Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 08 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
*****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला
उत्तर देणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपल्या सर्व खासदारांना उपस्थित
राहण्यासाठी दोन दिवसांसाठी व्हीप जारी केलं आहे. २४५ सदस्य संख्या असलेल्या या सदनात
भाजपचे ५६ तर काँग्रेसचे ६० सदस्य आहेत.
****
भारतीय रिजर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा आज जाहीर
होणार आहे. यामध्ये रेपो दरात पाव टक्का ते अर्धा टक्का कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे. दरकपात झाल्यास गृह तसंच वाहन कर्जाचं व्याजदर कमी होण्याचा अंदाजही व्यक्त
होतो आहे.
****
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं राष्ट्र निर्माणात योगदान
दिल्याबद्दल सुमारे तीन लाख चौऱ्याहत्तर हजार करदात्यांना प्रशंसा
प्रमाणपत्रं दिली आहेत. कर मंडळानं जारी केलेल्या अशा प्रमाणपत्रांची संख्या आता तेवीस
लाखांपर्यंत पोहोचली आहे.
****
तामिळनाडूमध्ये सत्तारूढ अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम एआयएडीएमके
पक्षात फूट पडण्याची चिन्हं दिसत आहेत. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम
यांनी पक्षाच्या कायमस्वरूपी सरचिटणीस पदासाठी लवकरच निवडणूक होणार असल्याचं म्हटलं
आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत नेत्या जयललिता यांच्या आजारपणासंदर्भात चौकशीसाठी सर्वोच्च
न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक आयोग स्थापन करून, सर्व
संभ्रम दूर केला जाईल, असं पनीरसेल्वम यांनी म्हटल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे.
आपण विधानसभेत आपली ताकद दाखवून देणार असल्याचं, तसंच दीपा जयकुमार यांनी पाठिंबा
देण्याचा प्रस्ताव दिल्यास त्यावर विचार करणार असल्याचंही पनीरसेल्वम यांनी म्हटलं
आहे.
पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग
पाडल्याचा आरोप पनीरसेल्वम यांनी केला होता, पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच लोकसभेचे उपाध्यक्ष
एम थंबीदुराई यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे, तर तमिळनाडू विधानसभेतला मुख्य विरोधी
पक्ष द्रविड मुनेत्र कळघम द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी मात्र या
संदर्भात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली आहे.
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यासंदर्भात बोलताना, हा अण्णाद्रमुक
पक्षाचा अंतर्गत मुद्दा असून, त्याबाबत केंद्र सरकार किंवा भारतीय जनता पक्ष काहीही
हस्तक्षेप करू शकत नसल्याचं, म्हटलं आहे.
पनीरसेल्वम यांच्या या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुक पक्षाच्या
सर्व आमदारांची सध्या चेन्नईत सरचिटणीस शशिकला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे.
दरम्यान, तामिळनाडूमध्ये उद्भवलेल्या
राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या
चेन्नई किंवा दिल्लीला जाण्यासंदर्भात काहीही माहिती मिळाली नसल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे.
****
आण्विक दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या जागतिक प्रयत्नांचा
एक भाग असलेली एक बैठक आजपासून दिल्लीमध्ये सुरू होत आहे. विविध देशांचे सुमारे दीडशे
प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संस्था या तीन दिवसांच्या बैठकीत सहभागी होत आहेत. परराष्ट्र
मंत्रालय आणि आण्विक ऊर्जा विभागाच्या वतीनं ही बैठक आयोजित करण्यात येत आहे.
****
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या
अपघातात सात जण ठार, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. मुंबईतल्या विलेपार्ले
इथून गोव्याकडे निघालेली झायलो जीप सकाळी साडेसातच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यात
खानू गावाजवळ आली असताना चालकाचा ताबा सुटल्यानं झाडावर आदळल्याचं आमच्या वार्ताहरानं
सांगितलं.
****
यशवंत
पंचायत अभियानांतर्गत शासनानं सुरू केलेल्या उत्कृष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठींच्या
पुरस्कार योजनेत, वर्ष २०१६-१७ साठी, पुणे विभागातून सोलापूर जिल्हा परिषदेला प्रथम
क्रमांक मिळाला आहे.
****
राज्यातल्या
केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश आता ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत. अहमदनगरच्या
केंद्रीय विद्यालयाचे उप-प्राचार्य आर डी चंदेल यांनी ही माहिती दिली. यासाठीची नोंदणी
प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, ती दहा तारखेपर्यंत चालणार आहे. या प्रक्रियेमध्ये
आरक्षण संबंधीची माहिती देण्यात आली आहे.
****
केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव
असलेल्या रिक्त जागांपैकी चौऱ्याऐंशी टक्के जागा भरल्या गेल्या
असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
ते काल नवी दिल्ली इथं
पत्रकारांशी बोलत होते. एकूण पंधरा
हजार सहाशे चौऱ्याण्णव
रिक्त पदांपैकी तेरा हजार पदं भरली असून, केंद्र सरकार ही
सर्व पदं भरण्याचे प्रयत्न करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
//********//
No comments:
Post a Comment