Thursday, 9 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 February 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ फेब्रुवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      अंकेक्षित व्यवहारांना राजकीय पक्षांकडून होणारा विरोध अयोग्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      प्रधानमंत्री ग्रामीण अंकेक्षण साक्षरता अभियानास’ केंद्रीय मंत्री मंडळाची मंजुरी

·      भारतीय रिझर्व्ह बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर, व्याज दरात बदल नाही

·      राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शिवसेनेच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आणि

·      मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची एकमेकांवर कठोर टीका

****

अंकेक्षित व्यवहारांना राजकीय पक्षांकडून होणारा विरोध योग्य नसल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. अंकेक्षित व्यवहारांच्या अंमलबजावणीतल्या त्रुटी दूर करून अधिक सुविधा उपलब्ध करून देता येतील, असं ते म्हणाले. अंकेक्षित व्यवहारांचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन करताना पंतप्रधानांनी, इलेक्ट्रॉनिक मतदान, तसंच मोबाईलसारखं नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या भारतीय नागरिकांच्या सवयीचं कौतुक केलं. आर्थिक तसंच सामाजिक सुधारणांबाबत सकारात्मक प्रयत्न आवश्यक असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबाबत केलेल्या विधानावर आक्षेप घेत काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर पंतप्रधानांनी आपलं निवेदन पूर्ण करताना, काँग्रेस सदस्यांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली, पंतप्रधानांच्या भाषणानंतर राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा धन्यवाद प्रस्ताव काल संमत करण्यात आला.

****

ग्रामीण भागातल्या सहा कोटी ग्रामस्थांना अंकेक्षण साक्षर करण्यासाठी, ‘प्रधान मंत्री ग्रामीण अंकेक्षण साक्षरता अभियान’ राबवण्यास काल केंद्रीय मंत्री मंडळानं मंजुरी दिली. यासाठी दोन हजार, ३१५ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. मार्च २०१९ पर्यंत राबवण्यात येणारा हा प्रकल्प जगातला सर्वात मोठा एकमेव अंकेक्षण साक्षरता प्रकल्प आहे.

****

भारतीय रिझर्व बँकेनं काल, द्वैमासिक आणि या आर्थिक वर्षातला अंतिम पतधोरण आढावा जाहीर केला. व्याज दरांच्या बाबतीत रिझर्व बँकेनं, ‘जैसे थे’ स्थिती ठेवली असून, रेपो दर सहा पूर्णांक पंचवीस आणि रिव्हर्स रेपो दर पाच पूर्णांक पंचाहत्तर टक्के, असे कायम ठेवले आहेत. दरम्यान, बचत खात्यातून रक्कम काढण्यावर असलेली मर्यादा येत्या वीस तारखेपासून वाढवली जाणार असून, दर आठवड्याला पन्नास हजार रुपये काढता येतील, तर येत्या तेरा मार्चनंतर  बचत खात्यावरून पैसे काढण्यावर कोणतीही मर्यादा राहणार नाही, असं रिझर्व बँकेनं काल स्पष्ट केलं. सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी एक पथक स्थापन करण्याचा निर्णयही रिजर्व्ह बँकेनं घेतला आहे.

****

उत्तर प्रदेशातल्या जाहीरनाम्यात भाजपनं शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याच धर्तीवर, राज्यातल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी द्या, अशी मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. काल रात्री उशीरा राज्य मंत्रीमंडळातले शिवसेनेचे मंत्री, एकनाथ शिंदे, रामदास कदम, दिवाकर रावते, आणि दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवास स्थानी भेट घेऊन ही मागणी केली.

दरम्यान, राज्य सरकारच्या पाठिंब्या बाबतचा निर्णय महानगर पालिका निवडणुकी नंतर घेतला जाईल, अशी भूमिका शिवसेनेचे कर्याध्यक्ष, उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटानं मुंबई महापालिका वगळता अन्य ९ महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपाईचे राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. लोणावळा इथं झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या 'कमळ' या निवडणूक चिन्हावर रिपाइं उमेदवारांनी निवडणूक लढवू नये, पुणे तसंच सोलापूर इथं असं करणाऱ्या उमेदवारांना रिपाइंतून निलंबित केल्याचं, सरवदे यांनी जाहीर केलं. पुणे शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहितीही सरवदे यांनी दिली.

****

देशातल्या नद्यांची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी, नद्यांवर पूल आणि बंधारे बांधण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. देशात  फक्त पंधरा ते वीस टक्के पावसाचं पाणी साठवलं जातं तर, सत्तर टक्के पाणी समुद्राला जाऊन मिळतं. समुद्रात जाणारं वीस टक्के पाणी जरी आपण उपयोगात आणू शकलो, तरी मागास भागांचा विकास होऊन, ग्रामीण भागातून शहरात जाणारे लोकांचे लोंढे थांबवता येतील, असं ते म्हणाले.

****

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहेत. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभा झाल्या. यावेळी दोघांनीही एकमेकांवर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पारदर्शकता आणि स्वच्छ कारभाराच्या केंद्राच्या अहवालात मुंबई महापालिका तिसऱ्या स्थानावर आल्याचं श्रेय राज्य सरकारचं असल्याचा दावा केला. मुंबई महापालिकेला बिहारच्या पाटणा महापालिकेइतके गुण मिळाले होते असं सांगत शिवसेनेनं मुंबईला पाटणा शहराच्या बरोबरीला आणून ठेवलं आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देतांना कठोर टीका केली. मुंबईची पाटणा शहराशी तुलना केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत हे खरे असल्यास राजकारण सोडण्याची तयारी असल्याचं ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी काल मराठवाड्यातल्या हिंगोली, जालना जिल्ह्यातल्या राजूर आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या बिडकीन इथं प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या हाती सत्ता सोपवण्याचं आवाहन केलं.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर औरंगाबाद महापालिकेनं शहरातल्या पथदिव्यांच्या वीज बिलांच्या थकबाकीपोटी ५० लाख रूपये भरले. आता महावितरणनं पाणीपुरवठ्याच्या नऊ कोटी रूपयांच्या थकबाकी वसुलीची नोटिस पालिकेला बजावली आहे. चोवीस तासात थकबाकी न भरल्यास पाचही पाणीपुरवठा योजनांचे वीज तोडण्याचा इशारा महावितरणनं दिला आहे.

****

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या, बारावीच्या परीक्षा, २८ फेब्रुवारी पासून, तर दहावीच्या परीक्षा, ७ मार्च पासून सुरू होणार असल्याचं, काल मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे परीक्षांच्या तारखांबाबत संभ्रम निर्माण झाला होता, त्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

****

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहिता पथकानं काल बीड जिल्ह्यातल्या किल्लेधारूर इथं एका मोटारीची तपासणी केली असता पाच लाख रूपयांची रोकड आढळून आली. पथकानं ही मोटार पोलिसांच्या स्वाधीन केली असून चौकशीनंतर कार्यवाही करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जिंतूर तालुक्यातल्या तीन योजनांचं पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे, यामध्ये मौजे वस्सा, कुपटा आणि पिंपळगाव काजळे या गावांचा समावेश आहे. १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत स्वतंत्र योजना करण्यात आल्या आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शिवसेनेकडून लोकसभेवर एकेकाळी निवडून आलेले माने यांनी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

****

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा रसायनशास्त्र विभागातले निवृत्त प्राध्यापक डॉ. डी. जी. धुळे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं. १९७० पासून त्यांनी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागात अध्यापन केलं. तीन वेळा प्रभारी कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.

****

राज्यातल्या केंद्रीय विद्यालयांमध्ये इयत्ता पहिलीचे प्रवेश आता ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत. अहमदनगरच्या केंद्रीय विद्यालयाचे उपप्राचार्य आर डी चंदेल यांनी ही माहिती दिली. यासाठीची नोंदणी प्रक्रिया कालपासून सुरू झाली असून, ती उद्या दहा तारखेपर्यंत चालणार आहे. या प्रक्रियेमध्ये आरक्षण संबंधीची माहिती देण्यात आली आहे.

//*****//

No comments: