आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
६ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
बँकिंग नियामक कायद्यात सुधारणा करण्यासंबंधीच्या अध्यादेशाला राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी यांनी काल मान्यता दिली. देशातील बँकांकडील थकीत कर्जांचा बोजा वाढत
असून नुकताच त्यानं सहा लाख कोटीचा टप्पा ओलांडला आहे. बुडीत खात्याचा प्रश्न सोडविण्यासाठी
भारतीय रिझर्व्ह बँकेला वाढीव अधिकार देण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे.
****
सार्क
देशांच्या उपग्रह प्रकल्पामधून वगळल्याबद्दल पाकिस्ताननं भारतावर टीका केली आहे. भारत एकत्रित सहकार्यानं
हा प्रकल्प बनवण्यास उत्सुक नसल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे. १८ व्या सार्क परिषदेत
भारतानं सार्क संघटनेच्या सदस्य देशांना उपग्रह भेट देऊ केला होता. त्यास सार्क उपग्रह
असं नावही निश्चित करण्यात आलं होतं. मात्र नंतर भारतानं स्वत:च हा प्रकल्प तयार करण्याचं
जाहिर केलं.
****
खासगी
शैक्षणिक संस्थांनी शिक्षणाचे बाजारीकरण करण्यासाठीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नवी
दिल्लीतल्या अनेक पालक संघटनांनी शिक्षणासंदर्भातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी
करून घेण्याची मागणी राज्य शासनाला केली आहे. या संघटनांनी शुल्क नियामक समितीमध्ये
त्यांना सहभागी करून घेण्याची मागणी केली आहे. तसंच या संघटनांनी पालक आणि शिक्षक संघटनांना
अधिक बळकट करण्यात यावं असंही म्हटलं आहे.
*****
राज्य
सरकारनं राज्यामधील रुग्णालयांमध्ये आंतरराष्ट्रीय रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक मार्गदर्शिका
तयार करण्याचं ठरवलं आहे. जगातल्या सर्वात लठ्ठ महिला असलेल्या इजिप्तच्या इमाद अहमद
यांच्यावर मुंबईतल्या एका इस्पितळात उपचार करण्यावरून झालेल्या वादंगानंतर हा निर्णय
घेण्यात आला आहे. ज्याप्रकारे इमान यांचं वजन कमी करण्यात आलं त्याचा अभिमान असल्याचं
आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आरोग्य विभागातल्या
अधिकाऱ्यांना याबाबत मार्गदर्शिका तयार करून सर्व इस्पितळांना जारी करण्याचे निर्देश
दिले आहेत.
****
औरंगाबाद
इथं महात्मा गांधी मिशनच्या वतीनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या
जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे.वसंतदादा पाटील
आणि महाराष्ट्र कालचा, आजचा, उद्याचा या विषयावर हा परिसंवाद होणार आहे. एमजीएमच्या
रूक्मिणी सभागृहात संध्याकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक
मधुकर भावे, शैलजा पाटील, यशवंत हुप्पे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
****
No comments:
Post a Comment