Thursday, 4 May 2017

Text - AIR News Bulletins, Aurangabad 04.05.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 04 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ मे  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

देशात डिजिटल आणि इंटरनेट सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून भारतीय प्रसारण सेवा आता डिजिटल प्रसारणाच्या युगात प्रवेश करण्याच्या टप्प्यात असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण - ट्राय च्या वर्धापनदिनाच्या अनुषंगानं आज नवी दिल्लीत डिजिटल प्रसारणावर आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमामुळे देशात रेडिओची लोकप्रियता वाढली असल्याचं ते म्हणाले. रेडिओनं फक्त पंतप्रधानांचेच विचार नाहीत तर लोकांचे विचारांही जनसामान्यांपर्यंत पोहोचवले असल्याचं नायडू यांनी नमूद केलं.

****

मतदान यंत्रांशी छेडछाड होत असल्याबद्दल विरोधी पक्ष करत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं येत्या १२ तारखेला सर्व राजकीय पक्षांची एक बैठक बोलावली आहे. गेल्या महिन्यात १६ विरोधी पक्षांनी आयोगाकडे इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीऐवजी, मतपत्रिकेद्वारे मतदानची जुनी पद्धत पुन्हा वापरण्याची मागणी केली होती. आयोगानं मात्र मतदान यंत्राशी छेडछाड झाली असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

****

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाल्यामुळे ही कारवाई केली जात आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहशतवादी असल्याचं वृत्त मिळाल्यानंतर या भागातल्या २० गावांना घेराव घालून शोधमोहीम राबवली जात आहे.

****

पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या, अण्वस्त्र क्षमता असलेल्या अग्नि-२ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची आज घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली आहे. ओडिशाच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेलं हे क्षेपणास्त्र दोन हजार किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओनं हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे.

****

महाराष्ट्र हे देशातलं पहिलं उघड्यावर शौचापासून मुक्त राज्य करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पहिल्या नगरविकास दिनानिमित्त आज मुंबईत राज्यातल्या सर्वोत्कृष्ट नगरपरिषदा तसंच महापालिकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात आतापर्यंत चार लाख शौचालयं बनवण्यात आली आहेत. दोनशे पन्नास शहरांपैकी पैकी दोनशे शहरं उघड्यावर शौचपासून मुक्त करण्यात आली असून उर्वरित सर्व शहरं तसंच गावं या वर्षभरात निर्मल करण्यात येणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात औरंगाबाद विभागातून उस्मानाबाद नगर परिषदेनं अ वर्ग नगर परिषदेचा पुरस्कार पटकावला. ब वर्ग नगर परिषदेचा पहिला आणि दुसरा विभागीय पुरस्कार अनुक्रमे हिंगोली तसंच वैजापूर नगर परिषदेला प्रदान करण्यात आला. क वर्ग नगर परिषदेचा पहिला आणि दुसरा विभागीय पुरस्कार अनुक्रमे तुळजापूर आणि पाथरी नगर परिषदेला देण्यात आला.

****

बीदर मुंबई ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी रेल्वे नियमित करावी, आणि बीदर यशवंतपूर, बिदर - हैद्राबाद या दोन रेल्वेचा विस्तार लातूरपर्यंत करण्यात यावा या मागणीसाठी आज उदगीर इथं बंद पाळण्यात आला. सर्व पक्षीय नेत्यांनी पुकारलेल्या उदगीर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातल्या बाजारपेठा बहुतांशी बंद असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ही रेल्वे नियमित करण्यासंदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.
दरम्यान, लातूर एक्सप्रेस ही गाडी बीदर पर्यंत वाढवण्यास लातूर तसंच उस्मानाबाद इथल्या नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे उद्या उस्मानाबाद जिल्हा बंद पुकारण्यात आला असून, ९ मे रोजी रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

****

औरंगाबाद जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत सध्या २२३ गावांमध्ये सुरू असलेली सर्व कामे येत्या १५ जूनपर्यंत यंत्रणांनी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज औरंगाबाद इथं यासंदर्भात झालेल्या बैठकीत दिले. कामं वेळेत पूर्ण न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

****

शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापूर इथं खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. संघटनेच्या वतीनं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आपला लढा सुरूच राहील, असा इशाराही खासदार शेट्टी यांनी यावेळी दिला. संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या मोर्चात सहभागी झाले नाहीत.

****

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे राज्यातल्या सर्व कारागृहातल्या कैद्यांसाठी विविध पदविका, पदवी तसंच पदव्यूत्तर पदवी शिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू ई वायूनंदन यांनी आज नाशिक इथं एका कार्यक्रमात ही घोषणा केली. गुन्हेगारी मानसिकता बदलून कैद्यांना समाजात एक चांगला नागरिक म्हणून जगता यावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं कुलगुरू म्हणाले.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...