Saturday, 19 January 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.01.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

भारतीय सिनेमात लक्षणीय बदल झाला असून, हे माध्यम नवी उंची गाठत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. नवभारताच्या निर्माणासाठी चित्रपटसृष्टीचंही योगदान असल्याचं त्यांनी नमूद केलं. चित्रपट आणि समाजाचा एकमेकांशी परस्परपूरक संबंध असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, आताच्या चित्रपटातून समाजातल्या विविध समस्यांसोबतच त्यावर समाधानही बघायला मिळत असल्याचं सांगितलं. राज्यपाल सी विद्यासागर राव, माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चित्रपट सृष्टीतले अनेक दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित होते.

****

सरकारनं सैन्य पोलिस भरतीत महिलांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सैन्य पोलिस दलातल्या अधिकारी वर्गानंतरच्या कर्मचाऱ्यांच्या पदांमध्ये या जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबतचे ट्वीट करून ही माहिती दिली. श्रेणीस्तरावर २० टक्के महिलांच्या जागा भरण्यात येतील, अशी माहितीही सितारामन यांनी दिली आहे. महिलांचं सैन्यातलं प्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्या म्हणाल्या.

****

युवकांना परिणाम आधारित-रोजगार निर्मितीसाठी तयार करणं आवश्यक असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भारतीय उद्योग संघटनेनं आयोजित केलेल्या रोजगार आणि उदरनिर्वाह या कार्यशाळेत ते बोलत होते. आतापर्यंत आपण व्यवसायाभिमुख शिक्षणाऐवजी वर्षानुवर्ष फक्त शाळा आणि महाविद्यालयातल्या प्रमाणपत्रांवरच जास्त भर देत आलो असल्याचं गोयल यावेळी म्हणाले.

****

राष्ट्रवाद, सुशासन आणि विकास, अंत्योदय हे भारतीय जनता पक्षाचे तीन प्रमुख विचार असून या विचारांच्या आधारेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागपूर इथं आज भाजपच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती मोर्चाचं दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन ‘भीम संकल्प २०१९’ चं उद्घाटन गडकरी आणि केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भाजप सरकारनं अनुसूचित जातींना सामाजिक सन्मान देण्याचं काम केलं, असं गेहलोत यावेळी म्हणाले.

****

रोजगारासाठी सक्षम युवक म्हणून स्वतःकडे लक्ष देण्यापेक्षा तरुणांनी उद्योजक व्हावं किंवा स्टार्टअप सुरु करावं, असं नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं आहे. ते आज सोलापूर विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते. वेळोवेळी अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक ते बदल करणं, त्याचप्रमाणे स्वयम, मूक यासारख्या माध्यमातून नवे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी स्वीकारण्याची गरज निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले.

****

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशनच्या दहाव्या शार्ङ्गंदेव महोत्सवात आज शार्ङ्गंदेव प्रसंग या प्रात:कालीन सत्रात कथकच्या जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ नृत्यांगना गुरु उर्मीला नागर यांचं सप्रयोग व्याख्यान झालं. यावेळी त्यांनी जयपूर घराण्याची वैशिष्ट्ये उलगडून दाखवली. शार्ङ्गंदेव प्रवाह या दुपारच्या सत्रात शिल्पातून नृत्य कसं समजून घ्यायचं यावर नृत्यशिल्प ही कार्यशाळा झाली. कला इतिहासकार डॉ. करुणा विजयेंद्र यांनी यावेळी मार्गदर्शन केलं.

****

उसाच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे आग लागून जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या अंकुशनगर, शहागड परिसरातल्या सहा शेतकऱ्यांचा १८ एकरांतला ऊस जळून खाक झाला. आज दुपारी ही घटना घडली. समर्थ सहकारी कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोचहल्यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली. गाळप हंगाम सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणकडे भरपाई देण्याची मागणी केली आहे.

****

मराठवाड्यात तापमानात किंचित वाढ, तर विदर्भात तापमानात घट नोंदवली गेली आहे. राज्यात आज सर्वात कमी आठ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. नाशिक दहा पूर्णांक दोन, औरंगाबाद आणि परभणी सरासरी १२, तर नांदेड इथं १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

औरंगाबाद इथं उद्या १२ वं गुणीजन साहित्य संमेलन होणार आहे. प्रसिद्ध वक्ते डॉ. इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून संमेनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल उपस्थित राहणार आहेत.

****

जालना इथं येत्या दोन ते चार फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय दर्जाच्या पशु-पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. पशुसंर्वधन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जालना इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.10.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 02 October 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...