Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date- 06
May 2017
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ६
मे २०१७ सकाळी ६.५०
****
· निर्भया अत्याचार प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर
सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब
· शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरत
असल्याची काँग्रेसची टीका
· नागपूर ते मुंबईसाठी दोन महामार्ग असतांना वेगळ्या समृद्धी
महामार्गाची गरज काय - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा सवाल
आणि
· लातूर एक्सप्रेसचं विस्तारीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर तसंच उस्मानाबाद बंदला संमिश्र प्रतिसाद
****
दिल्लीत २०१२ साली घडलेल्या निर्भया
अत्याचार प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल
सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. या प्रकरणातल्या सहा आरोपींपैकी एकानं तिहार तुरुंगात
आत्महत्या केली होती तर एका अल्पवयीन आरोपीला न्यायालयानं तीन वर्ष बालसुधारगृहात ठेवण्याचे
आदेश दिले होते. उर्वरित चौघांची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयानं कायम ठेवली होती.
या निर्णयाला दोषींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, सर्वोच्च न्यायालयानं
फाशीचा निर्णय कायम ठेवला.
दरम्यान, फाशीच्या
शिक्षेवर अंमलबजावणी करण्यासाठी निश्चित कालावधीची तरतूद असली पाहिजे, असं ज्येष्ठ
विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर इथं बोलत होते. निर्भया प्रकरणाच्या
पार्श्वभूमीवर कायद्यातल्या सुधारणा केल्यानंतर ही पहिलीच फाशीची शिक्षा असून मुंबईच्या
शक्ती मिल अत्याचार प्रकरणी आपण दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली असल्याचं, निकम
यांनी सांगितलं.
****
वैद्यकीय आणि दंतचिकित्सा पदव्युत्तर
अभ्यासक्रमांत स्थानिक विद्यार्थ्यांसाठी आरक्षण ठेवण्याचा राज्यसरकारचा निर्णय सर्वोच्च
न्यायालयानं रद्द ठरवला आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांचा तुटवडा दुर व्हावा तसंच रूग्णांना
चांगली सेवा मिळावी या उद्देशानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला होता.
****
गेल्या २२ एप्रिल पर्यंत तूर खरेदी
केंद्रांवर आलेल्या १० लाख ५०० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती
राज्यशासनानं काल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांची
सगळी तूर सरकारनं खरेदी करावी अशी विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान
राज्यशासनानं २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर शिल्लक असलेली, दहा लाख क्विंटल तूर
खरेदीसाठी ५७० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सांगितलं. न्यायालयानं यासंदर्भात
केंद्र तसंच राज्यशासनाला शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले असून या याचिकेची पुढील
सुनावणी सहा आठवड्यांनी होणार आहे.
****
शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यास राज्य
सरकार अपयशी ठरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तूर खरेदी प्रकरणी लक्ष घालून योग्य
ती पावलं उचलावीत अशी, विनंती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राज्यात
तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं असून, तुरीला अपेक्षित दर नसल्यानं, शेतकरी अडचणीत
आला आहे. या समस्या दूर करण्याऐवजी कृषी मंत्री, तसंच अन्न आणि पुरवठा वितरण मंत्री
विधीमंडळाचं शिष्टमंडळ घेऊन परदेश दौऱ्यावर गेल्याबाबत त्यांनी रोष व्यक्त केला.
राज्यातल्या शेतकऱ्यांची काळजी असेल तर शिवसेनेनं आधी सरकारमधून
बाहेर पडावं आणि नंतर शिवसंपर्क अभियान सुरु करावं, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार
अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकार विरोधात
खुद्द मंत्रीच आंदोलन करत आहेत, अशी परिस्थिती राज्याच्या इतिहासात पूर्वी कधी आली नव्हती, अशी टीकाही
चव्हाण यांनी केली.
****
राज्यातला वीज पुरवठा आठवडाभरात सुरळीत होईल, असं महावितरणचे
जनसंपर्क अधिकारी पी.एस. पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. कोराडी,
खापरखेडा आणि परळी इथल्या औष्णिक विद्युत निर्मितीच्या संचात बिघाड झाल्यानं विजेची
टंचाई झाली आहे, या संचाच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं पाटील यांनी
सांगितलं.
****
विमान प्रवासादरम्यान असभ्य वर्तन करणाऱ्या
प्रवाशांना प्रवासबंदीसाठी नागरी हवाई वाहतुक मंत्रालयानं नो फ्लाय लिस्ट मसुदा जारी
केला आहे. आक्षेपार्ह हावभाव, धक्काबुक्की अथवा लैंगिक छळ आणि जीवे मारण्याची धमकी
देणं, आदी कारणांसाठी प्रवाशांवर तीन महिने किंवा दोन वर्षांपर्यंत प्रवासबंदी घालण्यात
येणार आहे. शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड आणि एअर इंडिया विमान कंपनीदरम्यान झालेल्या
वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील मसुद्यावर येत्या ३० जूनपर्यंत
जनतेच्या सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या जात असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार
आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत सकारात्मक निर्णय
घेण्यात येईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जे.पी. नड्डा यांनी सांगितलं. काल मुंबई
इथं आशा स्वयंसेवी शिष्टमंडळानं नड्डा यांची भेट घेऊन, आपल्या मागण्यांचं निवेदन सादर
केलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनीही आशा स्वयंसेविकांच्या
विविध समस्या तसंच मागण्यांसंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. आदिवासी
बहुल भागात वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी, ठोस निर्णय घेणार असल्याचं केंद्रीय आरोग्य
मंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी दोन महामार्ग
असतांना वेगळ्या समृद्धी महामार्गाची गरज काय, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
मेधा पाटकर यांनी केला आहे. त्या काल औरंगाबाद इथं पत्रकारांशी बोलत होत्या. या समृद्धी
महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याकरता सरकार पोलीस बळाचा वापर करत
असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. या महामार्गासाठी २० हजार ८२० हेक्टर शेतजमीन संपादित
होणार असून यापैकी बहुतांश जमीन कसदार असल्याचा उल्लेखही पाटकर यांनी केला.
****
मुंबई लातूर एक्सप्रेसचं बीदरपर्यंत झालेलं विस्तारीकरण कायमचं रद्द करावं या मागणीसाठी काल लातूर तसंच उस्मानाबाद इथं बंद पाळण्यात आला.
या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दोन्ही शहरातल्या बाजारपेठा बहुतांशी बंद होत्या.
लातूर इथं रेल्वे बचाव
समितीनं बंद पुकारला होता. काल सकाळी शहराच्या विविध भागात फिरुन दुकानं बंद करण्याचं
आवाहन करत असलेल्या रेल्वे बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं.
कुर्ला बीदर ही रेल्वे नियमित करावी, लातूर एक्सप्रेसचं विस्तारीकरण रद्द करावं, या
मागण्या मान्य केल्या नाहीत तर येत्या ९ मे रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा समितीनं
दिला आहे.
उस्मानाबाद इथं रेल्वे लोक आंदोलन समिती, जिल्हा व्यापारी महासंघ,
पत्रकार संघ, जिल्हा विधीज्ञ मंडळ, रोटरी क्लब या संघटनांसह सर्व राजकीय पक्षांनीही
बंदचं आवाहन केलं होतं. आपल्या मागण्यांचं निवेदन या संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर
केलं. लातूर मुंबई रेल्वे पूर्ववत सुरू ठेवावी, अहमदाबाद हैदराबाद रेल्वेला उस्मानाबाद
इथं थांबा द्यावा, पुणे उस्मानाबाद इंटरसिटी रेल्वे सुरू करावी, उस्मानाबाद रेल्वे
स्थानकावर आरक्षण केंद्र सुरू करावं, आदी मागण्यांचा यात समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर इथं सिंचन
विभागाचा कार्यकारी अभियंता अशोक शिर्के याला काल ३८ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ
अटक करण्यात आली. नांदुर मधमेश्वर कालव्यातल्या पोटचारीच्या कामाचं देयक मंजूर करण्यासाठी
शिर्के यानं लाच मागितली होती, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल सापळा रचून त्याला
अटक केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात भूजल पातळीत घट
झाली आहे. जिल्ह्यात २३८ गावांना पाणी टंचाई भासत असून, या गावांसह सात वाड्यांना २९२
टँकर्सनं सध्या पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाणी पुरवठ्यासाठी २५६ गावातल्या
३०५ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.
****
पाण्याच्या टँकरची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची
घटना परभणी इथं काल सकाळी घडली. शहरातल्या सुपरमार्केट परिसरात हा अपघात घडला. या प्रकरणी
नवा मोंढा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
//********//
No comments:
Post a Comment