Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 05 February 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ फेब्रुवारी २०१७ दुपारी १.००वा.
****
तीन लाख रुपयांपेक्षा अधिक व्यवहार रोखीनं करणाऱ्यांना तेवढ्याच
रकमेचा दंड आकारण्यात येईल, असं महसूल सचिव हसमुख अधिया यांनी स्पष्ट केलं. पीटीआयला
दिलेल्या मुलाखतीत, एक एप्रिलपासून हा नियम लागू होणार असल्याचं ते म्हणाले. २०१७-१८
च्या केंद्रीय अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांपेक्षा अधिक व्यवहार रोखीनं करण्यावर बंदी
घालण्याची तरतूद आहे. विमुद्रीकरणानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बँकांमध्ये जमा झाला
असून, यापुढे भ्रष्टाचराला आळा घालण्यासाठी सरकारकडून अशा उपाययोजना करण्यात येत असल्याचं
अधिया यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकार राज्य सरकारांना पुरेसा निधी पुरवत नसल्याचा
आरोप कोणतंही राज्य सरकार करु शकत नाही, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.
डेहराडून इथं ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांना
निधी उपलब्ध करुन देणं, हे केंद्र सरकारचं घटनात्मक कर्तव्य असल्याचं जेटली यांनी नमूद
केलं. १४व्या वित्त आयोगानं केंद्रीय निधीतला राज्यांचा हिस्सा १० टक्क्यांनी वाढवला
असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
लोकशाहीत नागरिकांसोबत संवाद महत्वाचा असून, त्यासाठीच पंतप्रधान
नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधत असल्याचं
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे. बंगळुरु
इथं ते एका कार्यक्रमात बोलत होते. सुधारणा, कामगिरी आणि बदल हा सरकारचा मंत्र असल्याचं
ते म्हणाले. माध्यमांनी सदैव सत्य समोर आणलं पाहिजे, असं आवाहन नायडू यांनी यावेळी
केलं.
****
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी निवृत्त
मेजर रमेश उपाध्याय यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी विशेष न्यायालयानं
परवानगी दिली आहे. त्यासाठी तीन आठवडे उत्तर प्रदेशात जाण्याची मुभा न्यायालयानं दिल्याचं विशेष सरकारी
वकील अविनाश रसाळ यांनी सांगितलं. उपाध्याय यांना अखिल भारत हिंदू महासभेनं उत्तर प्रदेशातल्या
बलिया जिल्ह्यातून उमेदवारी दिली आहे.
****
चंद्रपूर इथल्या ताडोबा अंधारी व्याघ्र
प्रकल्पात वाघ बघण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना आता फुलपाखरांसोबत
वनविहाराची संधी उपलब्ध होणार आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशदारापाशी असलेल्या मोहार्ली
गावाच्या परिसरात फुलपाखरु उद्यान विकसित करण्यात येणार असल्याचं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी व्याघ्र प्रकल्पासोबतच
आजूबाजूचा परिसर विकसित करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
****
क्रिकेट विश्वात महत्वाच्या
समजल्या जाणाऱ्या 'विस्डेन' या मासिकाच्या वार्षिक अंकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा
मान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला मिळाला आहे. विस्डेनचा-२०१७ चा
अंक एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार असून, अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून 'विस्डेन'नं अंकाचं
मुखपृष्ठ दाखवलं आहे. या अंकावर झळकण्याचा मान मिळवणारा विराट हा दुसरा भारतीय खेळाडू
आहे. यापूर्वी २०१४ साली सचिन तेंडुलकर विस्डेनच्या मुखपृष्ठावर झळकला होता.
****
डोंबिवली इथं सुरु असलेल्या ९०व्या अखिल
भारतीय साहित्य संमेलनात
आज शेवटच्या दिवशी विविध परिसंवादांचं आयोजन
करण्यात आलं आहे. आज सकाळच्या सत्रात कविसंमेलन, तसंच मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत
प्रतिभायन पार पडलं. दुपारी ज्येष्ठ रंगकर्मी कांचन आणि कमलाकर सोनटक्के यांची प्रकट मुलाखत, तसंच
मराठी समीक्षेची समीक्षा, विविध साहित्य प्रवाहांची सद्य:स्थिती या विषयावर परिसंवाद
आणि कथाकथन कार्यक्रम होणार आहे. आज सायंकाळी साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
निवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी आज वयाच्या
शंभराव्या वर्षात पदार्पण केलं. त्यानिमित्त निवृत्त विभागीय आयुक्त जयंत देशपांडे,
डॉ. भास्कर मुंडे, डॉ. उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पुणेरी
शेलापागोटे देऊन त्यांचा सत्कार केला. महसुली अधिकारी वर्गातील आज सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व
असलेल्या भुजंगरावांचा सत्कार करताना अभिमान वाटत असल्याची भावना डॉ. मुंडे यांनी यावेळी
व्यक्त केली.
****
भारत
न्यूझीलंड दरम्यान पुणे इथं सुरु असलेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आज भारतीय टेनिसपटू
रामकुमार रामानाथन आणि युकी भांबरी यांचे आज एकेरी प्रकारातील
सामने होणार आहेत. काल झालेल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात भारतीय टेनिसपटू लिएंडर
पेस आणि विष्णु वर्धन या जोडीचा पराभव झाला. त्याआधी पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे
भारत दोन-एकनं आघाडीवर आहे. मात्र पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी भारताला आजचा एक सामना
जिंकावा लागेल.
//******//
No comments:
Post a Comment