Wednesday, 23 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.09.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 September 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ सप्टेंबर २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय

·      राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

·      राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान, अभिनेते अनंत नाग यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव

आणि

·      आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं पटकावलं सुवर्णपदक

****

राज्य सरकारकडे आलेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे येत्या शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात आजपासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. यासंदर्भात वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाचे सर्वाधिकार या उपसमितीला देण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना, आपलं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देत, शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाची जबाबदारी आपला पक्ष पार पाडेल, असं सांगितलं. ते म्हणाले..

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध रद्द करून, वर्ष २००९ चा मंजूर आकृतीबंध तात्पुरता कायम ठेवण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

**

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर जिल्ह्यात दुष्काळसदृश्य भागाची पाहणी करणार आहेत. निलंगा तालुक्यात तसंच औसा तालुक्यातल्या खरोसा इथं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी करतील. या दौऱ्यात मुख्यमंत्री प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक नुकसानीची आणि पाणी उपलब्धतेची परिस्थिती जाणून घेणार आहेत.

**

पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे. त्यांनी काल जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं.

**

लातूर जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत, पावसाअभावी आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. लातूर जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी विरोधी सदस्यांनी यावेळी केली.

**

 

 

संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत, असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सेवा संकल्प अभियानांतर्गत शेतकरी आणि ग्रामस्थांनी जलसंधारण कामांचे प्रस्ताव सादर करावेत, असं सांगण्यात आलं आहे.

****

पासपोर्ट कार्यालयाच्या धर्तीवर राज्यात मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलतांना ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात ६० कार्यालयांचं आधुनिकीकरण करण्यात येईल. या कार्यालयांमध्ये शासकीय अधिकारी असतील, मात्र पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाच्या व्यवस्थेसाठी खासगी आस्थापनांचा सहभाग घेतला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्य विधान परिषदेच्या शिक्षक तसंच पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन विभागीय पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केले जातील. या पाच जागांसाठी ६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

****

चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना काल प्रदान करण्यात आला. गुजरातमध्ये केवडिया इथं झालेल्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, अनंत नाग यांना, या पुरस्काराने गौरवण्यात आलं. आर्टिकल 370 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ, तर ‘श्रीकांत’ या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा रौप्य कमळ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर कार्तिक आर्यन तसंच मामुटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराचं रौप्यकमळ देऊन गौरवण्यात आलं. वीर सावरकर चित्रपटासाठी रणदीप हुडा याला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, भंगार या मराठी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म, तर गायक अभय जोधपूरकर याला 'घरत गणपती' या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा २५ वर्षांचा प्रवास ‘जनसेवा से देशसेवा’ या मंत्राने प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून २०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. स्टार्टअप इंडिया हा उपक्रमही याचाच एक भाग आहे. याविषयी जाणून घेऊ.

केंद्र सरकारनं नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार्टअप इंडिया  उपक्रमाची जानेवारी २०१६ मध्ये सुरुवात केली. देशात नाविन्यपूर्ण व्यवसायांना चालना देणं, रोजगारनिर्मिती वाढवणं आणि उद्योजकतेसाठी पोषक वातावरण तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी या उपक्रमाचं यश अधोरेखित केलं.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्टार्टअप इंडिया हा देशातील उद्योजकता आणि नवोपक्रमाच्या परिसंस्थेतील महत्त्वाचा सरकारी उपक्रम म्हणून पुढे आला आहे.

****

जपानमध्ये सुरु असलेल्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेचा १४७ धावांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दिलेल्या २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सोळाव्या षटकात केवळ ६९ धावांमध्ये सर्वबाद झाला. या सामन्यात ७९ धावा करणारी भारताची स्मृती मंधाना ही, अकरा हजार धावा काढणारी जगातली पहिली महिला फलंदाज ठरली आहे.

या स्पर्धांमध्ये कबड्डीत भारतीय पुरुष संघानं दक्षिण कोरियाला ६३-३१ असं पराभूत केलं. टेबल टेनिसमध्ये महिला संघानं थायलंड संघाचा पराभव करत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जलतरणात १०० मीटर मेडले प्रकारात भारतीय पुरुष संघानं चौथं स्थान मिळवत अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. तर बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष संघाने यजमान जपान संघाचा तीन शून्यने पराभव करत, उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

हवामान

संपूर्ण मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातल्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आजपासून पुढचे चार दिवस विदर्भात मुसळधार, ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...