आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ नोव्हेंबर २०१८ सकाळी
११.०० वाजता
****
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आज सकाळी आठ
वाजता अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा आणि निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात
आलं. मुळा धरणाचे सगळे ११ दरवाजे उघडण्यात आले असून, हे पाणी तीन दिवसात जायकवाडी धरणात
पोहोचेल. याशिवाय प्रवरा धरणातून तीन पूर्णांक ८५, गंगापूर धरणातून अर्धा दशलक्ष घनफूट,
दारणा धरणातून दोन पूर्णांक चार दशांश, तर पालखेड समूहातून अर्धा दशलक्ष घनफूट पाणी
जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे.
****
जम्मू आणि काश्मीरमधल्या बडगाम
जिल्ह्यातल्या झुगु अरीझल इथं सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत
दोन दहशतवादी मारले गेले. आज पहाटे ही चकमक झाली. या परिसरात काही दहशतवादी लपून बसले
असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी मध्यरात्रीपासूनच शोधमोहीम हाती घेतली होती.
दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असलेल्या ठिकाणाला जवानांनी घेरल्यानंतर, लपून
बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
****
केरळ, हरयाणा, छत्तीसगढ, कर्नाटक आणि मध्यप्रदेश
आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीट संदेशामध्ये
या राज्यांतील नागरिकांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देताना या राज्यांच्या प्रगती
आणि लोक कल्याणाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
****
सरकारी कंत्राटाचं काम करत असताना
विधानसभेची निवडणूक लढवल्याच्या कारणावरून भंडारा जिल्ह्यातल्या साकोलीचे भारतीय जनता
पक्षाचे आमदार राजेश काशीवार यांची निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं
अवैध ठरवली आहे. पराभूत काँग्रेसचे उमेदवार सेवक वाघाये यांनी त्यांच्या विरूद्ध याचिका दाखल केली होती.
****
भारत
आणि वेस्ट इंडिज यांच्यातला एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला पाचवा, आणि
अंतिम सामना आज तिरुवअनंतपूरम इथं होणार आहे. दुपारी दीड वाजता हा सामना सुरु होईल.
या मालिकेत भारत दोन - एकनं आघाडीवर आहे. आजच्या एकदिवसीय सामन्यानंतर दोन्ही संघांमधे
तीन ट्वेंटी-ट्वेंटी सामने होणार आहेत.
****
मराठी रंगभूमी दिनानिमित्त परिवर्तन नाट्य संस्थेच्या
वतीनं देण्यात येणारा परिवर्तन नाट्य पुरस्कार अभिनेते संजय कुलकर्णी – सुगावकर यांना
जाहीर झाला आहे. औरंगाबाद इथल्या तापडिया नाट्यमंदिरात आज सायंकाळी साडे सहा वाजता
हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
*****
***
No comments:
Post a Comment