Saturday, 12 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १२ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      १८व्या ब्रिक्स शिखर परिषदेला प्रारंभ;दिल्ली जाहीरनाम्याचा ब्रिक्स राष्ट्रांकडून एकमतानं स्वीकार

·      केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

·      मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच-मनोज जरांगे यांचा इशारा

·      गणेशोत्सव काळात आंदोलन न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन

आणि

·      कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या महिला तसंच पुरुष संघांची उद्या अंतिम लढत;महिलांच्या टी-20 आशिया चषक स्पर्धेतही भारताचा उद्या श्रीलंकेशी अंतिम सामना

****

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीसाठी उपस्थित जागतिक नेत्यांचं स्वागत केलं. गेल्या २० वर्षांत ब्रिक्सनं जागतिक स्तरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली असून ही परिषद एका ऐतिहासिक टप्प्याचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना म्हटलं. भारताचं 'ब्रिक्स' अध्यक्षपद हे मानवतेला प्राधान्य देणाऱ्या आणि लोकाभिमुख दृष्टिकोनावर आधारित असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. कोणालाही विरोध न करता, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणं हीच ब्रिक्सची मूळ कार्यसंस्कृती राहिली आहे. पुढील २० वर्षांसाठी एका नवीन, दीर्घकालीन कार्यसूचीवर काम करण्याची गरज असून याची सुरुवात आपल्या स्वत:च्या कार्यपद्धतींमध्ये सुधारणा करण्यापासून केली पाहिजे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं.

 

दरम्यान, या परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी आज पहिल्या दिवसाच्या सत्राच्या शेवटी परिषदेचा दिल्ली जाहीरनामा स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला. सर्व ब्रिक्स राष्ट्रांनी तो एकमतानं स्वीकारला. आजचा हा जाहीरनामा सदस्य देशांच्या सामायिक संकल्पासाठी स्पष्ट दिशा प्रदान करतो. या संकल्पांचं मूर्त परिणामांमध्ये रुपांतर करणं ही सामायिक जबाबदारी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. ब्रिक्सच्या २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सदस्य देशांच्या नेत्यांनी याप्रसंगी दोन स्मारक टपाल तिकिटेही जारी केली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांसह उपस्थित सर्व नेत्यांनी यावेळी सामुहिकरित्या वृक्षारोपण केलं.

****

ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय बैठका सुरु आहेत. याअंतर्गत पंतप्रधानांनी आज इथिओपियाचे पंतप्रधान डॉ. अबी अहमद अली, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, तसंच व्हिएतनामचे पंतप्रधान ले मिन्ह हुंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या सर्व भेटींमध्ये व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा झाली. आज दुपारनंतरच्या सत्रात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही पंतप्रधान नरेंद मोदी यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील. तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक, साहित्यिक, आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान चाचणी करून स्त्रीभ्रूण हत्या केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तातडीनं कारवाई सुरू केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी खामगाव शहरातल्या काही नामांकित सोनोग्राफी केंद्रांवर छापा टाकून तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, स्त्रीभ्रूण हत्या हे अत्यंत निषेधार्ह कृत्य असून, दोषींवर कठोरात कठोर कारवाईचा इशारा बुलडाण्याचे खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला आहे.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आज मराठा बांधवांसोबत झालेल्या बैठकीनंतर, त्यांनी ही सूचना केली. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

मुंबईकडे जाताना पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातल्या पाटोदा इथे, दुसरा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथं आणि तिसरा मुक्काम पुण्यात हडपसर इथं नियोजित असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. १९ सप्टेंबरपर्यंत मुंबईत पोहोचण्याचं नियोजन असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले निर्णय लक्षात घेता सर्व आंदोलकांनी याची काळजी घ्यावी. मुंबईसह राज्यात गणेशोत्सव काळात कोणीही आंदोलन करू नये, असं आवाहन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आहेत, असंही मंत्री बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला आज सात वर्षे पूर्ण झाली. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने ही योजना २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर किमान तीन हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाते. शेतकऱ्यांना वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य आणि सन्मानाने जगण्यास मदत करणं, तसंच त्यांचं जीवन अधिक सुरक्षित आणि सुखमय करणं हा या पेन्शन योजनेचा उद्देश आहे.

****

दुभंगलेले ओठ आणि टाळू या जन्मजात विकाराने ग्रस्त बालकांवर आता दर्जेदार तसंच सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र, बजाज फायनान्स आणि ‘स्माईल ट्रेन इंडिया’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे. राज्यातील १५ मान्यताप्राप्त रुग्णालयांत या व्याधीवर उपचार उपलब्ध होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात अहिल्यानगर जिह्यातल्या राहतामधल्या लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला विभागीय पातळीवरील प्रथम पुरस्कार हा जाहीर झाला आहे. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालय, विकास योजना शाखा यांच्यातर्फे विभागस्तरावर घेण्यात आलेल्या या अभियानांतर्गत ‘राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे’ निकाल जाहीर करण्यात आले. नाशिक विभागात द्वितीय पुरस्कार हा धुळे जिल्ह्यातील वाठोडे ग्रामपंचायतीला आणि तृतीय पुरस्कार नाशिक जिल्ह्यातल्या भोकणी ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.

****

नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी गोदावरी नदीमध्ये सोडले जाऊ नये, यासाठी सुरू असलेल्या गोदावरी रिव्हर फ्रंटच्या कामाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पाहणी केली. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखणे ही अत्यंत गंभीर बाब असून, नदीमध्ये सांडपाणी सोडले जाणार नाही यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकरिता राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशांचा आणि पर्यावरणीय नियमांचा विचार करून प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

****

हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज 'हिंगोलीचा विकास, तुम से ना हो पायेगा!' आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या विविध विकासकामांचा वस्तुस्थितीदर्शक हिशोब जनतेसमोर ठेवल्याचा दावा आमदार अंबादास दानवे यांनी केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर जिल्हा पदाधिकारी, उपतालुकाप्रमुख, सर्कलप्रमुख, युवासैनिक आणि शेतकरी उपस्थित होते. मागण्यांचं निवेदन सादर केल्यानंतर आंदोलनाची सांगता झाली.

****

लातूर शहरात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आज विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेण्यात याव्यात, तसंच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडं शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मोर्चात सहभागी होत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला.

****

महिला कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चीनमधील मोकी इथं झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा ५-१ असा पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीनने जपानला पराभूत करून अंतिम फेरी गाठली. उद्या भारत आणि चीन यांच्यात अंतिम लढत होणार आहे.

याच स्पर्धेत पुरुषांच्या गटात उद्या भारत आणि दक्षिण कोरिया संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ विक्रमी सहाव्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचं लक्ष्य ठेवून अंतिम सामना खेळण्यासाठी उतरेल.

****

महिला क्रिकेटमध्ये, टी-20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. दुबई इथं उद्या हा सामना होणार आहे. या स्पर्धेचं सात वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...