Wednesday, 3 May 2017


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

नागरिकांची ओळख माहिती असणं, हा हक्क असल्याचं सांगत केंद्र सरकारनं आधार पत्राच्या सक्तीचं समर्थन केलं आहे. समाजाचा एक घटक म्हणून,कोणत्याही नागरिकाला, गरज भासेल तेव्हा स्वत:ची ओळख पटवण्याची जबाबदारी पार पाडावीच लागेल, अशी भूमिका सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात मांडली. पॅन कार्ड आणि कर भरण्यासाठी आधार पत्र बंधनकारक करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारनं आपली ही भूमिका स्पष्ट केली.

****

६४ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. कासव या मराठी चित्रपटाला सुवर्णकमळ तसंच दशक्रिया आणि व्हँटिलेटर या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणीतले पुरस्कार प्रदान केले जातील.

****

आज जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिवस साजरा केला जात आहे. या दिवशी जगभरामधल्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचा आढावा घेतला जातो, आणि पत्रकारितेचं कार्य करत असताना मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना आदरांजली वाहिली जाते. मुक्त आणि निर्भय पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, ती लोकशाहीसाठी अत्यावश्यक बाब असल्याचं नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या पत्रकारितेला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचा संदेश एका ट्विटद्वारे आज दिला आहे.

****

उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित आहेत. केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर पंतप्रधान पतंजली योगपीठातल्या संशोधन संस्था आणि हर्बल पार्कचं उद्घाटन करण्यासाठी हरिद्वारला रवाना होणार आहेत.

****

देशातल्या चारशे पस्तीस शहरांचं स्वच्छता मानांकन उद्या जाहीर करण्यात येणार आहे. नागरी विकासमंत्री एम.वेंकय्या नायडू यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरात देशातल्या शहरांच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा झाली असून, शहरविकास मंत्रालयानं याबाबतीत केलेल्या सर्वेक्षणाला अठरा लाख नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं. लोकांना बदल हवा आहे, हे स्वच्छ भारत अभियानातून स्पष्ट होत आहे, असंही नायडू यांनी नमूद केलं.

//*******//


No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 31 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...