Sunday, 4 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 04.11.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 04  November 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ नोव्हेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø  मराठा आरक्षणाची प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

Ø  दुष्काळी परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Ø  कर्नाटकजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता

Ø  जानेवारी महिन्यापासून सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळाला नाही तर आंदोलनाचा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचइशारा

 आणि

Ø  दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयीन शुल्क माफ करण्याचे आदेश जारी

****



 मराठा आरक्षणाची प्रक्रिया नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. नशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत इथं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत काल ते बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून या संबंधात नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. त्याची योग्य ती पूर्तता झाल्यानंतर कायद्याच्या कसोटीवर कायम टिकणारं आरक्षण लागू होईल असं पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

***



 जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सरकारकडून आवश्यक त्या सर्व उपाय योजना केल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते़. आगामी काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता असल्यानं त्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



 दुष्काळाचं नियोजन करण्याकरता आता आपण विशेषताः पिण्याच्या पाणाचा आराखडा तयार करायला सांगितलेलं आहे. त्यासोबत चाऱ्या संदर्भात देखील आपण आदेश दिले आहेत. डिसेंम्बर नंतर जो चारा आपल्याला लागेल, त्याचे अत्ताच नियोजन करायचं. जी १२७कोटीची जालण्याची पिण्याच्या पाण्याची योजना आहे. हि जायकवाडी वरून आहे. जायकवाडीत पाणी देखील आहे. त्याच्यामुळे जे काही अडचणी असेल ते दूर करून वेळेत काम झालं पाहिजे. पुढचे ३-४ महिने विशेषताः दुष्काळाशी सामना हा कारावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही ही तयारी करतो आहोत. आणि सगळी मदत जी आहे राज्यप्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये ही केली जाईल. अश्या प्रकारचे लेखी आश्वासन देखील मी देतो.  



 दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातल्या सुपा औद्यगिक वसाहतीत मायडीया टेक्नॉलॉजी पार्कचा कोनशिला अनावरण समारंभही काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचं उद्योगस्नेही धोरण आणि औद्योगिक विकासासाठी विविध कायद्यात सुधारणा केल्यानं राज्याच्या परकीय गुंतवणुकीत वाढ होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****



 कर्नाटकजवळ असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज आणि उद्या अहमदनगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातल्या कांही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. याचा परिणाम सातारा आणि औरंगाबाद जिल्ह्यांत दिसून येईल, मात्र या दोन्ही जिल्ह्यांत सार्वत्रिक तसंच चांगल्या पावसाची शक्यता नाही. यादरम्यान उर्वरित मध्य-महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि पश्चिम-विदर्भात आभाळी वातावरण असेल. तसंच किमान तापमानात वाढ होऊन हवेतला गारवा कमी होईल, असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.



 दरम्यान, काल अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांन कळवलं आहे.

****



 येत्या जानेवारी महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळाला नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश दौंड यांनी दिला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. नोकर भरती, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचं वय ६० वर्ष करण्यात यावं या प्रमुख मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून देखील काहीच ठोस निर्णय होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

****



 औरंगाबाद इथं आज तिसऱ्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय बुद्धीस्ट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या जाबिंदा मैदानावर सकाळी आठ वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होईल. या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, थायलंडचे डॉक्टर नितितान्त विसावेसुआन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 दुष्काळग्रस्त आणि दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयीन शुल्क माफ करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं काल हा निर्णय घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. इयत्ता बारावीनंतर उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी  पालकांची उत्पन्न मर्यादा सहा लाख रूपयांवरून आठ लाख रूपये करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विकास विभागानं काल घेतला.

****



 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातल्या भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करावं, या मागणीसाठी काल परभणी इथं सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक समितीच्या चार युवकांनी जलकुंभावर चढून आंदोलन केलं. ही मागणी शासनाला कळवण्याचं आश्वासन स्थानिक प्रशासनानं दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

****



 भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून कोलकाता इथं सुरुवात होत आहे. संध्याकाळी सात वाजल्यापासून पहिला सामना होणार आहे. या आधी झालेल्या दोन कसोटी तसंच पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतानं विजय मिळवला आहे. ही मालिका जिंकून पूर्ण वर्चस्व सिध्द करण्याकडे भारताचा तर दौऱ्याचा शेवट आनंदी करण्याचा वेस्ट इंडिजचा प्रयत्न असेल.

****



 पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना पक्की घरं देण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातल्या कान्हा गावचे रहिवासी मल्हारी अंभोरे यांनी या विषयी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले….



मी कालपर्यंत एका झोपडपट्टी सारख्या घरात राहात होतो. पावसाळ्यात मला खूप पावसाचा, उन्हाचा त्रास होत होता लय. परंतू पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या योजनेचा मला पूरेपूर फायदा झाल्याने मी खूप-खूप आभारी आहे. 

****



 परभणी जिल्ह्याच्या पालम इथल्या ममता विद्यालयात गोवर रूबेला लसीकरणाबात जनजागृती करण्यासाठी काल पालक मेळाव्याचं आयोजन करण्यात आल होतं. यावेळी विविध वैद्यकीय तज्ञांनी लसीकरणाचं महत्व सांगितलं तसंच मार्गदर्शन केलं. यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसंच विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पथनाट्य या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं.

****



 परभणी जिल्ह्यातल्या सेलू पंचायत समिती कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी काल लेखणी बंद आंदोलन केलं. वालूर ग्राम पंचायत कार्यालयात ग्रामसेवक संजय वायसे यांना शुक्रवारी मारहाण करणाऱ्या दोघांना अटक करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.

****



 लातूर जिल्ह्यातल्या निलंगा पाणी पुरवठा प्रकल्पासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ८४ कोटी रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळं निलंग्याचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

****



 विलास सहकारी साखर कारखान्यानं उत्पादित केलेल्या सेद्रिंय साखरेच्या ११ हजार १ व्या साखर पोत्याचं पूजन संस्थापक  अध्यक्ष आमदार  अमित  देशमुख यांच्या हस्ते काल लातूर इथं करण्यात आलं. सेद्रिंय ऊस शेती करून सेद्रिंय साखर उत्पादन यशस्वीपणे करणारा  विलास साखर कारखाना देशातला पहिला साखर कारखाना ठरला आहे.

****



 परभणीमधल्या ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागीय कार्यालयातला उपकार्यकारी अभियंता युनुसखान इब्राहिमखान खान याला आठ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...