Wednesday, 22 August 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.08.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ ऑगस्ट २०१ सकाळी .५० मि.

****   

v दाभोलकर हत्येप्रकरणी औरंगाबाद इथून आणखी तिघे ताब्यात; पिस्तुलासह काही शस्त्र हस्तगत

v माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे राज्यात सर्व विद्यापीठांमध्ये अटलजी विचार अध्यासन

vसेंद्रीय शेती-विषमुक्त शेती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना

vनांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये चार जणांचा पुरात वाहून मृत्यू

 आणि

v आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीला नेमबाजीत सुवर्णपदक

****



 अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआय आणि दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल औरंगाबाद इथून आणखी तिघांना ताब्यात घेतलं, यापैकी एकाच्या घरातून, पिस्तुलासह काही शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. याच पिस्तुलाने डॉ. दाभोलकर यांची हत्या केल्याचा संशय वर्तवला जात आहे.

****



 माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावे राज्यातल्या सर्व तेरा विद्यापीठांमध्ये अटलजी विचार अध्यासन सुरू करण्यासाठी राज्य सरकार वीस कोटी रूपयांची तरतूद करणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. अटलजींचं साहित्य आणि विचार याविषयी पी.एचडी. साठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन लाख रूपये पाठ्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, अटलजींचा अस्थिकलश आज मुंबईत आणण्यात येणार असून, राज्यातल्या विविध नद्यांमध्ये अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे. अटलजींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज मुंबईत प्रार्थनासभा होणार आहे.

****



 ‘सेंद्रीय शेती-विषमुक्त शेती’ या राज्य पुरस्कृत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं काल झालेल्या बैठकीत घेतला. उत्पादन खर्च कमी करून शेतीची उत्पादकता वाढवणं, हे या योजनेचं उद्दीष्ट आहे. 



 प्रमाणित आणि पायाभूत बियाण्यांचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीनं घोषित केलेला सरासरी दर यामधील फरकाची रक्कम देण्यासाठी नवी योजना लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला.



 खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही आता परदेशातल्या उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेचा लाभ दरवर्षी वीस विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

****



 प्लास्टिक बंदीची मोहीम तालुका पातळीवर अधिक गतीनं राबवण्यात येणार असून तीर्थक्षेत्रं आणि पर्यटनस्थळी विशेष पथकं नियुक्त केले जाणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं. ते काल मुंबईत एका आढावा बैठकीत बोलत होते. प्लास्टिक बंदीची लोकचळवळ तालुका आणि ग्रामपातळीपर्यंत तीव्र करण्याची गरज व्यक्त करून नगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक वस्तुंचा साठा करणाऱ्यांवर आणि विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 शासनाकडून हमी भावानं खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अदा करण्यासाठी लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असं कृषी आणि पणनमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. मुंबईत मुख्य सचिवांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. लॉट एन्ट्रीचे काम काही एजन्सींनी अद्याप पूर्ण केलं नसल्यानं शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे अदा करता आले नाहीत, अशा एजन्सींना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचं सांगून यापुढे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्यावतीनं खरेदीची यंत्रणा राबवण्यात यावी, असे निर्देशही कृषीमंत्र्यांनी दिले आहेत.

****



 राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे २०१७-१८ चा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार प्रसिध्द साहित्यिक रत्नाकर मतकरी यांना तर कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार माधव रामानुज यांना घोषित करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे गुजराती भाषा आणि साहित्याच्या ‍विकासासाठी कार्यरत साहित्यिकांना दरवर्षी हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं.

****



 राज्यातल्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी स्वच्छतेवर भर देण्यात यावा आणि या ठिकाणांसाठी  मंजूर झालेला निधी हा घनकचरा व्यवस्थापन, मलनिःस्सारण आणि पाणी पुरवठा यावर जास्तीत जास्त खर्च करावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, राज्यातल्या सहा ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या सुमारे ९९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला काल मान्यता दिली. या तीर्थक्षेत्रांमध्ये मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या कपिलधार आणि जालना जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिरांचा समावेश आहे.

****



 स्थावर मालमत्ता नियमन कायदा अर्थात रेराची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र् देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात या कायद्याच्या अंमलबजावणीचं प्रमाण नव्वद टक्के इतकं असून, गृहनिर्माण प्रकल्पांची आणि इस्टेट एजंटांची नोंदणी होण्यामध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत आठपट पुढे आहे. दिलेल्या मुदतीत ग्राहकांना घराचा ताबा न देणाऱ्या तसंच कामकाजात अन्य त्रुटी असणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यातही महाराष्ट्र आघाडीवर आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 त्याग आणि समर्पणाची शिकवण देणारा ईद उल जुहा - बकरी ईदचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी यानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समर्पणभाव, श्रद्धा आणि भक्तीचा संदेश देणारा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****



 राज्याच्या सर्व भागात मोसमी पाऊस सक्रीय झाला असून, राज्यात १ जून ते २१ ऑगस्ट या कालावधीत सरासरी ७७५ मिलिमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातल्या जलाशयांमध्ये  ५९ टक्के पाणीसाठा झाला असून खरीप हंगामात ९४ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार १५ जिल्ह्यांमध्ये १०० टक्के पेक्षा जास्त पाऊस पडला असून त्यामध्ये मराठवाड्यातल्या नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे.



 नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या मांजरम इथल्या नदीत काल वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये चार जण पुरात वाहून गेले आहेत. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत सात व्यक्ती मरण पावल्या आहेत. संततधार पावसामुळे हिमायतनगर इथं पैनगंगेला महापूर आला असून, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.



 गांजेगाव पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या भागातून विदर्भाशी होणारा संपर्क तुटला आहे. हिमायतनगर तालुक्यात अनेक गावांना पुराचा धोका असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 हिमायतनगर, माहूर, किनवट, हदगाव आणि मुदखेड या तालुक्यातल्या सुपीक शेतजमीनी खरडून गेल्या असून अनेक ठिकाणच्या चिकू, मोसंबी आणि आंब्याच्या फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, पुरामुळे नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे लवकर करण्याच्या सूचना देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं, विधान परिषदेचे सदस्य राम पाटील रातोळीकर यांनी सांगितलं. काल पूरग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.



 हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातल्या येगाव आणि कवडी या गावांना जोडणारा रस्ता कयाधू नदीला आलेल्या पुरामध्ये वाहून गेला आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधलेला हा रस्ता वाहून गेल्यामुळे या दोन गावांमधला संपर्क तुटला आहे. या परिसरांतल्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पिकं नष्ट झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.



 लातूर जिल्ह्यात या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे. लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या गावांना पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या मांजरा धरणात मात्र सध्या फक्त साडेचार टक्के पाणी साठा आहे. माकणी इथल्या निम्न तेरणा धरणात मात्र चाळीस टक्के पाणी साठा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर तालुक्यातलं तावरजा आणि रेणापूर तालुक्यातलं व्हटी ही दोन मध्यम धरणं कोरडी आहेत.



 परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातला ढालेगाव बंधारा पूर्ण भरल्यानं काल त्याचा एक दरवाजा उघडण्यात आला. यातून होणाऱ्या विसर्गामुळे मुदगल बंधाराही पूर्ण भरण्याची अपेक्षा असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



 औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणीपातळी ३४ टक्क्यांवर पोहोचली असून, सध्या धरणात १६ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत आहे.



 भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द धरणातून सुमारे अडीच लाख घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



 जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचेही बत्तीस दरवाजे काल दुपारी उघडण्यात आले असून, तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातलं येळगाव धरण क्षमतेच्या पंच्याऐंशी टक्के भरलं आहे.



 दरम्यान, येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.

****



 इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या अठराव्या आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये काल भारताच्या सौरभ चौधरीनं दहा मीटर एअर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं, तर या स्पर्धेचं कांस्य पदक भारताच्याच अभिषेक वर्मानं जिंकलं. पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल नेमबाजी स्पर्धेत भारताच्या संजीव राजपूतनं रजत पदक जिंकलं. पुरुषांच्या रोईंग स्पर्धेत भारताचा दत्तू भोकनळ अंतिम फेरीत पोचला आहे. महिला कुस्ती स्पर्धेत ६८ किलो वजन गटात भारताच्या दिव्या काकरान हीनं कांस्य पदक जिंकलं.

*****

***

No comments: