Monday, 15 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.05.2017 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 May 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ मे २०१ दुपारी .००वा.

****

देशातल्या विविध उच्च न्यायालयांनी मुस्लिम धर्माच्या तिहेरी तलाक विरुद्ध निर्णय दिला असल्याचं महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. तिहेरी तलाक मुद्यावर आज सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान ते बोलत होते. जगातल्या अनेक राष्ट्रांचे स्वत:चे वैवाहिक कायदे असल्याकडे त्यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं.

दरम्यान, या मुद्यासोबतच बहुपत्नीत्व आणि निकाह, हलाला यासारख्या मुद्यांवरही सुनावणी व्हावी, अशी मागणीही रोहतगी यांनी यावेळी केली. मात्र कमी वेळेमुळे या तिनही मुद्यांवर सुनावणी घेणं, शक्य नसल्याचं सरन्यायाधिश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठानं सांगितलं. आधी तिहेरी तलाक या मुद्यावर सुनावणी घेऊ, नंतर बाकीच्या मुद्यांवर सुनावणी घेण्यात येईल, असं न्यायालयानं सांगितलं. तिहेरी तलाक संदर्भात देण्यात येणाऱ्या निर्णयाचा परिणाम इतर दोन मुद्यांवर होऊ शकतो, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

माध्यमांनी बातम्यांची सत्यता कायम राखणं महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं एक्सेल कंपनीला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. माध्यमांचा जनतेवर दूरगामी परिणाम होतो, त्यामुळे माध्यमांनी सकारात्मक बातम्यांना प्राधान्य दिलं पाहीजे, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले. कमी असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा योग्य वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं.

****

जागतिक बँकेनं विजेच्या उपलब्धतेबाबत २०१७ या वर्षासाठी केलेल्या क्रमवारीत भारतानं २६व्या स्थानावर झेप घेतली आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी लंडन इथं ही माहिती दिली. व्हिएन्ना एनर्जी फोरम या बैठकीनंतर ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. २०१४ मध्ये भारत ९९ व्या स्थानी होता, आता २६ व्या स्थानी झेप घेणं, ही उत्साहवर्धक बाब असल्याचं ते म्हणाले.

****

केंद्र सरकारच्या डिजिटायझेशनच्या माहिमेमुळे आर्थिक क्षेत्रातल्या बेकायदेशीर गोष्टींना आळा बसेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केला आहे. मुंबई इथं डिजिटल भारत मोहीमेत सहकारी बँकांची भूमिका या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वर्षीचा अर्थसंकल्प सादर होताना त्यात अनेक सकारात्मक बदल करण्यात आले, तसंच एक जुलै पासून वस्तू आणि सेवा कर कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे, त्यामुळे २०१७ हे वर्ष भारतासाठी आर्थिक स्थित्यंतराचं वर्ष ठरेल, असं ते म्हणाले. 

****

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ जागांपैकी आठ जागांचे निकाल हाती आले असून, पंकजा मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनल आणि विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या पंडितअण्णा मुंडे शेतकरी विकास पॅनलनं प्रत्येकी चार जागा जिंकल्या. धनंजय मुंडे गटाचे दहा उमेदवार आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची उद्या निवड होणार आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. ६५ पैकी सर्वाधिक ३१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं १८, भारतीय जनता पक्षानं आठ, शिवसेनेनं सहा तर दोन जागा अपक्ष उमेदवारानं जिंकल्या.

तर लातूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड येत्या १९ मे ला होणार आहे. लातूर महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.  

****

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं ग्रामपंचायत क्षेत्रातल्या दिव्यांग रहिवाशांची नोंदणी करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी आपला दाखल घेऊन नोंदणी करावी, तर ग्रामपंचायतींनी विहीत नमुन्यातील विवरणपत्रात नोंदणी करणं आवश्यक आहे. ग्रामीण भागातल्या दिव्यांग व्यक्तींनी नोंदणीसाठी संबंधित ग्रामपंचायतीतले ग्रामसेवक, पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी, जिल्हा स्तरावर समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताच्या सुमितनं पुरुषांच्या १२५ किलोग्रॅम गटात फ्रीस्टाईल प्रकारात रौप्य पदक पटकावलं. सुवर्ण पदक विजेत्या इराणच्या यादोल्लाह मोहम्मद काजेम मेहेबीनं सुमितचा सहा - दोन असा पराभव केला. काल नवी दिल्ली इथं समाप्त झालेल्या या स्पर्धेत भारतानं १० सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्य अशी १९ पदकं पटकावली.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...