Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०५ नोव्हेंबर
२०१८ सकाळी ७.१०
मि.
****
·
आयुर्वेदाच्या प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या
वापराची आवश्यकता केंद्रीय आयुष मंत्र्यांकडून व्यक्त.
·
आर्थिक घोटाळे रोखण्याकरता भारतीय रिजर्व्ह बँकेकडून सार्वजनिक
पत नोंदणीला प्रारंभ.
·
शेतकऱ्यांना २५ हजार सौर पंप पुरवण्यासाठी, सरकार विद्युत
अधिभार आकारणार.
·
औरंगाबाद इथं आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट
महोत्सवाचा समारोप.
आणि
·
भारत वेस्ट इंडीज टी ट्वेंटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात
भारताचा ५ गडी राखून विजय.
****
देशात आयुर्वेदाच्या प्रसारासाठी
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद
नाईक यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ‘उद्योजकता आणि व्यापार विकास’ या विषयावरच्या
दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. आयुर्वेदाची बाजारपेठ
वाढावी यासाठी सरकार गेल्या चार वर्षांपासून विविध प्रकारे पुढाकार घेत असल्याचं, तसंच
देशात २० लाख आयुर्वेदीय औषधं उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. नवउद्योजकांना अत्याधुनिक
तंत्रज्ञान वापरून आयुर्वेदात जागतिक स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी या शिबिराचं
आयोजन करण्यात आल्याचं नाईक यांनी सांगितलं.
****
आर्थिक
घोटाळे रोखण्याकरता भारतीय रिजर्व्ह बँकेनं सार्वजनिक पत नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये
हेतुपुरस्सर कर्ज न फेडणाऱ्यांची नावं आणि न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या
नोंदी केल्या जाणार आहेत. नोंदणी प्रक्रिया विकसित करण्यासाठी वार्षिक १०० कोटी रूपयांपेक्षा
अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांकडून रिझर्व्ह बँकेनं स्वारस्य पत्रं मागवली आहेत. भारतीय
रोखे आणि विनिमय मंडळ, कंपनी व्यवहार मंत्रालय, वस्तू आणि सेवा कर यंत्रणा तसंच भारतीय
दिवाळखोर आणि ऋण शोधमंडळांकडून प्राप्त माहिती या पत नोंदणीमध्ये असणार आहे. यामुळे
बँका तसंच वित्तीय संस्थांना कर्जदारांच्या स्थितीची माहिती मिळू शकणार आहे.
****
अमेरिकेत बोस्टनमधल्या एमआयटी
विद्यापीठात आयोजित तिसऱ्या इंडिया ग्लोबल समीटमध्ये काल राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत
राज्यातल्या ग्रामीण भागातल्या बचत गटांच्या महिलांनी सहभाग घेतला. या महिलांनी बचत
गटांच्या विविध उत्पादनांचं प्रदर्शन करतानाच राज्यातल्या ग्रामीण महिला लघु उद्योगांच्या
क्षमतांचंही यावेळी सादरीकरण केलं. या महिलांनी तयार केलेली वारली, हस्तकला, तसंच हातमागाची
उत्पादनं या समीटमध्ये ठेवण्यात आली. या महिलांना जागतिक उद्योजकता, व्यवहार,
बाजारपेठ यांची ओळख करुन देण्यासाठीच या दौऱ्याचं आयोजन करण्यात आल्याचं मुंडे यांनी
यावेळी सांगितलं. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनातर्फे राबवण्यात येत
असलेल्या विविध योजना, उपक्रमांची यावेळी मुंडे यांनी माहिती दिली. राज्यातल्या तीन लाख बचत गटांतल्या
३५ लाख महिलांशी राज्य सरकार जोडलेलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नौदलाचे निवृत्त व्हाईस अॅडमिरल
मनोहर प्रल्हाद तथा एम. पी. आवटी यांचं काल सातारा जिल्ह्यातल्या विंचुर्णी इथं निधन
झालं, ते ९१ वर्षांचे होते. १९७१ च्या बांग्लादेश युध्दात त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण
कामगिरीबद्दल त्यांना वीरचक्र देऊन गौरवण्यात आलं होतं. आवटी यांनी पुण्यात खडकवासला
इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे प्रमुख, नौदल मुख्यालयातल्या मनुष्यबळ विभागाचे
प्रमुख, मुंबईतल्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिलं होतं. याच
पदावरून मार्च १९८३ मध्ये ते निवृत्त झाले होते.
****
पाकिस्तानी गुप्तचर संस्था
आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या सीमा सुरक्षा बलाच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे.
पंजाबच्या फिरोजपूरमधल्या ममदोट पोलीस स्टेशनमध्ये बीएसएफच्या २९व्या बटालियनमध्ये
ऑपरेटरचं काम करणारा जवान शेख रियाजउद्दीन हा आयएसआय संघटनेला गुप्त माहिती पुरवत असल्याच्या
तक्रारी पोलिसांकडे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात हेरगिरीचा गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांना २५
हजार सौर पंप पुरवण्यासाठी राज्यशासन औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून प्रति युनिट
दहा पैसे विद्युत अधिभार आकारणार आहे. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग यांनी
काल वृत्तसंस्थेशी बोलतांना ही माहिती दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख सौर पंप
तीन टप्प्यात म्हणजे वर्ष २०२१ पर्यंत देण्यात येणार आहेत. या योजनेसाठी सुमारे ८२५
कोटी रुपये खर्च येणार असून, यासाठी उत्पन्नाचा इतर कोणताही स्रोत नसल्यानं, अधिभार
आकारण्याचा निर्णय घेतला असल्याचं सिंग यांनी सांगितलं.
****
रेल्वे सुरक्षा दलानं ई-तिकीटांची
दलाली करणऱ्याविरोधात छापा सत्र सुरु केलं आहे. देशातल्या शंभरहून अधिक शहरांमध्ये
छापे टाकण्यात येत आहेत, गेल्या शुक्रवारी झालेल्या कारवाईत १८५ जणांना अटक करण्यात
आली. तसंच ३६ लाख रुपये किंमतीची सुमारे एकोणीसशे ई-तिकीटं जप्त करण्यात आली. सणासुदीच्या
पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे, आतापर्यंत एकूण ८९१ दलालांना ताब्यात घेण्यात
आलं असल्याचं रेल्वे विभागाच्या सूत्रानं सांगितलं.
****
औरंगाबाद इथं आयोजित तिसऱ्या
‘आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट महोत्सवा’चा काल समारोप झाला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. धम्मानं माणसं जोडायला शिकवलं असून, माणसं तोडणं
हे धम्माच्या विचारात नाही, असं आठवले यावेळी म्हणाले. भारतीय जनता पक्षासोबत असलो,
तरीही आंबेडकरी विचारांशी आपण प्रतारणा केली नाही असं ते म्हणाले. त्यापूर्वी या महोत्सवाच्या
सकाळच्या सत्रात धम्म ध्वजारोहण, धम्म प्रवचन आदी कार्यक्रम झाले. समाज कल्याण राज्यमंत्री
राजकुमार बडोले, पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह धम्म प्रसारक तसंच अनेक
कार्यकर्ते या महोत्सवात सहभागी झाले.
****
आज धनत्रयोदशी, धन्वंतरी जयंती
आज सर्वत्र साजरी होते. दीपोत्सवाला आजपासून खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो. काल वसुबारसेला
सवत्स धेनुच्या पूजन झालं. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या आदिवासी बांधवांनी परंपरेप्रमाणे
वाघबारस काल साजरी केली. आज सायंकाळी घरोघरी धन्वंतरी पूजनाचा प्रघात आहे. दिवाळीच्या
खरेदीसाठी बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीनं फुलून गेल्या आहेत.
****
भारत वेस्ट इंडीज टी ट्वेंटी
मालिकेतला काल झालेला पहिला सामना भारतानं, ५ गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करत
वेस्ट इंडीज संघानं, निर्धारित षटकांत ८ बाद १०९ धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिकच्या
नाबाद ३१ तर कृणाल पांड्याने नाबाद २१ धावांच्या बळावर भारतानं अठराव्या षटकात विजय
मिळवला. चार षटकांत तेरा धावा देऊन तीन बळी टिपणारा कुलदीप यादवला सामनावीर ठरवण्यात
आलं. मालिकेतला दुसरा सामना उद्या लखनौ इथं होणार आहे.
****
अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट
संघाच्या कर्णधारपदी मुंबईचा माजी रणजीपटू सौरभ नेत्रावळकर याची नियुक्ती झाली आहे.
सौरभ डावखुरा जलदगती गोलंदाज असून २०१० साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट
स्पर्धेत त्यानं भारतीय संघातून खेळताना सर्वाधिक बळी टिपले होते.
****
प्रधानमंत्री
उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातल्या महिलांना स्वयंपाक करणं सोपं झालं आहे. सिंधुदुर्ग
जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळला असून जिल्ह्यात जुलै २०१८ पर्यंत १९ हजार
२६९ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. कुडाळ इथल्या रहिवासी प्रणाली कुडाळकर
यांनी या योजनेमुळे धुराचा तसंच डोळ्यांना होणारा त्रास कमी झाल्याचं सांगितलं. त्या
म्हणाल्या -
गेली अनेक वर्षे आम्ही
चुलीवर जेवण करत होतो. त्यामुळे धुराचा व्हायचा. यामुळे घराच्या भींती खराब व्हायच्या.
डोळ्यांना पण त्रास व्हायचा. जेवण तयार व्हायला वेळ लागायचा. पण प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांनी आमच्यासाठी उज्ज्वला गॅस योजना सुरु केल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा झाला
आहे. या योजनेतून आम्ही गॅसची शेगडी घेतली आहे. आता आम्ही त्यावरच सगळं जेवण करतो.
त्यामुळे वेळ पण वाचतो आणि त्रास पण होत नाही. धन्यवाद उज्ज्वला योजना.
****
केंद्र
सरकारनं सोयाबीनच्या निर्यात धोरणात मोठ्या प्रमाणावर बदल केले असून चीन, अमेरिका,
बांगलादेश आणि इराण यासारख्या देशांसोबत निर्यातीचा करार केला आहे. याशिवाय कच्च्या
तेलाचे दरही अर्जेंटिना, अमेरिका आणि चीनच्या दरासमान केले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय
स्तरावर सोयाबीनची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या इसापूर
धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. कालवा सल्लागार
समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूरच्या
डाव्या आणि उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्राला, तसंच मुख्य कालव्यावरच्या प्रवाही आणि
मंजूर उपसा सिंचन योजना धारकांना हे पाणी मिळणार आहे. रब्बी हंगामात तीन आणि उन्हाळी
हंगामात चार पाळ्या पाणी देण्याचं प्रस्तावित आहे. इसापूर धरणात सध्या सरासरी ६६ टक्के
इतका पाणीसाठा आहे.
दरम्यान, नाशिक आणि अहमदनगर
जिल्ह्यातल्या धरणातून केलेल्या विसर्गामुळे जायकवाडी धरणाची उपयुक्त पाणी पातळी सुमारे
३२ टक्क्यांवर पोहोचली आहे.
****
लातूर शहरामधल्या गंजगोलाई
आणि गांधी चौकातल्या महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातल्या गाळ्यांसाठी वार्षिक
बाजार मूल्य दर तक्ता-रेडिरेकनर पध्दतीनंच भाडं आकारलं जाईल, असं जिल्ह्याचे पालकमंत्री
संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment