Wednesday, 8 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 8 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारतीय रिझर्व बँकेनं आज द्विमासिक आणि या आर्थिक वर्षातला अंतिम पतधोरण आढावा जाहीर केला. व्याजदरांच्या बाबतीत रिझर्व बँकेनं जैसे थे ही स्थिती ठेवली असून रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस आणि रिव्हर्स रेपो रेट पाच पूर्णांक पंचाहत्तर टक्के, असे कायम ठेवले आहेत. दरम्यान, बचत खात्यातून रक्कम काढण्यावर असलेली मर्यादा येत्या वीस तारखेपासून वाढवली जाणार असून, दर आठवड्याला पन्नास हजार रुपये काढता येतील, तर येत्या तेरा मार्चनंतर असे बचत खात्यावरून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा राहणार नाही, असं रिझर्व बँकेनं आज स्पष्ट केलं.
आर्थिक शिस्तभंगाची प्रकरण हाताळण्यासाठी येत्या आर्थिक वर्षापासून रिजर्व्ह बँक स्वतंत्र अंमलबजावणी विभाग सुरू करणार आहे. यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून, हा विभाग येत्या एक एप्रिलपासून कार्यान्वीत होणार असल्याचं, बँकेकडून आज सांगण्यात आलं. सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी एक पथक स्थापन करण्याचा निर्णयही रिजर्व्ह बँकेनं घेतला आहे.

****

सुरक्षित रेल्वे वाहतुकीला रेल्वे मंत्रालयाचं सर्वोच्च प्राधान्य असून, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासह सुरक्षेसाठी इतर अनेक प्रयत्न सातत्यानं सुरू असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. लोकसभेत पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते. नुकत्याच झालेल्या, रेल्वे अपघातांमागे घातपाती कारवाया असल्याबद्दल प्रभू यांनी काळजी व्यक्त केली. रेल्वेमार्गांवर सात वेळा बाँबस्फोटाचे प्रयत्न झाले, अट्ठावन्न वेळा घातपात करण्याचा आणि तीन वेळा रूळ तोडण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती त्यांनी यावेळी सदनाला दिली.

****

२०१६ या वर्षात बारा हजार आठशे जणांनी भारताच्या दीर्घकालीन व्हिसासाठी तर बाराशे पाकिस्तानी अल्पसंख्य नागरिकांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज राज्यसभेत दिली. नागरिकत्वाची मागणी करणाऱ्या पाकिस्तानी स्थलांतरित अल्पसंख्याकांसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित राज्यांमधल्या सोळा जिल्ह्यातल्या जिल्हा न्यायाधीशांकडे देण्यात आले असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.

****

देशभरातल्या अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये पुढील वर्षाखेरपर्यंत इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्या जातील, असं सरकारनं आज लोकसभेत सांगितलं आहे. रोखीचे व्यवहार कमी करण्याच्या दृष्टीनं इंटरनेट सुविधेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात, भारतनेट या प्रकल्पांतर्गत, येत्या मार्च महिन्यापर्यंत एक लाख ग्रामपंचायतींना, तर दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर २०१८ पर्यंत उरलेल्या दीड लाख ग्रामपंचायतींना ही सुविधा पुरवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

****

आण्विक ऊर्जेच्या नकारात्मक बाजूकडे दुर्लक्ष शक्य नाही, असं मत परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी व्यक्त केलं आहे. आण्विक दहशतवादासंदर्भातली एक आंतरराष्ट्रीय परिषद आजपासून दिल्लीत सुरू झाली, या परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. दहशतवादाचा प्रचार करण्यासाठी दहशतवादी नवे मार्ग शोधत असल्यामुळे आण्विक सुरक्षा हा अत्यंत काळजीचा मुद्दा असल्याचं ते म्हणाले.

****

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार नसल्याचं आश्वासन, भारतीय जनता पक्षानं लेखी स्वरूपात द्यावं, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहीर यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गेल्या २२ वर्षांपासून सेना भाजप एकच जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत, यातली किती वचनं पूर्ण केली आहेत, हे स्पष्ट करावं, असं अहीर म्हणाले.

****

आगामी महानगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ, या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवू नये, अन्यथा त्या उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांनी दिला आहे. या दोन पक्षांची युती फक्त मुंबई महापालिकेपुरती झाली असून बाकी ठिकाणी रिपाइं स्वबळावर निवडणूक लढवत आहे, असं सरवदे यांनी स्पष्ट केलं आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अमेरिकेमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक शांततेसंदर्भातल्या एका परिषदेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. ‘नॅशनल प्रेयर ब्रेकफास्ट’ नावाच्या या परिषदेत ‘प्रेमाची शक्ती’ या विषयावर आपले विचार मांडताना अमृता फडणवीस यांनी भारतातली विविधतेतली एकता, धार्मिक सलोखा, विविध भाषा आणि बोलीभाषा या विषयांवर अधिक भर दिला. विविध देशांचे सुमारे तीन हजारावर प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 28 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...