Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 January 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
१९ जानेवारी २०१९ दुपारी १.०० वा.
*****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
गुजरातमधल्या हाजिरा इथं एल
अँड टी द्वारे उभारण्यात आलेलं सुसज्जित आर्मर्ड सिस्टिम्स - शस्त्रास्त्र संकुल देशाला समर्पित केलं. नवसारी इथं उभारण्यात येणाऱ्या निराली
कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी, सिल्व्हासा इथंही सायलीमधे वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला
समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान
आज मुंबई दौऱ्यावर येत असून, भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन
त्यांच्या हस्ते होणार आहे.
****
भारतीय रेल्वे आणि खानपान महामंडळ - आयआरसीटीसी उपाहारगृह
आर्थिक घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष
लालू प्रसाद यादव यांच्या अंतरिम जामिनाची मुदत २८ जानेवारी पर्यंत वाढवली आहे. या
प्रकरणातले इतर आरोपी लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी
यादव यांच्या जामिनाची मुदतही न्यायालयानं वाढवली. आयआरसीटीसीच्या दोन उपाहार गृहांसाठी
कंत्राट देताना भ्रष्टाचार केल्याचा या तिघांवर आरोप आहे.
****
पेरु,
इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया या देशांनी रेल्वे विभागानं तयार केलेल्या ट्रेन-१८
ही रेल्वे आयात करण्यासाठी इच्छा व्यक्त केली असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं
म्हटलं आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर तयार करण्यात आलेल्या या रेल्वेची गती १८० किलोमीटर
प्रती तास एवढी आहे. सर्वात प्रथम ही रेल्वे वाराणसी ते दिल्ली या रेल्वे मार्गावर धावणार आहे. जगात सध्या ट्रेन-१८ सारख्या रेल्वेची
किंमत २५० कोटी रुपये आहे तर भारतात तयार करण्यात आलेल्या या रेल्वेची किंमत फक्त १००
कोटी रुपये असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे.
****
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी
महाराज टर्मिनसवरुन दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस सेवेला आजपासून सुरुवात होणार आहे. रेल्वेमंत्री
पियुष गोयल आज या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. गुजरातऐवजी मध्य प्रदेशातून दिल्लीकडे
जाणारी ही पहिलीच राजधानी गाडी असेल. यासोबतच मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवरच्या अनेक
विकास कामांचं लोकार्पणही गोयल यांच्या हस्ते होणार आहे.
****
उत्तर
प्रदेश सरकारनं नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सामान्य वर्गातल्या आर्थिक मागास वर्गांसाठी
दहा टक्के आरक्षणाला मंजूरी दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा
यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली काल लखनौमध्ये
झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
मराठा समाजाला दिलेलं
१६ टक्के आरक्षण हे त्या समाजाचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी दिलं असल्याचं
राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं. तसंच सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणात
५० टक्क्यांची घालून दिलेली मर्यादा ही सर्व राज्यांना लागू होत नसल्याचा युक्तीवाद सरकारनं न्यायालयात केला. त्यामुळे सदर आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून
लावण्याची विनंती राज्य सरकारनं केली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या
२७ जानेवारीला आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा ५२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि
विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, मायजीओव्ही
ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात
बरबडा इथं परवा सोमवारपासून तिसरं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात
आलं आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक डॉ.नागनाथ पाटील यांची निवड करण्यात
आली आहे. ग्रंथदिंडी, कथाकथन, कवी संमेलन, परिसंवाद असे अनेक कार्यक्रम संमेलनात होणार
आहेत.
****
मलेशियात
क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत
भारताच्या सायना नेहवालचं आव्हान आज संपुष्टात आलं. आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या
सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरीननं सायनाचा १६- २१, १३
- २१ असा पराभव केला. पुरुष एकेरीतही भारताच्या किदांबी श्रीकांतचा पराभव झाल्यानं
त्याचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. उप-उपान्त्यपूर्व फेरीत कोरीयाच्या सोन
वाननं श्रीकांतचा २३ - २१, १६ - २१, १७ - २१ असा पराभव केला.
****
पुणे
इथं सुरु असलेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत काल यजमान महाराष्ट्राच्या संघानं
दोनशे पदकांचा पल्ला गाठला. महाराष्ट्रानं कालच्या दिवशी आठ सुवर्ण पदकांची कमाई केली.
संघानं मुष्टीयुद्धात पाच, टेनिसमध्ये दोन आणि टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण पदक जिंकलं.
महाराष्ट्राचा संघ श्याहत्तर सुवर्ण, ७५ रौप्य आणि सदूसष्ठ कांस्य पदकांसह
प्रथम स्थानावर आहे. हरियाणा दुसऱ्या, तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे.
*****
***
No comments:
Post a Comment