Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 2 November 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ नोव्हेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना आता ५९ मिनिटांत
एक कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली
आहे. नवी दिल्लीत आज सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आधार आणि मदत कार्यक्रमाचा प्रारंभ
केल्यानंतर ते बोलत होते. जीएसटीत नोंदणी केलेल्या प्रत्येक सुक्ष्म, लघू आणि मध्यम
उद्योजकांना एक कोटी रुपयांच्या कर्जात व्याजावर दोन टक्के सूट दिली जाईल, अशी घोषणाही
त्यांनी केली. या उद्योगांमुळे कोट्यावधी लोकांना रोजगार मिळतो, असं सांगून पंतप्रधानांनी
उद्योजकांना सोप्या आणि स्वस्त दरात कर्ज, उत्पादन विक्रीसाठी बाजार, उद्योजकांना वेळेवर
भरणा, सरकारी दखल कमी आणि उद्योग प्रक्रिया सोपी होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची अर्थव्यवस्था देशासाठी महत्वपूर्ण असल्याचं केंद्रीय
अर्थमंत्री अरुण जेटली यावेळी म्हणाले.
****
राज्यात आगामी काळात ई-बसेस तसंच अन्य पर्यायी इंधनांचा
वापर करुन प्रदूषण कमी करणारी, सर्वांना परवडेल अशी आणि पर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक
वाहतूक व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपूर इथं आज अकराव्या भारतीय शहरी वाहतूक परिषदेचं
आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नागरीकरणाचा वेग वाढत असून, यापुढे
आपल्या शहरांचा दर्जा तिथल्या वाहतूक सुविधा आणि व्यवस्थेवर ठरणार असल्याचं मुख्यमंत्री
म्हणाले. शहरांमधलं प्रदूषण टाळण्यावर भर देण्यात येत असून, विजेवरची वाहतूक ही काळाची
गरज बनत असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. आपल्याकडे मुबलक प्रमाणात
उपलब्ध असलेल्या सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करणं गरजेचं असल्याचं गडकरी म्हणाले.
****
मुख्यमंत्री पेयजल योजनेतून
मराठवाड्यात ४२५ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या ५५८ कोटी रूपयांची १९९ योजनांची
कामं सुरू असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली
आहे. औरंगाबाद इथं आज मराठवाडा विभागातल्या १३८ कोटी ९० लाख रूपये खर्चाच्या १५१ प्रकल्पाचं
भूमिपूजन लोणीकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. येत्या सहा महिन्यांत मराठवाडा
वॉटर ग्रीडच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत
जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी इथल्या आणि लातूर तालुक्यातल्या
मुरुड शहराच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. टेंभुर्णी इथं सात कोटी ४० लाख
रुपयांची तर मुरुड इथं ३५ कोटी ९१ लाख रुपयांची ही योजना असल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
विद्यापीठं आणि महाविद्यालयीन
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासन
शिक्षक आणि शिक्षकेत्तर भरती करणार असून आता महाविद्यालयांना या जागा भरण्याची अनुमती
दिली जाईल, असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बोलत होते.
त्याचबरोबर तासिका तत्वावर काम करणाऱ्या अध्यापकांच्या मानधनामध्ये सुध्दा वाढ करण्यात आली असल्याची
माहिती
तावडे यांनी दिली.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राममंदिर प्रश्नी गेली तीस वर्ष
आंदोलन करत असून सध्या हा प्रश्र्न न्यायालयाच्या
अखत्यारित असल्यानं न्यायालयाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहे, असं संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी
म्हटलं
आहे. ते आज
मुंबईत संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना
वाटेल ती मदत करायला तयार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबईत आज शिवसेना आमदार, संपर्क नेते, जिल्हा पदाधिकारी यांची बैठक झाली, त्यानंतर
वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी राम मंदीर मुद्यावरुन सरकार आणि
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
****
परभणी शहरात डेंग्यू आजाराचं
प्रमाण वाढलं असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन महापौर मीना वरपुडकर यांनी केलं
आहे. महापालिकेच्या वतीनं डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात
येत असल्याची माहिती त्यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. आरोग्य विभागाच्या पथकानं गेल्या
महिन्यात घरोघरी भेट देऊन पाणीसाठ्याची पाहणी केली. ३०१ जणांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात
आल्यानंतर १३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment