Tuesday, 29 September 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.09.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 September 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

'जागतिक हृदय दिन' आज पाळण्यात येतो. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार, त्यांचा प्रतिबंध आणि त्यांचा जागतिक प्रभाव यासंदर्भात जनजगृती करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. हा दिवस लोकांना धोक्याची लक्षणं ओळखणं, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं, जोखीम घटकांचं व्यवस्थापन करणं आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेणं यांची आठवण करुन देतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. हृदयाचं आरोग्य जपण्याच्या तसंच हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार रोखण्याच्या आपल्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. 'डोंट मिस अ बीट' अशी यंदाची या दिनाची संकल्पना असल्याचं नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं.

****

१५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासने एक कोटी पास जारी करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर खासगी वाहनधारकांना सुलभ आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या या वार्षिक पासला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सांगितलं.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या तीन ऑक्टोबरपासून नियोजित असलेल्या तीन प्रमुख स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२६ आणि अराजपत्रित पदांसाठी महाराष्ट्र गट-ब मुख्य परीक्षा २०२६ यांचा समावेश आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखांबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येणार असल्याचं आयोगानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे.

****

राज्याचा विकास करताना उपलब्ध संसाधनांचा स्मार्ट पद्धतीनं आणि योग्य व्यवस्थापनातून वापर केला पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ‘ॲक्सलरेटिंग इंडियाज डेव्हलपमेंट’ या पुस्तकाचे लेखक डॉ. कार्तिक मुरलीधरन यांचं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राकडे पुरेशी संसाधनं आहेत, मात्र त्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी उत्तम प्रशासन आणि सक्षम यंत्रणा उभारणं आवश्यक आहे. याच उद्देशानं गेल्या वर्षभरात सरकारनं प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

मतदार यादीची सखोल तपासणी आणि सुधारणा म्हणजेच एसआयआर मोहिमेअंतर्गत ज्या मतदारांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आता घरीच केली जाणार आहे. यासाठी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी - बीएलओ स्वतः मतदारांच्या घरी जाऊन कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. त्यामुळे नोटीस बजावलेल्या मतदारांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी कुठेही जाण्याची गरज भासणार नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

निवडणूक आयोगानं देशभरात राबवलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत, काल ठिकठिकाणी आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, नांदेड याठिकाणी करण्यात आलेल्या या आंदोलनात निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी करण्यात करत, त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून, निषेध व्यक्त करण्यात आला.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनानं निवडणूक तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक घेत, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी समन्वयानं काम करण्याची सूचना केली. आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

****

महसूल गुप्तचर संचालनालयानं सोनं तस्करीविरोधात केलेल्या देशव्यापी कारवाईत परदेशी बनावटीचं १० कोटी रुपये किमतीचं सुमारे साडेसहा किलो सोनं जप्त केलं आहे. कुरियर नेटवर्कच्या माध्यमातून ही टोळी सोन्याची तस्करी करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या नऊ महिन्यांत या टोळीनं सुमारे ४५० कोटी रुपये मूल्याचं ३१८ किलो सोनं तस्करी केल्याचं तपासात समोर आलं सून या प्रकरणी संचालनालयानं ११ जणांना अटक केली.

****

जागतिक रेबीज दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल विविध आरोग्य संस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत नागरिकांना रेबीजपासून बचाव, पाळीव प्राण्यांच्या नियमित लसीकरणाचं महत्त्व तसंच प्राण्याने चावा किंवा ओरखडा घेतल्यास तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताने रौप्य पदक जिंकलं. नेमबाजीत महिलांच्या सांघिक प्रकारात नीरु ढांडा, आशिमा अहलावत आणि मनिषा कीर यांच्या संघाने हे पदक जिंकलं. यामुळे या स्पर्धेत आतापर्यंत भारतीय नेमबाजांनी एकूण १३ पदकं जिंकली आहेत.

****

गोव्यात सुरु असलेल्या वेस्ट झोन ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाची विद्यार्थीनी जान्हवी वाघमारे हिने तिहेरी उडी प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. ११ पूर्णांक ३५ मीटर अंतरावर उडी मारुन तिने हे पदक जिंकलं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...