आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१९ जून २०१८
सकाळी ११.०० वाजता
****
रायगड जिल्ह्यात महड या अष्टविनायका
पैकी एक महत्त्वाचं स्थान असलेल्या गावात काल तीन बालकांचा अन्नातून विषबाधा होऊन मृत्यू
झाला, तर सुमारे २५ जण अत्यवस्थ आहेत. काल एका धार्मिक कार्यानिमित्त आयोजित जेवणानंतर
हा प्रकार घडल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे शहरानजिक बाभळे फाटा इथं
आज झालेल्या भीषण अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, राजू मोहिते असं त्यांचं
नाव असून, ते शिंदखेडा पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
****
दिल्लीचे नायब राज्यपाल आणि आप सरकार मधल्या वादाच्या
दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे
यांच्याशी संपर्क साधला. लोकांनी
निवडून दिलेल्या सरकारला कसलाही अडथळा न आणता काम करु दिलं पाहिजे, अशी ठाकरे यांची
भूमिका असल्याचं त्यांचे माध्यम सल्लागार हर्षल प्रधान यांनी काल सांगितलं. मात्र
याचा अर्थ शिवसेनेचा आप किंवा केजरीवाल यांना पाठिंबा आहे, असा होत नाही, असंही त्यांनी
स्पष्ट केलं.
****
डिझेलच्या वाढत्या
किंमतीच्या विरोधात माल वाहतूकदारांनी काल पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.
या संपाला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवाढ झाल्यानं
इंधन दरवाढ करण्यात आल्याचं कारण सरकार देत आहे. मात्र प्रत्यक्षात सरकारी करांमुळे
ही दरवाढ झाल्याची टीका ऑल इंडिया कन्फेडरेशन ऑफ गुड्स व्हेईकल्स ओनर्स असोसिएशनचे
अध्यक्ष चन्ना रेड्डी यांनी केली आहे.
****
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या वांभोरी आणि राहुरी
रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीच्या कामामुळे काही रेल्वे गाड्या रद्द
तर काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे ते निझामाबाद प्रवासी गाडी १६
जुलै पर्यंत, निझामाबाद ते पुणे, आणि पंढरपूर ते निझामाबाद प्रवासी रेल्वे आजपासून
येत्या १८ जुलै पर्यंत तर परतीच्या प्रवासाची रेल्वे १७ जुलै पर्यंत रद्द करण्यात आली
आहे. नांदेड ते दौंड रेल्वे १५ जुलै आणि दौंड ते नांदेड रेल्वे १६ जुलै पर्यंत अशंत:
रद्द करण्यात आली असल्याचं रेल्वे सूत्रांनी कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment