Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 June 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१
जून २०१८ सकाळी ६.५० मि.
****
§ अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गातल्या,
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा केंद्र सरकारचा
निर्णय
§ राज्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या
पोटनिवडणुकीत भाजपचा एका जागेवर विजय, तर एका जागेवर पराभव
§
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं काल मुंबईत
हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन
§
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.अशोक ढवण यांची नियुक्ती
आणि
§
मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी
****
अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या
वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रत्येकी १५ किलो धान्य देण्याचा
निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास
पासवान यांनी ही माहिती दिली. काल नवी दिल्ली इथं राज्यांच्या अन्न सचिवांसोबत झालेल्या
बैठकीनंतर ते बोलत होते. ज्या वसतिगृहात अनुसूचित जाती जमातीचे दोन तृतीयांश विद्यार्थी
आहेत, त्या सगळ्यांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार असल्याचं, पासवान यांनी सांगितलं.
****
सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांचा वापर
वाढवण्यासाठी राज्य सरकारनं काही खाजगी कंपन्यांसोबत काल पाच सामंजस्य करार केले. यामध्ये
खाजगी वाहतुक सेवांमध्ये ई व्हेईकलचा वापर करणं, चार्जिंग केंद्र उभारणं, आदी करारांचा
समावेश आहे.
****
राज्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत
भारतीय जनता पक्षाचा एका जागेवर विजय, तर एका जागेवर पराभव झाला.
पालघर इथं भाजपचे राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे श्रीनिवास
वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला. भंडारा-गोंदिया मतदार संघात मात्र, राष्ट्रवादी
काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी भाजपचे हेमंत पटले यांचा ४८ हजारावर मताधिक्यानं पराभव
केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया देतांना, इंधन
दरवाढ, तसंच नोटाबंदीनं त्रस्त झालेल्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूनं कौल
दिला, तर राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमध्ये असताना केलेल्या कामांमुळे त्यांना यश
मिळालं असं मत व्यक्त केलं.
शिवसेनेचे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र, निवडणूक यंत्रणा भ्रष्ट असल्याचं मत व्यक्त केलं
आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. या पोटनिवडणुकांच्या निकालावरून भाजपचा
जनाधार घटल्याचं, स्पष्ट होतं, असं ते म्हणाले.
दरम्यान, पालघर मध्ये मिळालेल्या विजयाचं श्रेय मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी पालघरच्या जनतेला दिलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत
होते. मतदान यंत्रात बिघाड होणं, ही गंभीर बाब असून, निवडणूक आयोगानं याची गांभीर्यानं
दखल घ्यावी, असं ही ते म्हणाले.
****
राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं काल पहाटे
मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते
सदूसष्ठ वर्षांचे होते. तीन वेळा अकोल्याचे खासदार, तर
दोन वेळा आमदार असलेले फुंडकर यांनी, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, तसंच
भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. फुंडकर यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त
होत आहे.
पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्यात फुंडकर यांचा मोलाचा वाटा होता, असं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपल्या शोक संदेशात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले, ते प्रश्न सोडवण्याची प्रामाणिक इच्छा असलेले, उत्तम
संसदपटू आपण गमावल्याचं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुंडकर यांना श्रद्धांजली
अर्पण करताना, पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिलेल्या, एका ज्येष्ठ मार्गदर्शक
आणि सहकाऱ्याला आपण मुकलो, असं म्हटलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, यांच्यासह राजकीय, तसंच सामाजिक क्षेत्रातल्या अनेक
मान्यवरांनी, फुंडकर
यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, फुंडकर यांचा पार्थिव देह काल बुलडाणा जिल्ह्यात
खामगाव इथं आणण्यात आला, त्यापूर्वी काल सकाळी मुंबईत अनेक मान्यवरांनी फुंडकर यांचं
अंत्यदर्शन घेऊन, श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी खामगाव
इथं अंत्यसंस्कार होणार आहे.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल
त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मराठवाड्यातही
सर्वच शासकीय कार्यालयांमधून अहिल्यादेवी यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं रेणापूर
नाका परिसरातल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद तसंच जालना इथं मिरवणूक
काढून अहिल्याबाईंना अभिवादन करण्यात आलं. धनगर आरक्षण मागणीचा यावेळी पुनरुच्चार करण्यात
आला.
अहमदनगर जिल्ह्यात चौंडी या अहिल्याबाईंच्या जन्मगावी,
अहिल्यादेवी यांच्या जयंती सोहळ्यात, धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन बहुजन एकता परिषदेच्या
कार्यकर्त्यांनी गदारोळ करत दगडफेक केली. या प्रकरणी बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ.
इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, या जयंती सोहळ्याला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा
महाजन उपस्थित होत्या, अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांनी आदरांजली
अर्पण केली. आरक्षणाची मागणी करताना, अहिल्याबाईंच्या विचारांचंही रक्षण करावं, असं
आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
परभणी इथल्या वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.अशोक ढवण यांची, नियुक्ती करण्यात
आली आहे. कुलपती सी. विद्यासागर राव यांनी काल ही नियुक्ती केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या
निवृत्त मुख्य न्यायाधीश मंजुला चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं डॉ ढवण
यांची निवड केली. जालना जिल्ह्यात बदनापूर इथल्या कृषी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून
कार्यरत असलेले डॉ. ढवण यांची ही नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा वयाची ६५ वर्ष, यापैकी
जी मुदत आधी पूर्ण होईल, तोपर्यंत असेल.
विद्यापीठाचे विद्यमान
कुलगुरू बी. वेंकटेश्वरुलू यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे.
****
मराठवाड्यात
काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. बीड शहर परिसरात पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या
वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली तर काही घरांसह मोंढ्यातल्या आडत दुकानांवरचे
पत्रे उडून गेले. अर्धा तास झालेल्या या पावसामुळे
वातावरणातला दमटपणा वाढल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली जिल्ह्यातही काल कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ,
सेनगाव, आखाडा बाळापूर परिसरात जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातही काही ठिकाणी सोसाट्याच्या
वाऱ्यासह पाऊस झाला. नांदेड शहरात रात्री सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे वातावरणात
गारवा निर्माण झाला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या १४ रुग्णालयांना नियमाचं उल्लंघन
केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं नोटीस बजावली आहे. जिल्ह्यातली ३५०
रुग्णालयं आणि सोनोग्राफी केंद्रांची पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
बीड इथं शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं बिंदुसरा नदी पात्रात
काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. पात्रातली घाण, तसंच कचरा काढून पात्र स्वच्छ करण्यात
आलं. या अभियानात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध संघटना
सहभागी झाल्या होत्या.
****
नागपूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या
कामामुळे नागपूर-मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस तीन जुलै पर्यंत अजनी इथून
सुटणार असून, अजनी पर्यंतच धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड
जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन काल सर्वत्र पाळण्यात आला. त्यानिमित्त
औरंगाबाद जिल्हा परिषदेत भित्तीपत्रक प्रदर्शनाद्वारे तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी
जनजागृती करण्यात आली. तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून दुसऱ्यांनाही या सवयींपासून
दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
पवनीत कौर यांनी केलं आहे.
//***********//
No comments:
Post a Comment