Friday, 5 May 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 05 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ५ मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       चालू वर्षाचा स्वच्छता सर्वेक्षण अहवाल जारी; मराठवाड्यातल्या एकाही शहराचा पहिल्या शंभर शहरात समावेश नाही

·       राज्यातल्या सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा तसंच महापालिकांचा गौरव, उस्मानाबाद नगर परिषदेला अ वर्ग नगरपरिषदेचा पुरस्कार 

·       भिलार या देशातल्या पहिल्या पुस्तकांच्या गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आणि

·       ालन्याचे उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना तीन लाख रुपयांच्या लाच प्रकरणी अटक

****

चालू वर्षाचा स्वच्छता सर्वेक्षण अहवाल काल नवी दिल्लीत जारी करण्यात आला. या अहवालात पहिल्या दहा शहरात नवी मुंबईनं स्थान पटकावलं आहे. केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत ही यादी जाहीर केली. मध्यप्रदेशातलं इंदूर प्रथम क्रमांकावर, भोपाळ दुसऱ्या क्रमांकावर तर नवी मुंबई आठव्या क्रमांकावर आहे. या यादीत नवी मुंबई, पुणे आणि बृहन्मुंबई वगळता राज्यातल्या इतर शहरांचा स्वच्छता अहवाल समाधानकारक नसल्याचं, या क्रमवारीतून स्पष्ट होतं. या यादीत पुणे तेराव्या तर मुंबई २९ व्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यातल्या एकाही शहराचा पहिल्या शंभर शहरात समावेश नाही. नांदेड १९२ व्या क्रमांकावर, उस्मानाबाद २१९, उदगीर २४०, औरंगाबाद २९९, बीड ३०२, लातूर ३१८, तर जालना ३६८ व्या क्रमांकावर आहे. एकूण ४३४ शहरांच्या या यादीत भुसावळ हे ४३३ व्या क्रमांकावर आहे.

****

महाराष्ट्र हे देशातलं पहिलं उघड्यावर शौचापासून मुक्त राज्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पहिल्या नगरविकास दिनानिमित्त काल मुंबईत राज्यातल्या सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा तसंच महापालिकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात आतापर्यंत दोनशे पन्नास शहरांपैकी पैकी दोनशे शहरं उघड्यावर शौचपासून मुक्त करण्यात आली असून उर्वरित सर्व शहरं तसंच गावं या वर्षभरात निर्मल करण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

या कार्यक्रमात औरंगाबाद विभागातून उस्मानाबाद नगर परिषदेनं अ वर्ग नगर परिषदेचा चार कोटी रुपयांचा पुरस्कार पटकावला. ब गटात हिंगोली नगर परिषदेला तीन कोटी रुपयांचा प्रथम तर वैजापूर नगर परिषदेला दोन कोटी रुपयांचा द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. क वर्ग नगर परिषदेचा पहिला अडीच कोटी रुपयांचा पुरस्कार तुळजापूर नगर परिषदेला, तर दोन कोटी रुपयांचा दुसरा विभागीय पुरस्कार पाथरी नगर परिषदेला देण्यात आला. शासनाच्या विविध नागरी योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी तसंच शहरं स्वच्छ ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकरता हे पुरस्कार देण्यात आले.

****

सातारा जिल्ह्यतल्या भिलार या देशातल्या पहिल्या पुस्तकाच्या गावाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं.भिलार वासियांनी देशात आपली आगळी वेगळी ओळख प्रस्थापित केली असून,वाचन संस्कृती रुजवू समृद्ध करण्यासाठी साहित्यिक, आणि प्रकाशकांनी भिलार इथं येऊन कार्यक्रम करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक यावेळी उपस्थित होते. परदेशात अशा प्रकारची संकल्पना रुजू शकते, तर आपल्या देशात का नाही. या जाणीवेतून पुस्तकाच्या गावाची संकल्पना पुढे आल्याचं तावडे यावेळी म्हणाले.

****

शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल कोल्हापूर इथं संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संघटनेच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आपला लढा सुरूच राहील, असा इशाराही खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला.

****

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य आयोगासमोर मांडण्यासाठी राज्य सरकारला न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचं, मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात काल झालेल्या सुनावणीत राज्य सरकारनं, या संदर्भातली कागदपत्रं पडताळणी आणि शिफारशीसाठी मागासवर्ग आयोगासमोर सादर करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयानं सरकारनं या बाबतचा निर्णय घ्यावा, असं म्हटलं आहे.

****

बहुचर्चित बिल्किस बानो प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं अकरा दोषींची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. मात्र यापैकी तिघांना मृत्यूदंड देण्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. या प्रकरणी डॉक्टर तसंच पोलिस कर्मचाऱ्यांसह सहा जणांवर पुराव्यांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली खटला चालवण्याचे निर्देश न्यायालयानं केंद्रीय गुन्ह अन्वेषण विभागाला दिले आहेत.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

ालन्याचे उपजिल्हाधिकारी राजेश उर्फ राजाराम इतवारे यांना तीन लाख रुपये लाचेची मागणी आणि लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल अटक केली. सुमारे ६१ लाख रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी इतवारे यांनी आपल्या एका सहकाऱ्यामार्फत साडे चार लाख रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती तीन लाख रुपये लाच स्वीकारण्याचा प्रयत्न करताना इतवारे आणि त्यांच्या सहकाऱ्याला अटक करण्यात आली.

****

शेतकऱ्यांकडची सर्व तूर शासनानं खरेदी करावी, अशी विनंती करणारी आणखी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल दाखल करण्यात आली. यापूर्वी दाखल एका याचिकेसह या दोन्ही याचिकांची सुनावणी आज खंडपीठासमोर होणार आहे.

****

बीदर मुंबई ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी रेल्वे नियमित करावी, आणि बीदर यशवंतपूर, बीदर हैदराबाद या दोन रेल्वे गाड्यांचा विस्तार लातूर पर्यंत करावा या मागणीसाठी काल उदगीर इथं बंद पाळण्यात आला. सर्व पक्षीय नेत्यांनी पुकारलेल्या उदगीर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातल्या बाजारपेठा बहुतांशी बंद असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ही रेल्वे नियमित करण्यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

दरम्यान, लातूर एक्सप्रेस ही गाडी बीदर पर्यंत वाढवण्यास लातूर तसंच उस्मानाबाद इथल्या नागरिकांचा विरोध आहे. यापार्श्वभूमीवर नऊ मे रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, बिदरपर्यंत विस्तारित केलेली लातूर - मुंबई रेल्वे लातू इथूनच सोडवी या मागणीच निवेदन लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी काल दिल्ली रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना दिलं. प्रभू यांनी या मागणीचा सकारात्मक विचार कही रेल्वे लातूर - मुंबई अशीच राहणार असल्याची खात्री दिल्याच डॉक्टर गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा-नागनाथ नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला असून, नगराध्यक्ष पदाचा कार्यभार वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात ल्यांच, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

औरंगाबाद जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सध्या २२३ गावांमध्ये सुरू असलेली सर्व कामं येत्या १५ जून पर्यंत यंत्रणांनी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी काल औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत दिले. कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकारी वर्गातली उदासिनता दूर करणं आवश्यक असल्याचं मत विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल परभणी इथं पत्रकारांशी बोलत होते. मराठवाडा सक्षम व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, शासनाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनीही सक्षम राहावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

लातूर जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पौलकर यांची मध्य रेल्वेच्या झोनल रेल्वे सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवाशांचे प्रश्न रेल्वे मंडळाकडे मांडण्यासाठी ही समिती कार्यरत आहे.

****

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे राज्यातल्या सर्व कारागृहातल्या कैद्यांसाठी विविध पदविका, पदवी तसंच पदव्यूत्तर पदवी शिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू ई वायूनंदन यांनी काल नाशिक इथं एका कार्यक्रमात ही घोषणा केली. गुन्हेगारी मानसिकता बदलून कैद्यांना समाजात एक चांगला नागरिक म्हणून जगता यावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं कुलगुरू म्हणाले.

****

कोल्हापूर इथं महिलांसाठी मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याचं, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर इथं बोलत होते. महिला स्वयंपूर्ण व्हाव्यात हा या मागचा उद्देश असल्याचं, पाटील यांनी सांगितलं. हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा तसंच आवश्यक निधी सरकारकडून उपलब्ध करून दिला जाईल, असं पाटील यांनी यावेळी नमूद केलं. 

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...