Tuesday, 6 November 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.11.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 06 November 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ नोव्हेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 कर्नाटकात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सत्ताधारी काँग्रेस-जनता दल सेक्युलर चार जागांवर तर भारतीय जनता पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे. रामनगरम विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. बल्लारी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार व्ही.एस.उगरप्पा दीड लाख मतांनी आघाडीवर, शिवमोगा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेर भाजपा उमेदवार, मांड्या लोकसभा मतदारसंघात जेडीएस उमेदवार, तर जामाखांदी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आघाडीवर असल्याचं वृत्त आहे.

****



 ओडिशाच्या मालकंगिरी जिल्ह्याच्या कुरमनूर, संयाशी गुडा आणि पापुलूर भागात नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये काल झालेल्या चकमकीनंतर त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रं आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. यामधे दोन एफएलआर रायफल्स, एक इन्सास तर एक ३०३ रायफल, तीन हातगोळे आणि जिवंत काडतूसांचा मोठा साठा आहे. चकमकीत मारल्या गेलेल्या दोघा नक्षलवाद्यांसाठी ओडिशा सरकारनं चार लाख रुपयांचं तर अन्य तिघांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सीमा सुरक्षा दलाच्या जवानासंह ओडिशा सुरक्षा दलाच्या जवानांनी ही कारवाई केली.

****



 देशात परिवहन क्षेत्राच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचं, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. शहरांमध्ये वाढती गर्दी आणि प्रदुषण कमी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकार प्रदुषण मुक्त आणि कमी खर्चाच्या वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी वाहनांसाठी मिथेनॉल, इथेनॉल आणि विद्युत स्त्रोतांचा वापर करावा, जेणेकरुन देशात पेट्रोलियम पदार्थांची आयात कमी होईल, असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं.

****



 १९९२ च्या बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई न्यायालयानं शेअर दलाल हर्षद मेहता याचा भाऊ अश्विन मेहता आणि आठ बँक अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती शालिनी फणसळकर यांनी हा निकाल देताना, तपास यंत्रणा या आरोपींवरचे आरोप सिद्ध करू शकल्या नसल्याने, त्यांची मुक्तता करत असल्याचं सांगितलं. १९९२ साली उघड झालेल्या या प्रकरणात या आरोपींनी भारतीय स्टेट बँकेला सुमारे एकशे पाच कोटी रुपये ठकवल्याचा आरोप होता, या प्रकरणातला मुख्य आरोपी हर्षद मेहता याचा २००१ साली मृत्यू झाला.

****

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री, दुष्काळ निवारणाबाबत आढावा बैठक घेत असून, जिल्ह्यातल्या कायदा सुव्यवस्थेसंदर्भात ते पोलिस विभागाची आढावा बैठक घेणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

****



 औरंगाबाद जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम येत्या २७ नोव्हेंबर पासून राबवण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात काल आयोजित गोवर - रुबेला लसीकरण मोहीमेसंदर्भातल्या मार्गदर्शन कार्यशाळेत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ही माहिती दिली. महानगर पालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, यांच्या समन्वयानं, ही मोहीम यशस्वी करायची असून, या मोहिमेत सर्वांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****



 औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीचा बाह्यरुग्ण विभाग येत्या नऊ आणि ११ नोव्हेंबर रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद राहील, मात्र १० आणि १२ नोव्हेंबरला घाटीचा बाह्यरुग्ण विभाग सुरु राहणार आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली.

****



 येत्या दहा ते चौदा तारखांदरम्यान लातूर इथं, मुलींच्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत देशभरातून सत्तेचाळीस विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत.

****



 औरंगाबाद शहरात खाजगी बसेस चालक, मालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात ज्यादा भाडे आकारणाऱ्या ११ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली. खासगी बस चालकांनी जास्तीचं भाडं आकारल्यास प्रवाशांनी तक्रार करण्याचं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलं आहे. 

****



 चिनी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आज फुझोऊ इथं सुरूवात  होत आहे. किदंबी श्रीकांत आणि पी व्ही सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करतील. २०१८ मध्ये पाच महत्त्वाच्या स्पर्धा गमावल्यावर आता या स्पर्धेत विजेतेपदासाठी सिंधूचा प्रयत्न राहील. तिचा पहिला सामना रशियाच्या कोस्तेस्काया बरोबर आहे होणार आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...