Thursday, 1 November 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad - 01.11.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 1 November 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

भारत आणि दक्षिण कोरियात झालेल्या एका महत्त्वपूर्ण सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. दोन्ही राष्ट्रांमध्ये पर्यटन क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करुन संबंधित माहितीची देवाणघेवाण करणं, हे या कराराचं मुख्य उद्दिष्टं आहे. भारत आणि रशियात ‘वाहतूक शिक्षण’ या क्षेत्रात झालेल्या कराराला, तसंच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या रुपरेषेत बदल सुचवण्याच्या उद्देशानं या आघाडीच्या पहिल्या बैठकीत मांडलेल्या प्रस्तावालाही केंद्र सरकारनं अनुमती दिली आहे.

****

यावर्षी ऑक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर वसुली झाली आहे. कराचे कमी दर, कमी करचोरी, जास्त वसुली, फक्त एक कर आणि कर अधिकाऱ्यांची कमीत कमी दखल यामुळे वस्तू आणि सेवा कर प्रणाली यशस्वी झाल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

****

जीएसटी भरपाई अनुदान देताना आधार वर्ष महसुलाचं सूत्र प्रतिकूल ठरवणाऱ्या महानगरपालिकांच्या प्रकरणांमध्ये अनुदान मंजुरीचे अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहेत. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करायला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद महाविद्यालयं आणि रुग्णालयांची बांधकामं आता केंद्र शासनाच्या अधिपत्याखालच्या सार्वजनिक कंपन्यांकडून करुन घेण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्र शासनानं सुरु केलेल्या खेलो इंडिया योजनेची अंमलबजावणी तसंच आयएनएस विराट ही युद्धनौका वस्तुसंग्रहालयात रुपांतरित करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

नागरिकांनी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित ‘प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमा’त ते बोलत होते. ध्वनीप्रदूषण, फटाके मुक्त दिवाळी आणि प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबवण्यासाठी पर्यावरण विभाग झपाट्यानं काम करीत असून, या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावं, असं ते म्हणाले. आपल्याकडे साजरे होणारे सण, उत्सव हे पर्यावरणपूरक साजरे केले तर हवा प्रदूषित होणार नाही, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यावेळी म्हणाले.

****

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १९ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी आज विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. अधिवेशनाचं कामकाज ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, या काळात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ विधेयकं, तर विधानपरिषदेची दोन प्रलंबित विधेयकं मांडण्यात येणार आहेत.

****

जायकवाडीसाठी नाशिकच्या गंगापूर धरणातून तीन हजार ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं, तसंच दारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पाणी सोडताना दोन्ही धरणाजवळ कडेकोट बंदीबस्त ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा आणि निळवंडे धरणातूनही जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आलं.

****

गेल्या चार वर्षात राज्य सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत केली. सरकार वापरत असलेला ‘दुष्काळसदृश’ असा काही शब्दच नसून, दुष्काळ निवारणासाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जयाकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करेपर्यंत काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरुच राहणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.

तत्पूर्वी, बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथंही जनसंघर्ष यात्रेत ते सहभागी झाले होते. बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राबवलेल्या जलसंधारण कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.

****

जालना स्थानिक गुन्हे शाखेनं आज दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडून तीन लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता दोघांनी बसस्थानक, रेल्वे स्थानक, आठवडी बाजार, मंदिर आदी गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरल्याची कबुली दिली.

****

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पाचवा एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं नऊ गडी राखून जिंकत पाच सामन्यांची मालिकाही तीन - एकनं जिंकली आहे. थिरुअनंतपुरम इथं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडलेला वेस्ट इंडिज संघ अवघ्या १०४ धावात गारद झाला. रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकामुळं भारतानं पंधराव्या षटकातच लक्ष्य साध्य केलं.
****

No comments: