आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१९ जानेवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई
भेटीवर येत आहेत. भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन आज त्यांच्या
हस्ते होणार आहे. भारतीय रजतपटांचा इतिहास आणि चित्रपटांच्या माध्यमातून उलगडत जाणारी
भारताची सामाजिक-सांस्कृतिक प्रगती दर्शवणारं हे संग्रहालय आहे. चलतचित्र, स्थिरचित्रं, चित्रपटांची
झलक, प्रसिद्धी साहित्य तसंच चर्चेद्वारा कथाकथन शैलीत हा सुमारे
शंभर वर्षांचा इतिहास उलगडला जाणार आहे. संग्रहालयामधे गुलशन महालाच्या प्रतिकृती, जुनी
उपकरणं, फोटो, वेशभूषा आणि विविध दुर्मिळ स्मृतीवस्तूचा संग्रह आहे.
हा संग्रह नऊ गटात विभागला गेला आहे. यावेळी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार
उपस्थित राहणार आहेत.
****
भारतीय
नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी गुजरात आणि तामिळनाडूमध्ये तीन नवीन नौदल हवाई स्क्वाड्रनला
सरकारनं मंजुरी दिली आहे. केरळ आणि अंदमान बेटांवर सध्या उपलब्ध असलेल्या डॉर्नियर
स्क्वाड्रनमध्ये अतिरीक्त विमानांसाठी कर्मचाऱ्यांच्या भरतीलाही सरकारनं मंजुरी दिली.
नौदलाला मिळणाऱ्या डॉर्नियर विमानांमध्ये अत्याधुनिक सेन्सर्स आणि उपकरणं बसवण्यात
आली आहेत. डॉर्नियर विमानांमुळे समुद्र मार्गानं येणारे धोके अचुकरित्या ओळखण्यासाठीची
भारतीय नौदलाची क्षमता आणखी वाढणार आहे.
****
देशाच्या अनेक
भागात सध्या कडक थंडीची लाट जाणवत आहे. जम्मू काश्मीरच्या काही भागात काल हिमवृष्टी
झाली. काश्मीर खोऱ्यात बहुतांश ठिकाणी तसंच राज्यात इतरत्र जोरदार हिमवृष्टी आणि पावसाची
शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पहाडी भागात नव्यानं सुरु
झालेल्या हिमवृष्टीमुळे थंडीची लाट निर्माण झाली आहे. राजधानी दिल्लीसह हरियाणा आणि
पंजाबमधे काही ठिकाणी तसंच मध्य प्रदेशाच्या पूर्व भागात तुरळक ठिकाणी देखील थंडीची
लाट जाणवली.
****
मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळात रेल्वे वाहतुक नियंत्रणाच्या
कामासाठी उद्या विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस,
मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस, या दोन्ही गाड्यांच्या येण्या जाण्याच्या दोन्ही फेऱ्या
उद्या रद्द करण्यात आल्या आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment