Wednesday, 3 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.05.2017 - 1.00pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 May 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मे २०१ दुपारी .००वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी अंतर्गत सुरक्षेसंदर्भात एक महत्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या समवेत देशांतर्गत सुरक्षिततेशी संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

                                ****    

मुस्लिम समाजामध्ये प्रचलित असलेल्या तिहेरी तलाक, निकाह-हलाला आणि बहुपत्नीत्व या पध्दतींच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी येत्या अकरा तारखेपासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे होणार आहे. या सुनावणी दरम्यान ‘न्यायमित्र’ म्हणून हजर राहण्याची परवानगी माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांना सर्वोच्च न्यायालयानं आज दिली.

****

केंद्रीय अन्वेषण विभागानं काल रात्री मुंबईमध्ये आयकर विभागाचे आयुक्त बी.बी.राजेंद्र प्रसाद यांच्यासह सात जणांना अटक केली. लाच घेतल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली असून, यावेळी दीड कोटी रूपयांची रक्कम जप्त केल्याची माहिती याबाबतच्या वृत्तात पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे.

****

वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी तसंच काळ्या धनाविरोधातली कारवाई, या मुद्दयांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासह सचिव स्तरावरचे अधिकारी उपस्थित होते. बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत पंतप्रधानांनी या बैठकीदरम्यान दिले.

****

देशभरात सध्या प्रचलित असलेलं एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष बदलून ते जानेवारी ते डिसेंबर असं करणारं मध्यप्रदेश हे देशातलं पहिलं राज्य बनलं आहे. हा निर्णय काल भोपाळ इथं झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.

****

ब्राम्होस या जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आधुनिक आवृत्तीचं चाचणी प्रक्षेपण यशस्वी झालं आहे. भारतीय सैन्यानं या क्षेपणास्त्राची अंदमान निकोबार बेटांवर घेतलेली चाचणी पूर्णत: अचूक आणि यशस्वी ठरल्याचं एका वरिष्ठ सेना अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.

****

जम्मू काश्मिर या राज्याचा आर्थिक विकास व्हावा आणि हे राज्य देशाच्या उर्वरित भागाशी अधिक उत्तमपणे जोडलं जावं या सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून येत्या दोन वर्षात या राज्यातल्या चेनाब नदीवर एक भव्य पूल बांधण्यात येणार आहे. हा पूल तयार झाल्यानंतर जगातला सर्वात जास्त उंचीवरचा पूल ठरेल आणि त्याची उंची पॅरिसच्या आयफेल टॉवरहूनही जास्त असेल, असं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एक हजार एकशे कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणारा हा पूल कतरामधील बक्कल ते श्रीनगरमधील कौरी या स्थानांना एकमेकांशी जोडणार आहे.

*****

भारतीय रेल्वेनं महाराजा एक्सप्रेस, या आलीशान रेल्वेगाडीच्या दोन नवीन सहली सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, जून आणि जुलैमध्ये होणाऱ्या या सहलींच्या एका तिकिटावर दुसरं तिकिट मोफत मिळणार आहे. ‘सदर्न सोजोर्न’ आणि ‘सदर्न ज्युएल्स’ या दोन सहलींमध्ये दक्षिण भारतातल्या काही प्रसिध्द पर्यटन स्थळांसह गोव्यातील काही स्थळांचा समावेश असेल. याबाबतची संपूर्ण माहिती महाराजा एक्सप्रेसच्या किंवा आयआरसीटीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

****

आफगाणिस्तानची राजधानी काबूल इथं आज झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात चार जण मृत्यूमुखी पडल्याचं आणि अन्य बावीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. काबूलमधल्या अमेरिकेच्या दूतावासासमोर नाटोच्या एका पथकाला लक्ष्य करत हा हल्ला झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

येत्या शुक्रवारी पाच तारखेला भारतीय अवकाश संशोधन संस्था दक्षिण आशिया उपग्रहाचं अवकाशात प्रक्षेपण करणार आहे. हा उपग्रह म्हणजे भारतानं दक्षिण आशियाला दिलेली एक भेट असल्याचं सांगत, या उपग्रहामुळे भारताच्या अनेक शेजारी देशांना लाभ होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद इथं आज वस्तू आणि सेवाकर कायद्याविषयी एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा गांधी मिशनच्या रूक्मिणी सभागृहात दुपारी तीन वाजता ही कार्यशाळा होणार आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ, केंद्रीय अबकारी कर, उत्पादन शुल्क आणि सेवा कर कार्यालय यांच्या वतीनं होणाऱ्या या कार्यशाळेत व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

पुण्यातल्या शुक्रवारपेठेतल्या एका तीन मजली वाड्याला आज सकाळी लागलेल्या आगीत एका व्यक्तिचा मृत्यू झाला तर अग्निशमनदलाचे चार कर्मचारी जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर सहा तासात नियंत्रण मिळवलं.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 31 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...