Monday, 14 September 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.09.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 14 September 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १४ सप्टेंबर २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यात उत्साहात, ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचं आगमन, यंदा बाप्पा राहणार बारा दिवस भक्तांच्या घरी

·      महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी महामंडळाच्या वतीनं गणेशभक्तांसाठी जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धेचं आयोजन

·      राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं गृहमंत्री अमित शहांचं आवाहन

आणि

·      दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून एफआयआर दाखल

****

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेशचतुर्थी. राज्यात सर्वत्र घरोघरी गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. आजच हरतालिका तृतीया असल्यानं सकाळी घरोघरी गृहिणींनी हरतालिकेची विधिवत पूजा केली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठमोठ्या मूर्ती याआधीच मंडपात विराजमान झाल्या होत्या. त्यांची आज विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली.

 

श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं भर देण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीतकमी प्रदूषण होईल अशाप्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते बोलत होते.

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदा पर्यावरणस्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सजावटीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे.

मुंबईचा लालबागच्या राजाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी दिसून आली. यंदा गणेशोत्सव बारा दिवसांचा असल्याने गणेशभक्तांच्या आनंदात अधिकच भर पडली आहे.

पुण्यामध्ये कसबा पेठच्या मानाच्या गणपतीची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून उत्साहात स्थापना करण्यात आली. दगडू शेट गणपतीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. यात विशेषतः तरुण-तरुणींची गर्दी अधिक होती.

कोकणात सिंधुदूर्ग, रत्नागिरीतत पारंपरिक पद्धतीने लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आली. सिंधुदुर्गमध्ये ७४ हजार ३५१ घरगुती आणि ३२ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली. पारंपरिक लाकडी माटवीत फळाफुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही हजारो गणेश भक्तांनी आज दिवसभरात शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीचे दर्शन घेतले. छत्रपती संभाजीनगरमधील बाजारापेठांमध्ये आज चैतन्यमय वातावरण दिसून आले. घरोघरी स्थापन झालेल्या गणेशमूर्तींमध्ये बहुतांश घरी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपतींची स्थापना करण्यात आली.

संभाजीनगरसह मराठावाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आगमन झालं. बीडमध्ये २९२ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’ हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. हिंगोलीमध्ये नवसाला पावणाऱ्या श्री चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी आज मोठी गर्दी झाली.

जालना शहरासह जिल्ह्यात आज गणेश चतुर्थीनिमित्त गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीची आज सकाळी नऊ वाजता मंत्रोच्चार आणि सनई चौघड्यांच्या निनादात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

लातूर शहरातील गंजगोलाई, सुभाष चौक, आंबेडकर पार्क, टाऊन हॉल परिसर, औसा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात गणेशमूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

नांदेड शहर आणि जिल्ह्यात आज भक्तीभावानं गणरायाचं आगमन झालं. शहरातील जुना मोंढा, वजीराबाद, आनंदनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, वजीराबाद या भागात भाविकांनी श्री गणेश मूर्ती आणि पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. नांदेडमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी झालेल्या श्री स्थापनेच्या आरतीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

नागपूर इथं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या गडकरी वाड्यावर मंगल वातावरणात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. यवतमाळ इथं पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी आज सपत्नीक पूजा करत श्री गणेशाची स्थापना केली.

नाशिक जिल्ह्यातही आज सर्वत्र भक्तीभावात गणरायाचं आगमण झाल. यावर्षी जिल्ह्यात ७५७ गावात एक गाव एक गणपती बसवण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर, निजामपूर, सोनगीर आणि धुळे तालुका परिसरात ८२७ गणपतींची स्थापना करण्यात आली.जिल्ह्यात ३६ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना झाली आहे.

****

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीनं गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा राबवण्यात येणार आहे. या स्पर्धेत ‘जागतिक सर्वोत्तम रील’ ठरणाऱ्या स्पर्धकाला १ लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील सर्वोत्तम रीलसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीनं महानगरपालिका मुख्यालय परिसरात प्रतीवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये तसंच आयुक्त अमोल येडगे यांचे हस्ते ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी महापौर आणि आयुक्त यांनी, माझा बाप्पा स्वच्छतेचा राजा या घोष वाक्यानुसार गणेश उत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता या सूत्रावर महानगरपालिका काम करणार असल्याचा संदेश दिला. प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्यानंतर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारं पथनाट्य सादर करण्यात आलं.

****

महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं आपल्यात सामावून घेतलं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस २०२६ आणि सहावं अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्राइतका बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठंही नाही, असं शहा म्हणाले.

राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्यावर भर द्यायचं आवाहन शहा केलं. या सर्व भाषांचा स्वर वेगवेगळा असला, तरी गीत एकच आहे, भारतीय भाषांना विज्ञानाची, साहित्याची भाषा करायचं आहे, एकमेकींशी जोडायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष हा यंदाच्या संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला, असं शहा यांनी सांगितलं. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी राज्यातील भाविकांना शुभेच्छा दिल्या.

आपण आपल्या भाषांचा सन्मान केला नाही, तर जगही करणार नाही, त्यामुळे राजभाषा, निजभाषा, मातृभाषेसह देशातल्या सर्व भाषांचा सन्मान करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. स्वातंत्र्य संग्रामात हिंदी भाषेनं संपर्कसूत्र म्हणून मोठं योगदान दिल्याचा उल्लेख त्यांनी केला.

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शहा यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण केलं.

****

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे १५ सप्टेंबरला एकटेच मुंबईला येणार असून त्यांनी इतर मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. सणावारांच्या कालावधीत दंगल घडवून मराठा समाजाला गालबोट लावण्याच्या प्रयत्न केला जाणार असल्याचं मत जरांगे यांनी सूत्रांकडे व्यक्त केलं आहे.

****

बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसंच गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला पीकविमा आणि यंदाचा पीकविमा तातडीने अदा करावा, या मागण्यांसाठी येत्या १६ सप्टेंबर रोजी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘हलगी बजाव आंदोलन’ करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन प्रगतिशील शेतकरी पुत्र घोडके यांनी केलं आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमधून शेतकऱ्यांना आंदोलनाची माहिती देऊन मोठ्या संख्येनं यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

****

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं काल एफआयआर दाखल केला. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती आणि तिचा ८ जून २०२० रोजी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नुकतेच दिले होते. त्यानुसार, काल हा एफआयआर दाखल झाला. या एफआयआरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षारक्षक, दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाझे, परमबीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.10.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 01 October 2026 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...