Sunday, 14 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 14.05.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 May 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १४ मे २०१ दुपारी .००वा.

****

जम्मू काश्मीरमध्ये आज पुन्हा पाकिस्तानी लष्करानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. राजौरी जिल्ह्यातल्या मंजाकोट आणि केरी सेक्टरमध्ये आज सकाळी पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार केला. सीमेवर तैनात भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

****

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी बनावट कंपन्यांच्या नावे देणग्या वसूल केल्या असल्याचा आरोप, पक्षातून बडतर्फ करण्यात आलेले नेते कपिल मिश्रा यांनी केला आहे. नवी दिल्ली इथं आज घेतलेल्या वार्ताहर परिषदेत मिश्रा यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्षावर आरोप केले. पक्षाला पैशांची गरज नसतानाही नागरिकांकडून देणगी म्हणून दहा दहा रुपये गोळा करण्यात आल्याचं ते म्हणाले. दिल्लीमध्ये नोटाबंदीच्या काळातही काळा पैसा पांढरा केला जात होता, असा आरोप त्यांनी केला. पक्षानं निवडणूक आयोगालाही खोटी माहिती दिल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, आम आदमी पक्षानं मिश्रा यांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. 

****

कायमस्वरुपी शिक्षक न नेमणाऱ्या शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्थांना अनुदान दिलं जाणार नाही, असा इशारा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे. नवी दिल्ली इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शिक्षकांची भरती हंगामी तत्वावर करण्यास आपलं मंत्रालय अनुकूल नाही, त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी कायमस्वरुपी शिक्षक नेमल्यावरच त्यांना अनुदान मिळेल, असं ते म्हणाले.

****

केंद्र सरकारनं देशभरात सामुदायिक रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठी देण्यात येणारं अनुदान ५० टक्क्यांवरुन ७५ टक्के इतकं वाढवलं आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये यासाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी चेन्नई इथं ही माहिती दिली. विविध विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांना सामुदायिक रेडिओ केंद्रं स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणार असल्याचं ते म्हणाले. सामुदायिक रेडिओ हे बोली भाषेत स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं साधन असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी मंत्रालयाच्या कामाचा आढावा घेतला.  

****

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यावर जिल्हा प्रशासनानं भर द्यावा, असं केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटलं आहे. यवतमाळ जिल्हा विकास समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या योजनेतील निधीचा वापर ग्रामीण भागातले रस्ते बांधकामासाठी करावा असं ते म्हणाले.

****

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि कर्जमाफी करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या २२ ते ३० मे दरम्यान आत्मक्लेश यात्रा काढणार आहे. खासदार राजू शेट्टी यांनी पुणे इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. पुण्यातल्या फुले वाड्यापासून ही यात्रा सुरु होणार असून, मुंबईत राजभवन इथं यात्रेचा समारोप होणार आहे. समान्य नागरिकांनीही या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

परळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आज मतदान होत आहे. याकरता ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत वीस टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पंकजा मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनल आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनल यांच्यात ही निवडणूक होत आहे. उद्या मतमोजणी होणार आहे.

****

परभणी मिरखेल हा दुहेरी रेल्वे मार्ग या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु होणार असून, मिरखेल - मुदखेड हा दुहेरी मार्ग या वर्ष अखेरीपर्यंत सुरु होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय बैठकीत ही माहिती देण्यात आली. त्याचबरोबर नांदेड पनवेल एक्सप्रेसला चार जादा डबे जोडण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. परभणी-मनमाड तसंच मुदखेड-बोलाराम या दुहेरी मार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालं असून, या संदर्भात अर्थसंकल्पात निधी मंजूर झाल्यानंतर २०२० पर्यंत हा दुहेरी मार्ग पूर्ण होईल असं दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विनोदकुमार यादव यांनी यावेळी सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातल्या माहूर देवस्थानचा विकास करण्यासाठी या वर्षासाठी ७८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत होणारी कामं जलदगतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरीत आराखडे सादर करावे असे निर्देश नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. या कामात दिरंगाई केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 13 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...