Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 06 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ६ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज सर्व भारतीय दूतावास प्रमुखांच्या परिषदेला संबोधित केलं. या परिषदेमध्ये परकीय
धोरणांमधील अतिमहत्वाचे मुद्दे तसंच ‘भारतीय राजदूतांचा महत्वाच्या जागतिक महासत्तांसोबतचा
सहभाग’ या विषयांवर भर देण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास
स्वरुप यांनी केलेल्या ट्वीटमध्ये या परिषदेमध्ये सुमारे १२० राजदूतांनी सहभाग घेतला
असल्याचं म्हटलं आहे. भारताचे पाकिस्तान आणि चीनसोबतच्या ताणलेल्या संबंधाच्या पार्श्वभूमीवर
भारताची महत्वाच्या जागतिक सत्तांसोबतचे संबंध बळकट करण्यावर यावेळी विशेष जोर देण्यात
आला.
****
अर्थमंत्री अरूण जेटली हे आजपासून
तीन दिवसीय जपान दौऱ्यावर रवाना झाले आहेत. यावेळी ते आशियायी बॅकांच्या गव्हर्नर संचालक
मंडळाच्या वार्षिक परिषदेमध्ये सहभागी होणार आहे. जपानचे उपपंतप्रधान तारो असो यांच्याशी
ते चर्चाही करणार आहेत. जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे
ते जपानचे संरक्षण मंत्री तामोमी इनाडा यांचीही भेट घेणार आहे.
****
दिल्लीतल्या एका शाळेच्या जवळ
असलेल्या कंटेनर डेपोमधून वायू गळती झाल्यामुळे शाळेतल्या २०० मुलांना डोळ्यांची जळजळ
होऊ लागल्यानं त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलं. मात्र, ही सर्व मुलं सुखरुप असून
उपचारानंतर या मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याचं दक्षिण दिल्लीचे पोलिस
उपायुक्त रोमील बनिया यांनी म्हटलं आहे.
****
तंबाखूच्या सेवनानं दरवर्षी होणाऱ्या
१२ लाख मृत्यूंपैकी एकट्या बिडीच्या सेवनानं सहा लाख मृत्यू होतात. बिडीची विक्री ही
सिगारेटच्या विक्रीपेक्षा आठ पटींनी जास्त होते, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाब सरकारनं सर्व आर्थिक योजनांचा
लाभ घेण्यासाठी रेशन कार्डऐवजी आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी
असलेल्या निवृत्ती वेतनाबाबतच्या नियमांमध्येही बदल केले आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारनं
सामाजिक सुरक्षा, महिला आणि बालविकास विभागाला आर्थिक योजनांच्या लाभधारकांचे सर्वेक्षण
करण्याचे निर्देशही दिले आहेत.
****
भारतातल्या पिण्याच्या पाण्याचा
दर्जा गेल्या पाच वर्षात सुधारला असून आणखी प्रयत्नांची गरज असल्याचं जागतिक पाणी परिषदेच्या
प्रमुखांनी म्हटलं आहे. पाण्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जागतिक पाणी परिषदेनं
जगातल्या मोठया प्रदेशात सर्वेक्षण केलं होतं त्यात भारताचा समावेश होता.
****
२०१७ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये
गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या जागतिक मागणीमध्ये १८ टक्क्यांनी घट होऊन ही मागणी
एक हजार ३४ टनांपर्यंत खाली आली असल्याचं ‘जागतिक सोने परिषदे’नं म्हटलं आहे. गेल्या
वर्षी पहिल्या तिमाहीत सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्यानं ही घट
जाणवत असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. चीनकडून सोन्याची मागणी थंडावली असल्यामुळं देखील
हा परिणाम झाला असल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे.
****
पुढील हंगामात येणारे शेतमाल
आणि त्याची, शासनाकडून करण्यात येणारी खरेदी हंगामापूर्वीच ठरवण्यात येणार असून यासाठी
शासन धोरण ठरविणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे
शासनाकडून खरेदी करावयाच्या शेतमालाची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळाल्यामुळे शेतकरी
तसं नियोजन करू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते आज बुलडाणा जिल्ह्यातल्या
जळगाव जामोद इथं जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते. तसंच खारपाण पट्ट्यातील शेतीला डार्क
झोनमधून काढून शेतीची सुपिकता वाढविण्यावर शासन भर देत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातल्या
गाडेगाव इथं शेततळ्याची पाहणी करतांना सांगितलं. कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून
खारपाण पट्ट्यातील मातीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी पाच हजार कोटी रूपयांचा प्रकल्प
शासनानं हाती घेतला असून राज्य शासन सामुहिक शेतीचा प्रकल्प अंमलात आणत असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्याच्या टंचाईग्रस्त
तालुक्यांमध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबवली जाणार असून जिल्ह्यातले
पाझर तलाव, गाव तलाव आणि सिमेंट बंधाऱ्यांमधून काढलेला गाळ शेतीसाठी मोफत उपलब्ध करून
दिला जाणार आहे.
****
दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजिविका
अभियानात वाशिम नगरपालिकेनं राज्यात प्रथम स्थान पटकावलं. राज्य शासनाच्या विविध योजना
यशस्वीपणे राबवल्याबद्दल वाशिमचे नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी यांचा नुकताच मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी गौरव केला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलंआहे.
****
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेनं ७३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीसाठी नोटिसा बाजावल्या आहेत. बँकेने दिलेले
सुमारे ५०० कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यानं या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत तसंच विनातारण
कर्ज घेऊन ते वेळेत भरणा न करणाऱ्या कर्जदारांना थेट जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्याची
माहिती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी दिली. जे शेतकरी परतफेड करणार नाहीत त्यांच्या
सात बाराच्या उताऱ्यावर बोजा चढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment