Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 May 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ मे २०१७ दुपारी १.००वा.
****
एकात्मिक
वाहतूक आणि पुरवठा परिषदेच्या नवी दिल्लीमध्ये झालेल्या समारोपप्रसंगी दोन लाख कोटी
रुपयांच्या ३४ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. भूपृष्ठ परिवहन मंत्री
नितीन गडकरी यांनी या परिषदेला संबोधित करताना या क्षेत्रामध्ये भविष्यात होऊ घातलेल्या
मोठ्या सकारात्मक बदलांची ही नांदी असल्याचं म्हटलं आहे. पायाभूत सुविधांमध्ये वाढ
करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोण आणि सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचं गडकरी यावेळी
म्हणाले.
*****
थकीत
कर्जाबाबत रिजर्व्ह बँकेनं नियम अधिक कडक केले असून बुडीत कर्जाबाबत कोणतीही धरसोड
केल्यास बँकांना आर्थिक दंड करण्याची तरतूद केली आहे. आर बी आयनं याबाबत एक अध्यादेश
जारी केला आहे. अर्थव्यवस्थेमधील तणावग्रस्त भाग भांडवलास पुन्हा चालना देण्यासाठी
आयोजित एका परिषदेमध्ये निर्णय प्रक्रिया सुलभ करण्यासाठीच्या उपाययोजना देखील या अध्यादेशामध्ये
करण्यात आल्या आहेत.
****
केंद्र
सरकारनं जम्मू आणि काश्मीर सरकारला पाकिस्तानच्या आणि सौदी वाहिन्यांचं अनधिकृत प्रसारण
बंद करण्यास सांगितलं आहे.याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्री एम वेंकय्या नायडू यांनी
राज्य सरकारकडून एक सर्वंकष अहवाल मागितला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय या वाहिन्यांचं
प्रसारण सुरू असल्याबद्दल नायडू यांनी चिंताही व्यक्त केली आहे. अशा अवैध प्रसारण करत
असलेल्या वाहिन्यांचे उपकरणं जप्त करण्याचा राज्य सरकारला अधिकार असल्याचं यापूर्वी
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी म्हटलं आहे.
****
देशातल्या सर्व अनाथाश्रमांमधल्या
तसंच बाल संगोपन केंद्रांमधल्या बालकांची सुरक्षा आणि हिताचं रक्षण व्हावं यासाठी या
बालकांबाबतच्या तपशीलाच्या नोंदी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य
सरकारनं दिले आहेत.
केंद्र
सरकार, सर्व राज्य सरकार तसंच केंद्रशासित प्रदेशांनी चालू वर्षाअखेर पर्यंत सर्व अनाथ
आश्रम आणि बालसंगोपन केंद्रांची नोंदणी करण्यास सांगितलं आहे. या बालकांचं पुनर्वसन
करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं रोजगाराभिमुख तसंच कौशल्य विकास कार्यक्रम राबवावेत,
असं न्यायालयानं एका जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान म्हटलं आहे.
****
एचआयव्ही
बाधित मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळवून देणाऱ्या २००९ सालच्या कायद्यांतर्गत,
एचआयव्ही बाधित मुलांना सर्व राज्यांनी वंचित घटकांच्या यादीत समाविष्ट करण्याची अधिसूचना
जारी करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांच्या
अध्यक्षतेखालच्या पीठानं एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान हा आदेश दिला. आतापर्यंत
अकरा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशानं संबंधित अधिसूचना जारी केली असून, जम्मू-काश्मीर
वगळता उर्वरित सर्व राज्यांनी येत्या आठ आठवड्यामध्ये ती जारी करावी, असं या न्यायालयानं
म्हटलं आहे.
****
उत्तराखंड
इथल्या बद्रीनाथाच्या मंदिराचे दरवाजे आजपासून भाविकांसाठी उघडण्यात आले. सकाळी चार
वाजून पंधरा मिनिटांनी धार्मिक विधी पार पडल्यानंतर हजारो भाविकांनी बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांनीही आज सकाळी बद्रीनाथाच्या मंदिरात पूजा केली आणि दर्शन घेतलं.बद्रीनाथाचं मंदिर
उघडल्यामुळं आता चारीधाम यात्रेला पूर्णपणे सुरूवात झाली आहे. आता पुढील सहा महिने
मंदिर भाविकांसाठी सुरू रहाणार आहे.
****
थोर
समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर शाहू
महाराजांना आदरांजली वाहिली आहे.
****
रूबेला
नावाच्या एका व्हायरसपासून लहान मुलांमध्ये होणाऱ्या आजाराचं निर्मुलन करण्यासाठी राज्य
सरकारनं जागतिक आरोग्य संघटना हू सोबत या आजाराच्या लसीकरणा संदर्भात करार केला आहे.
आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी काल पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिली.
नऊ महिन्यांपासून ते १५ वर्ष वयाच्या सर्व मुलांना पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापासून
या लसीकरणांतर्गत लस देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे अभियान संपूर्ण राज्यात
राबवलं जाणार आहे.
****
श्रीपाद
भालचंद्र जोशी यांच्या काव्यप्रवासाचा आढावा घेणारा ‘एक कवी-दोन भाष्यकार’ या कार्यक्रमाचं
आज औरंगाबाद इथं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉक्टर नांदापूरकर
सभागृहात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर
रसाळ, प्रभाकर बागले हे कवितासंग्रहावर भाष्य करणार आहेत.
****
मलेशिया
इथं होत असलेल्या सुलतान अझलान शहा हॉकी चषक सामन्यांमध्ये मलेशिया विरूध्द झालेल्या
सामन्यात भारताचा पराभव झाला. स्पर्धेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी आज भारत आणि
न्यूझीलंडमध्ये सामना होणार आहे.
****
जागतिक
बॅडमिंटन संघटनेनं घोषित केलेल्या क्रमवारीनुसार भारताची पी.व्ही.सिंधु चौथ्या स्थानावर
तसंच सायना नेहवाल नवव्या स्थानावर घसरली आहे. चीन इथं झालेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत
सिंधुला उपान्त्यपूर्व फेरीत, तर सायनाला पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला
होता.
****
ताश्कंद इथं सुरू असलेल्या
आशियाई बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत भारताचा शिव थापा आणि सुमीत संगवान यांनी अंतिम
फेरीत प्रवेश केला आहे.
****
No comments:
Post a Comment