Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 June 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जून २०१८ दुपारी
१.०० वा.
****
इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले मात्र, शिवसेनेला मात्र राज्यात
आजपर्यंत एकहाती सत्ता मिळाली नाही, याची कारणं शोधण्याची गरज, लोकसभेचे माजी अध्यक्ष
मनोहर जोशी यांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनी मुंबईत गोरेगाव
इथं आयोजित मेळाव्यात ते आज बोलत होते. आपली कमतरता शोधून ती दूर करायला हवी, दृढनिश्चयानं
प्रयत्न केल्यास ही बाब अशक्य नसल्याचं, जोशी यांनी नमूद केलं. युवासेनेचे अध्यक्ष
आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पुनरुच्चार
केला.
****
महड विषबाधा प्रकरणातल्या
१५ जणांना उपचारासाठी मुंबईत सायन इथल्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. काल झालेल्या
या प्रकारानंतर तीन बालकांचा मृत्यू झाला तर शंभराहून अधिक जणांची प्रकृती बिघडल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथले संत गजानन महाराज
यांची पालखी आषाढी वारीसाठी आज शेगावहून मार्गस्थ झाली. आज सकाळी नगर परिक्रमेनंतर
महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलं. विदर्भातल्या अनेक दिंड्या आणि वारकऱ्यांसह
निघालेली ही पालखी खामगाव, मेहकर, सिंदखेडराजा, जालना, बीड, आदी जिल्ह्यातून मार्गक्रमण
करत, पंढरपूरला पोहोचेल.
दरम्यान, पैठण इथल्या संत एकनाथ महाराज यांची पालखी
येत्या पाच जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याची माहिती नाथवंशज योगीराज महाराज
गोसावी यांनी दिली.
*****
राष्ट्रीयकृत बँकांची
सहा हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं उद्योजक विजय
मल्ल्या याच्या विरोधात नवीन आरोप पत्र दाखल केलं आहे. धनादेश अनादर अधिनियमा अंतर्गत
दाखल या आरोप पत्रात भारतीय स्टेट बँकेनं मल्ल्यावर २००५ ते २०१० या काळात घेतलेल्या
कर्जाची परतफेड न केल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षीही संचालनालयानं ९०० कोटी रुपये
कर्ज थकवल्या प्रकरणी पहिलं आरोप पत्र दाखल केलं होतं. या प्रकरणात मल्ल्याची आतापर्यंत
नऊ हजार ८९० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
****
आयसीआयसीआय
बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या विरोधातली व्हिडीओकॉन समूह
कर्ज प्रकरणाची चौकशी पूर्ण होई पर्यंत त्या रजेवर असतील अशी घोषणा आयसीआयसीआय
बँकेनं केली आहे. आजपासून बँकेचे सर्व व्यवहार हाताळण्यासाठी बँकेनं संदीप बक्षी
यांची मुख्य परिचालन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
****
सार्वजनिक
क्षेत्रातल्या बँकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्री पियुष गोयल
आज नवी दिल्लीत, अशा १३ बँकांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. २०१७-१८ या वर्षासाठी
या बँकांचे वार्षिक वित्तीय अहवाल जाहीर झाल्या नंतरची ही पहिलीच बैठक आहे. २०१७-१८ या आर्थिक
वर्षाच्या चौथ्या तिमाहीत यापैकी बहुतेक बँकाना तोटा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. रिजर्व्ह बँकेच्या सूचने नुसार, आर्थिक सुधारणांसाठी
तातडीनं कारवाई आवश्यक असलेल्या
बँकांच्या समस्यां
बाबतही आजच्या बैठकीत चर्चा होणं
अपेक्षित आहे.
****
राष्ट्रीय स्वास्थ
मिशन कार्यक्रमांत राज्यांनी आपली भागीदारी वाढवावी, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब
कल्याण राज्यमंत्री अश्चिनी कुमार चौबे यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं या कार्यक्रमाचा
अकरावा अहवाल सादर करताना ते बोलत होते. राज्यांमध्ये आरोग्याशी संबंधित ७० टक्के कार्य
राष्ट्रीय स्वास्थ मिशन अंतर्गत होत असून, यामुळे जिल्हा स्तरावर सार्वजनिक आरोग्य
सेवेला मजबूत बनवण्यास मदत होते, असं ते म्हणाले.
****
योग हा केवळ व्यायामाचा एक प्रकार
नाही तर आरोग्याची खात्री देणारं
पारपत्र आहे, त्यामुळे
जगभरातल्या लोकांनी योगविद्येला आपल्या दिनक्रमात स्थान द्यावं, असं
आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. येत्या २१ तारखेला
जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे, त्याच्या
पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ट्वीटरवर एक चित्रफीत जारी केली. योग ही आरोग्याची
गुरूकिल्ली आहे, त्यामुळे आपण अधिक सक्षम होतो तसंच आपली एकाग्रताही वाढते,
योगसाधना करणारी व्यक्ती आचार, विचार, ज्ञान आणि समर्पण अशा सर्वच बाबतीत परिपूर्ण होते, असं
पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
भारतीय सेना हे वर्ष कर्तव्य बजावत
असताना दिव्यांग झालेल्या सैनिकांचं सन्मान वर्ष म्हणून साजरं करत आहे. संरक्षण मंत्रालयानं
जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली. दिव्यांग सैनिकांच्या अडचणी दूर करण्यावर
प्रामुख्यानं भर देणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
देशात
विमा सुविधा
अधिकाधिक लोकांपर्यंत
पोहोचवण्याच्या दृष्टीनं स्थापन केलेल्या विमा
विपणन संस्थांसाठीच्या मानकांचा आढावा घेण्यासाठी विमा
नियामक आणि विकास प्राधिकरणानं दहा
सदस्यीय समिती स्थापन केली आहे. विम्याचं
कवच किती नागरिकांपर्यंत पोहोचलं, याचा आढावा ही समिती घेणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment