Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 05 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ५ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
दिल्लीतील २०१२ सालच्या निर्भया
बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण
निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. दोषींनी
केलेलं क्रूर कृत्य, त्याचे सबळ पुरावे आणि तमाम देशवासीयांच्या तीव्र भावना याआधारे
न्यायमूर्तींनी, हा निर्णय दिला. १६ डिसेंबर २०१२ रोजी एका अल्पवयीन आरोपीसह सहा जणांनी
चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. त्यांच्यापैकी
एकानं तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती तर अल्पवयीन आरोपीला न्यायलयानं बालसुधारगृहात
पाठवण्याचे आदेश दिले होते. उर्वरित चौघांची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयानं मार्च
२०१४ मध्ये कायम ठेवली होती. या निर्णयाला दोषींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर
सर्वोच्च न्यायालयानंही फाशीचा निर्णय कायम ठेवला.
****
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी
आज नॉन-परफॉर्मिंग अॅसेट-एनपीए समस्येच्या निपटाऱ्यासाठी बँक नियमन कायद्यामध्ये सुधारणा
करण्यासाठीचा अध्यादेश जारी केला. या कायद्यातील सुधारणेमुळे रिझर्व्ह बॅंकेला बुडीत
कर्जाच्या समस्येचं प्रभावीपणे निराकरण करण्यास मदत होईल. गेल्या काही वर्षांत बुडीत
कर्जांची संख्या वाढली आहे. शासनाकडून अध्यादेशाचा तपशील जाहीर करण्याची सरकारकडून
अपेक्षा असून मंत्रिमंडळानं या संदर्भात अध्यादेश जारी करण्याची मान्यता दिली आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेला अशाप्रकारच्या
सुधारणांमुळे बुडीत कर्जांचा शोध घेवून त्यावर तात्काळ कारवाई करण्याचा अधिकार प्राप्त
होईल असं अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.
****
नागरी उड्डयन मंत्रालयानं आज
प्रादेशिक विमानसेवांमधून प्रवास करताना असभ्य वर्तन करणाऱ्या प्रवाशांसंदर्भात प्रवासबंदीसाठी
नो फ्लाय लिस्ट बाबत मसुदा जारी केला आहे. यानूसार अशा प्रवाशांना तीन प्रकारच्या शिक्षेची
तरतूद करण्यात आली आहे. यात आक्षेपार्ह हावभाव करणे, धक्काबुक्की करणे अथवा लैंगिक
छळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्यानूसार अशा प्रवाशांवर
तीन महिने किंवा दोन वर्षांपर्यंत प्रवासबंदी करण्यात येणार आहे. प्रवासबंदीच्या कालावधीत
अशा यादीत समाविष्ट व्यक्तीला विमान प्रवास करता येणार नाही. नुकतीच शिवसेना खासदार
रवींद्र गायकवाड आणि एअर इंडिया विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांदरम्यान झालेला वाद आणि
त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सदरील
मसुद्यावर येत्या ३० जूनपर्यंत जनतेच्या सूचना आणि प्रतिक्रियांनंतर अंतिम निर्णय घेतला
जाणार असल्याचं नागरी उड्डयन मंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितलं.
****
शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यास
राज्य सरकार अपयशी ठरत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तूर डाळप्रकरणी लक्ष घालून योग्य
ते पाऊल उचलावे अशी, विनंती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. तसंच
परदेश दौऱ्यावर गेलेल्या मंत्र्यांना महाराष्ट्रात परत बोलवा अशी मागणी चव्हाण यांनी
केली. राज्यात तूरडाळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्यानं सध्या भयानक परिस्थिती आहे.
शेतकऱ्यांच्या तुरीला दर नसल्यानं शेतकरी अडचणीत आला आहे. राज्यात विविध ठिकाणी शेतकरी
रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांना सामोरे जाणं, समस्या
दूर करण्याचं सोडून राज्याचे कृषी मंत्री, अन्नधान्य वितरण मंत्री विधिमंडळाचं शिष्टमंडळ
घेऊन परदेश दौऱ्यावर गेल्याबाबत त्यांनी रोष व्यक्त केला.
****
शासनाच्या विविध विभागांच्या
योजनांचा समन्वय तसंच शक्य असेल तिथे सामाजिक दायीत्व निधी मिळवून सूक्ष्म, लघू, मध्यम
उद्योगांची समूह विकास योजना वेगानं आणि यशस्वीरित्या पूर्ण करावी अशा सूचना वित्तमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या सर्वांगिण विकासासाठी औद्योगिक समूह विकासाची
संकल्पना केंद्र आणि राज्य शासनानं स्वीकारली असल्याचं सांगून समूह विकास योजनेला निधी
कमी पडू दिला जाणार नाही असं ते म्हणाले.
****
गडचिरोली इथं भूसुरुंग स्फोटात
जखमी झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जखमी जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी आज क्युअर इट रुग्णालयात जावून भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी जखमी जवानांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. गेल्या बुधवारी पोलिस आणि सी-६०चे कमांडो
गस्त घालत असताना हेमलकसापासून ५ किलोमीटर अंतरावर नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेल्या
भूसुरुंग स्फोटात एका पोलीस उपनिरीक्षकासह २० जवान जखमी झाले. त्यापैकी १८ जवानांवर
नागपूर इथं उपचार सुरु आहेत.
****
No comments:
Post a Comment