलर होती. मुक्त व्यापार करारातल्या
भागीदार देशांना झालेली निर्यात २३ पूर्णांक नऊ टक्क्यांनी वाढून ५७ पूर्णांक १७ अब्ज
डॉलर झाली आहे. यामुळे भारताच्या व्यापाराला मिळणारी गती आणि जागतिक बाजारपेठेत विस्तारत
असलेली संधी अधोरेखित झाली आहे.
****
लंडन
दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्ल्ड लीडरशिप फोरमच्या वतीनं लंडन
संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित ‘महाराष्ट्र-भारत-यूके संवाद’ या आंतरराष्ट्रीय
परिषदेत ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेलं
नेतृत्व, सार्वजनिक
सेवेतलं योगदान आणि राज्याच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान
देण्यात आला. पर्यावरणाचं भान ठेवून नवा महाराष्ट्र घडवण्याचं काम सुरू असून, ‘हरित भांडवल’ आणि तंत्रज्ञान
घेऊन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं. इलेक्ट्रिक वाहनं, बॅटरी तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, नवीकरणीय ऊर्जा, वित्तीय तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात
ब्रिटिश कंपन्यांसाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी असल्याचं सांगत त्यांनी, ब्रिटिश उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना
महाराष्ट्रात गुंतवणुकीचं निमंत्रण दिलं. यानंतर महाराष्ट्र मराठी मंडळाच्या वतीनं
आयोजित कार्यक्रमातही शिंदे सहभागी झाले होते.
****
निवडणूक
आयोगाच्या वतीनं प्रसारित करण्यात आलेली मसुदा मतदार यादी अंतिम नसून, त्यावर आधारित तुलना करणं अयोग्य
आणि घाईघाईचं ठरेल, असं
आयोगानं स्पष्ट केलं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतल्या एकूण मतदानापेक्षा मसुदा
मतदार यादीतल्या मतदारांची संख्या कमी असल्याच्या चर्चेनंतर आयोगानं ही माहिती दिली.
पहिल्या टप्प्यात मतदारांच्या रहिवासाची पडताळणी करण्यात आली असून, दिलेल्या पत्त्यावर न राहणाऱ्या
व्यक्तींचा समावेश मसुदा यादीत करण्यात आलेला नाही. एक ऑक्टोबर २०२४ नंतर १८ वर्षे
पूर्ण केलेल्या नव्या मतदारांची नावंही या टप्प्यात जोडली जात आहेत. मृत मतदारांची
नावं वगळण्यात आली असून, सर्व
पात्र नागरिकांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यावर सध्या भर दिला जात आहे. ही प्रक्रिया
नोव्हेंबरच्या सुरुवातीला पूर्ण होणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आढळलेल्या
कुणबी नोंदींच्या आधारे पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरांचं
आयोजन केलं आहे. या शिबिरांची माहिती देण्यासोबतच जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना
नागरिकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी
मराठा आरक्षणविषयक आंदोलनकर्ते आणि प्रतिनिधींशी संवाद साधला. कुणबी नोंदी आढळलेल्या
पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता यावा, यासाठी विशेष
शिबिरांमध्ये अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि वंशावळीचे पुरावे याबाबत मार्गदर्शन
करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment