Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 14 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
जगातल्या हजारो संगणक प्रणालींवर
झालेल्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं देशभरातल्या संगणक संबंधित
संस्थांना सतर्कतेचा इशार दिला आहे. सरकारच्या सायबर सुरक्षा संघटना - सीईआरटीनं भारतीय
रिझर्व्ह बँक, शेयर बाजार आणि राष्ट्रीय आर्थिक महामंडळासह प्रमुख संस्थांना सायबर
सुरक्षेसंबंधी उपाय सुचवले आहेत. या हल्ल्याचा जगभरातल्या हजारो संगणक प्रणालींवर विपरीत
परिणाम झाला आहे.
****
दिव्यांग बालकांसाठी विशेष वसतीगृह
बांधण्याची मागणी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केंद्रीय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्याकडे केली आहे. बाल संगोपन
संस्था दिव्यांग मुलांची योग्य काळजी घेण्यास सक्षम नसल्याचं त्यांनी गहलोत यांना लिहीलेल्या
पत्रात म्हटलं आहे. स्थानिक बाल कल्याण समित्यांच्या देखरेखीखाली, प्रत्येक राज्यात
असं वसतीगृह उभारण्यात यावं, असं त्या म्हणाल्या. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान,
पश्चिम बंगाल यासारख्या मोठ्या राज्यात एका पेक्षा जास्त वसतीगृहांची आवश्यकता असल्याचंही
त्यांनी नमूद केलं आहे.
****
भारत नेपाळ सीमेवर हिजबुल मुजाहीद्दीन
या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. नजीर अहमद असं त्याचं नाव
असून, त्याच्याकडे पाकिस्तानचं पारपत्र सापडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधल्या हंदवाडा
जिल्ह्यात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.
त्यांच्याकडून हत्यारं जप्त करण्यात आली असून, शोधमोहीम सुरु आहे.
****
मुंबईतल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटाचा
आरोपी दाऊद इब्राहीम आणि २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांच्या
भारतात प्रत्यार्पणासंदर्भात कोणतीही सूचना मिळाली नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं
म्हटलं आहे. दाऊद इब्राहीम आणि हाफीज सईदला भारतात आणण्यासाठी सरकारनं काय प्रयत्न
केले, यासंदर्भातील एक प्रश्न माहितीच्या अधिकारात विचारण्यात आला आहे. त्यावर मंत्रालयानं
आपली बाजू स्पष्ट केली. भारताशी संबंधित चौकशी संस्थांशीही अद्याप याबाबत काही चर्चा
झाली नसल्याचं मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
****
माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी
न्यायालयानं दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या सुनावणी
होणार आहे. यावेळी पाकिस्ताननं विएन्ना कराराचं उल्लंघन केल्याबाबतच्या मुद्द्याला
प्राधान्य दिलं जाईल. या कराराची संयुक्त राष्ट्र संघात अद्याप नोंदणी करण्यात आलेली
नाही, ही चिंताजनक बाब असून, आंतरराष्ट्रीय न्यायालयात याबाबतचा खटला पुढे नेण्याच्या
निर्णयावर भारत ठाम असल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
छत्तीसगढमधल्या बीजापूर जिल्ह्यात
नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव दलाचे दोन जवान जखमी झाले. आज सकाळच्या
सुमारास गस्तीवर असलेल्या जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. याठिकाणी बराच वेळ चकमक
सुरु राहील्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
जलयुक्त शिवार अभियान ही राज्य शासनाची
सर्वाधिक महत्त्वाकांक्षी आणि शेतकऱ्याला समाधान देणारी योजना ठरली असून २०१६-१७ ची
कामं ३० जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिले
आहेत. नाशिक इथं आयोजित जलयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत ते आज बोलत होते. या योजनेला
जनतेचा मोठा प्रतिसाद लाभत असून, गाळ वाहून नेण्यासाठीही लोकांचा उत्स्फूर्त सहभाग
मिळत आहे. चालू वर्षातील कामांचे प्रकल्प अहवाल त्वरीत तयार करून त्यास मंजूरी देण्यात
यावी, असं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं. कामं वेळेवर न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर
कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले.
****
रायगड जिल्ह्यातल्या सावित्री नदीवरील
पुलाचं काम पूर्ण होत आलं आहे. येत्या पाच जूनपासून नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होणार
आहे. मुंबई गोवा महामार्गावरील हा पूल गेल्या दोन ऑगस्टला पावसामुळे कोसळला होता. या
दुर्घटनेत ४५ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सहा महिन्यात
या पुलाचं काम पूर्ण करण्याची घोषणा केली होती. नोव्हेंबर अखेरपासून पुलाचं काम सुरु
झालं, आणि तेव्हापासून रोज तीन पाळ्यांमध्ये या पुलाचं काम सुरु होतं. येत्या काही
दिवसांत आवश्यक ती सर्व कामं पूर्ण करुन हा पूल पाच जूनपासून खुला होईल अशी माहिती
आमच्या रायगडच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
काही काळासाठी बंद करण्यात आलेली
औरंगाबाद ते धुळे वीनावाहक बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. टापरगाव पुलाच्या दुरुस्तीसाठी
ही बससेवा बंद करण्यात आली होती. दर अर्ध्या तासाला ही बस धावणार आहे. या सेवेमुळे
कन्नड, चाळीसगावला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
****
No comments:
Post a Comment