Tuesday, 21 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.08.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 August 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ ऑगस्ट २०१ दुपारी १.०० वा.

****



 राज्याच्या बहुतांश भागात सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातल्या अनेक नद्यांना पूर आल्याचं वृत्त आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातली वैनगंगा, नांदेड जिल्ह्यातली सीता आणि हिंगोली जिल्ह्यातल्या कयाधू नदीचा समावेश आहे. कयाधू नदीच्या पुरामुळे कळमनुरी तालुक्यातल्या कोंढुर, डिग्रस, इत्यादी गावांमधल्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे. बाळापूर हदगाव दरम्यानची वाहतूक पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे तर बाळापूर बोल्डा रस्त्यावरची वाहतूक झाडं पडल्यामुळे बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं इसापूर धरण पन्नास टक्के भरल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 नांदेड शहरालगतच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे आज पहाटे उघडण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या सीता नदीला पूर आला असून, मुदखेड शहरात सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. नांदेडमध्ये मात्र आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 परभणी शहरासह जिल्ह्यात आज मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. जिंतूर तालुक्यात आज सकाळी मोठा पाऊस झाला तर पालम तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे वाहतूक हळुहळु पूर्ववदावर येत आहे.

 भंडारा जिल्ह्यातल्या राजे दहेगाव इथे सततच्या पावसानं एक इमारत कोसळून एकाच कुटुंबातल्या तीन जणांचा मृत्यू झाला, धुळे शहरातही एक जुनी इमारत कोसळल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली ते भामरागड दरम्यान पर्लकोटी नदीला पूर आल्यामुळे सुमारे शंभर गावांचा तर, सिरोंचा तालुक्यातल्या रेंगुठा भागातला पूल वाहून गेल्यानं वीस गावांचा संपर्क तुटला आहे. जळगाव जिल्ह्यात बावीस दिवसांच्या खंडानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असून, रावेर तालुक्यातल्या सुकी नदीला पूर आला आहे.

 सोलापूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत, मात्र पावसात जोर नसल्याने या दोन दिवसात केवळ ७४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

****

 मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशमध्येही गोदावरी आणि कृष्णा नद्यांना पूर आला आहे. राज्य सरकारनं सगळ्या यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावांमधल्या शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

****

 केरळमध्ये आलेला पूर ही एक गंभीर नैसर्गिक आपत्ती असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केरळ उच्च न्यायालयात काल सादर केलेल्या एका  निवेदनात, भूस्खलन आणि पूरस्थितीला, तिसऱ्या पातळीची नैसर्गिक आपत्ती मानल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. संसद सदस्यांनी केरळच्या पूरपीडितांना उदारहस्ते मदत करावी, असं आवाहन राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. केरळमध्ये मदतीसाठी पाठवल्या जाणाऱ्या सामानासाठी सीमा शुल्क तसंच एकात्मिक वस्तू आणि सेवा कर न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. दरम्यान, सैन्यदल, नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं मदतकार्य सुरू असून, या राज्यात पुढचे काही दिवस हल्का पाऊस सुरू राहणार असल्याचं अंदाज हवामानखात्यानं वर्तवला आहे.

****

 मुलांमधलं अंमली पदार्थांच्या सेवनाचं वाढतं व्यसन रोखण्याच्या दृष्टीनं सर्वोच्च न्यायालयानं २०१६ मध्ये जारी केलेल्या सूचनांचं पालन व्हावं यासाठी केंद्र सरकारनं आवश्यक ती पावलं उचलावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या बचपन बचाओ आंदोलन या सामाजिक संस्थेनं याचिका दाखल केली होती. त्यावर, डिसेंबर २०१६ ला दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयानं, शाळकरी मुलांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता रोखण्याच्या दृष्टीनं अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

****

 माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचं गुजरातमधल्या साबरमती, तापी, नर्मदा, सरस्वती, माही या नद्यांसह सोमनाथ त्रिवेणी संगमात विसर्जन करणार असल्याची माहिती गुजरात भाजपाचे उपाध्यक्ष आय.के.जडेजा यांनी दिली आहे. अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज अहमदाबद इथे सर्वपक्षीय प्रार्थना सभा आयोजित केल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

 भारतानं दहा वर्षापूर्वी अवकाशात पाठवलेल्या चांद्रयान एक या अवकाशयानानं गोळा केलेल्या माहितीचा उपयोग करत, अमेरिकेच्या राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था - नासाच्या शास्त्रज्ञांनी चंद्रावर गोठलेल्या पाण्याचे साठे असल्याचं निश्चित केलं आहे, नासानं आज ही घोषणा केली. चांद्रयान एक मधून नासानं पाठवलेल्या शोधक उपकरणानं मिळवलेल्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर या शास्त्रज्ञांनी, चंद्राच्या अतिथंड ध्रुवप्रदेशांमध्ये पाण्याचे मोठे साठे असल्याचं आणि हा शोध भविष्यकालीन अवकाश योजनांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं घोषित केलं आहे.

*****

***

No comments: